Friday 4 August 2017

news 4.8.2017 dio buldana

                        
जिल्हास्तर शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
            बुलडाणा, दि. 4 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व्दारा आयोजित जिल्हास्तर शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन 3 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 11.30 वा. क्रीडा अधिकारी  भाऊसाहेब जाधव,  राष्ट्रीय खेळाडू ज्युदो तुषार मोहन काचकुरे,  राष्ट्रीय खेळाडू संदीप जाधव, पंकज वानखडे, अरविंद अंबुसकर, विजय अंबुसकर, अनिल अंबुसकर यांचे उपस्थितीत संपन्न झाले.
            प्रास्ताविक भाऊसाहेब जाधव यांनी केले.  संदीप जाधव व तुषार काचकुरे यांनी यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन केले.  या स्पर्धेमध्ये विविध तालुक्यातुन 14,17,19 वर्षाआतील मुले/मुली 100 हुन अधिक खेळाडू उपस्थित होते.  स्पर्धेला पंच म्हणून संदीप जाधव, तुषार काचकुरे, पंकज वानखडे, विजय अंबुसकर, सुहास राऊत उपस्थित होते.   तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम जाधव यांचेहस्ते विजयी/उपविजयी खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  संचालन व आभार अनिल इंगळे यांनी मानले. स्पर्धा आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील अधिकारी अनिल इंगळे,  पी.पी. खर्चे, बी.आर. जाधव, जी.एम. वरारकर यांच्या प्रयत्नांमध्ये करण्यात आले, असे  जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                    *****
                                उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकांना मिळणार विशेष गौरव पुरस्कार
    बुलडाणा, दि. 4 : राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य, वाद्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार प्राप्त, संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर/जळीत/दरोड/अपघात व अन्य नैसर्गिक आपत्तींमध्ये बहुमोल कागगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट कार्याबद्दल 25 हजार रूपये व राज्यस्तरीय कार्याबद्दल 10 हजार रूपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यामध्ये सामाजिक कार्य, पर्यावरण विषयक पुरस्कार प्राप्त तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय कार्य करणाऱ्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे.
 त्याचप्रमाणे इयत्ता 10 व 12 वीच्या परीक्षेत 90 टक्केपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या प्रत्येक मंडळातील 10 वीचे गुणानुक्रमे पहिले 5 पाल्य व 12 वी चे गुणानुक्रमे पहिले 5 पाल्य यांना एकरकमी 10 हजार रूपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. आयआयटी, आयआयएम व एआयआयएमएस अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक/ विधवा यांच्या पाल्यांना एकरकमी 25 हजार रूपयांचा विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी पात्र माजी सैनिक, विधवा पत्नी व त्यांचे पाल्यांना सदर गौरव पुरस्कार मिळण्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच केंद्रीय शिक्षा बोर्ड नवी दिल्ली येथून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रेड शिट निष्पादन प्रमाणपत्रामध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शवित नसल्याने संबंधित विद्यालयाचे गुणपत्रक टक्केवारीसह बुलडाणा येथे 16 सप्टेंबर 2017 पुर्वी सादर करावेत.तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक किशोर मुडे यांचेशी संपर्क करावा, अथवा 07262-242208 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
                                                                                    *******



