Wednesday 23 August 2017

news 23.8.2017 dio buldana

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन
 बुलडाणा, दि. 23 : हॉकीचे जादुगर म्हणून ओळखल्या जाणारे स्व. मेजर ध्यानचंद यांचे जन्मदिनानिमित्त 29 ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये सर्वत्र राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे सकाळी 8.30 वाजता करण्यात आले आहे.  यावेळी शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.  
       राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्व. मेजर ध्यानचंद यांचे जिवनावर व्याख्यान, राष्ट्रीयस्तरावर खेळलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.  जे खेळाडू शालेय/संबंधीत अधिकृत फेडरेशन यांनी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी असतील त्यांनी दि. 29 ऑगस्ट 2016 ते आजपर्यंत या कालाधीत जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळले असतील अशा खेळाडूंनी प्रमाणपत्राच्या सत्य छायांकीत प्रतीसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात  25 ऑगस्ट  2017 पर्यंत आपले प्रमाणपत्राची छायांकीत प्रत जमा सादर करावयाची आहे.
      तसेच  महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलीयन या कार्यक्रमातंर्गत फुटबॉलचे सेल्फी पॉईंट येथे सेल्फी काढणे, हॅण्डबॉलचे प्रदर्शनीय सामने आयोजित होतील.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील शाळांनी, क्रीडा संघटना, अध्यक्ष, सचिव, खेळाडूंनी, अधिकारी कर्मचारी वृंद, शारीरिक शिक्षक व मुख्याध्यापक, क्रीडा प्रेमी नागरीक यांनी 29 ऑगस्ट 2017 रोजी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे सकाळी 7.30 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
                                                            ************
अप्रशिक्षीत शिक्षकांना डिएलएड पदविका बंधनकारक
  • 15 सप्टेंबर 2017 पर्यंत SWAYAM  पोर्टलवर अर्ज सादर करा
 बुलडाणा, दि. 23 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलमांनुसार राज्यातील शाळांमधील अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकांना नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ ओपन स्कूलींग योजनेतंर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार डिएलएड ही पदविका विहीत मुदतीत प्राप्त करावी लागणार आहे. सर्व आस्थापनाच्या कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळा अधिनियमान्वये परवानगी व मान्यता मिळालेल्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील अप्रशिक्षीत शिक्षकांना डि. एल. एड या पदविकेसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. त्यानुसार अप्रशिक्षीत शिक्षकांनी 15 सप्टेंबर 2017 पर्यंत केंद्र शासनाच्या SWAYAM  पोर्टलवर अर्ज सादर करावेत. हे शिक्षक मात्र राज्य शासनाच्या पत्रद्वारा शिक्षण योजनेतंर्गत प्रशिक्षीत होण्यासाठी अर्ज करू शकणार नाहीत.
   स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खाजगी अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांनी यापूर्वी वैयक्तिक मान्यता प्राप्त प्रदान केलेल्या अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकांना राज्य शासनाच्या पत्रद्वारा प्रशिक्षण योजनेमध्ये अथवा नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलींग योजनेतंर्गत डिएलएड पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. या योजनांमधून प्रवेश घेणाऱ्या अप्रशिक्षित शिक्षकांना 31 मार्च 2019 पूर्वी डिएलएड ही पदविका प्राप्त करणे बंधनकारक आहे. या दिनांकानंतर कोणताही अप्रशिक्षित शिक्षक शाळांमध्ये आढळणार नाही. येथून पुढे एकाही अप्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती शाळांनी करू नये, याची दक्षता घ्यावी. शिक्षकांनी अधिक माहितीसाठी www.mscert.org.in व केंद्र शासनाच्या SWAYAM पोर्टलवर संबंधितांनी संपर्क साधावा, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.
                                                                        ***********


शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचे अर्ज भरावे
·        महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल केंद्र, संग्राम केंद्र याठिकाणी मोफत सुविधा
·        9923049253, 7767010001, 9423338375,9822744607 या क्रमांकावर तक्रार करावी
·        07262-248683 क्रमांकावर संपर्क साधावा

     बुलडाणा, दि.23 : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना- 2017 अंतर्गत कर्जमाफी / प्रोत्साहनपर इतर लाभ मिळविण्यासाठी अर्ज तथा घोषणापत्र ऑनलाईन मोफत भरण्यात येत आहे. त्यासाठी महा ई सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल केंद्र, संग्राम केंद्र याठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या केंद्रांवर ऑनलाईन अर्ज मोफत भरण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे शुल्क अर्ज भरतेवेळी देण्याची गरज नाही.  सदर अर्ज व घोषणापत्र मिळविण्यासाठी वरील सर्व केंद्राशिवाय आपले गावातील गटसचिव, संबंधित बँक शाखा, तालुक्याचे सहायक निबंधक यांचे कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक बुलडाणा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांचे कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क करावा.
   शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरतेवेळी कर्ज खाते पासबुक झेरॉक्स, बचत खाते पासबुक झेरॉक्स, पती-पत्नी यांचे आधारकार्ड झेरॉक्स, पॅनकार्डची झेरॉक्स, सेवानिवृत्ती वेतन धारक असल्यास पीपीओ बुकची झेरॉक्स आदी कागदपत्रे सोबत आणावी. ऑनलाईन अर्ज सादर करून कर्जमाफी योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. तसेच फॉर्म भरताना कोणतेही शुल्क मागितल्यास 07262-248683, 9923049253, 7767010001, 9423338375, 9822744607 क्रमांकावर तक्रार करावी. तसेच अर्ज भरताना शेतकऱ्यांनी कुठलेही शुल्क देवू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे यांनी केले आहे.
                                                            ***************
महाराष्ट्र मिशन 1 मिलीयनमध्ये बुलडाणा जिल्हा विदर्भात प्रथम
·         महाराष्ट्रात जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर
              बुलडाणा, दि. 23 :   भारतात पहील्यांदाच फीफाद्वारे फुटबॉलचा 17 वर्षाखालील मुलांचा विश्वचषक आयोजित होत आहे.  जगात सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या या क्रीडा प्रकारात भारताचे रॅकींग 96 वे आहे.  फुटबॉल या क्रीडा प्रकारात आपल्या देशाने दर्जेदार कामगिरी करावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटबॉल या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी आवाहन केले आहे.  त्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेने महाराष्ट्र राज्यात फुटबॉल  या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी महाराष्ट्र मिशन 1 मिलीयन अर्थात अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय हे अभियान राबविण्यात येत आहे.  त्यानुसार राज्यातील सर्व शाळांना आपल्याकडे असलेल्या फुटबॉल या खेळाच्या सुविधा व शाळेबाबत माहिती ऑनलाईन सादर करण्यासाठी एक लींक देखील देण्यात आलेली होती. 
   जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जिल्हा फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेवून अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन केले आहे.  त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे नियोजन व त्यास जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व फुटबॉल संघटनेचे सहकार्य यामुळे जिल्ह्यातील जवळजवळ 90 टक्के शाळांनी पुढाकार घेवून सदर माहिती शासनाने दिलेल्या लींकवर ऑनलाईन सादर केली.  तसेच तालुका व जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत हिरीरीने सहभाग नोंदविला, अशी कामगिरी करणारा बुलडाणा हा विदर्भातील पहिला व राज्यातील तिसरा जिल्हा ठरला आहे.  मुंबई येथे 20 ऑगस्ट 2017 रोजी झालेल्या आढावा बैठकीत क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.  बुलडाणा जिल्ह्यात त्यामुळे फुटबॉलमय वातावरण होण्यास निश्चीतच बळ मिळणार आहे.
                या अभियानाची पुढील आयोजन म्हणून 15 सप्टेंबर 2017 रोजी संपुर्ण राज्यात एकाच वेळी सर्व शाळांमध्ये आंतरवर्ग फुटबॉलचे प्रदर्शनीय सामने खेळविण्यात येणार आहे.  तसेच