     महसूल दिनानिमित्त महसूल विभागाच्या उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
बुलडाणा, दि. 4 महसूल दिनानिमित्त जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात महसूल विभागाच्या उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना उपस्थित होते. तसेच  प्र. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे व्यासपीठावर उपस्थित होते.  
    यावेळी उपजिल्हाधिकारी संवर्गातून उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी म्हणून  धनजंय गोगटे तर तहसीलदार संवर्गातून मेहकरचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच नायब तहसीलदार ते कोतवाल या संवर्गामध्ये उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पुलकुंडवार म्हणाले,  महसूल विभाग आज सर्व विभागांचा समन्वयक बनला आहे. हा विभाग प्रशासनाचा कणा आहे. विभागाची कार्यप्रणाली  आणि महत्व पाहून शासनाने ही अन्य विभागांच्या योजनांच्या यशस्वी क्रीयान्वयानाची जबाबदारी विभागावर टाकली आहे. या विभागाच्या माध्यमातून गरीब, दुर्बल व अत्याचारग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून दिल्या जावू शकतो. समाज सेवा करण्याची संधी हा विभाग तुम्हाला मिळवून देतो.
    जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. मीना म्हणाले,  जिल्ह्यात पोलीस व महसूल विभाग यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रशासनही गतिमान झाले असून भविष्यात सर्व विभागांनी समन्वयाने काम केले पाहिजे. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी महसूल श्रीमती नम्रता चाटे यांनी केले.  संचलन तहसीलदार सुनील शेळके यांनी तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले.   कार्यक्रमाला तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, अव्वल कारकून, शिपाई व कोतवाल आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
***
      सोयाबीन पिकावरील तंबाखूची पाने खाणाऱ्या किडींचे व्यवस्थापन करावे
बुलडाणा, दि. 4 : सोयाबीन पिकावर तंबाखूची पाने खाणाऱ्या अळ्यांच्या प्रादुर्भावास काही भागामध्ये सुरूवात झालेली आहे. या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या किडीचा पतंग मजबूत बांध्याचा असून पुढील पंख सोनेरी व करड्या – तांबड्या रंगाचे आहेत. त्यावर नागमोडी पांढऱ्या खुणा असतात. मागील पंख पांढरे आहे. कडेला तांबडी झालर असते. अंडी पानाच्या खालील बाजुला पुंजक्याने आढळून येतात व ती शरीराच्या केसांनी आच्छादलेली असतात. लहान अळी पांढुरकी हिरवी व थोडीशी पारदर्शक दिसते. पुर्ण वाढलेली अळी 50 मि.मी लांब असून तिच्या पाठीवर काळे ठिपके व शरीराचे बाजूवर पांढरे पट्टे दिसून येतात. पुर्ण वाढ झालेली अळी जमिनीत काळपट लाल रंगाचा कोषावस्थेत जाते. तर अंडी पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्याने आढळून येतात. ती शरीराच्या केसांनी आच्छादलेली असतात.
    मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्यात साधारणत: 100 ते 200 अंडी घालते. अंड्यामधून 2 ते 3 दिवसात अळ्या बाहेर पडतात. प्रथमत: त्या पानातील हरीतद्रव्य खातात. त्यामुळे पाने जाळीदार व कागदी होऊन पांढरी होतात. त्यावर किडीचे विष्टेचे कणसुद्धा दिसतात. कालांतराने अळया संपूर्ण शेतात पसरतात व सोयाबीनची पाने खातात. मोठ्या झालेल्या अळ्या अधाशासारख्या पाने खात असल्यामुळे सोयाबीन सोबतच कापूस, डाळीवर्गीय पिके, सुर्यफुल व कोबीवर्गीय पिके त्याशिवाय ही किड एरंडी,मका, टोमॅटो, उडिद, मिरची, कांदा आदी पिकांवरसुद्धा आढळून येते.
                                                                        असे करावे नियंत्रण

पक्षांना बसण्यासाठी शेतात हेक्टरी 15 ते 20 पक्षी थांबे लावावेत म्हणजे त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळ्या टिपून खातील. प्रकाश सापळ्यांना नियंत्रित उपयोग करून किडींचे पतंग पकडून नष्ट करावेत. शेतामध्ये कामगंध सापळे हेक्टरी 10 सापळे या प्रमाणे लावावेत. त्यामध्ये या किडीचे नर पतंग आकर्षित होतील, ते काढून नष्ट करावेत. पानाखाली घातलेली अंडीपुंज व लहान अळ्यांचा समूह याचे निरीक्षण करून ते पानासह नष्ट करावेत. मोठ्या अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात. या किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास (सरासरी 4 अळ्या प्रति मीटर ओळ) इंन्डोक्साकार्ब 15.8 टक्के / 6.67 मिली, डायक्लोरव्हस 76 ईसी, 12.50 मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment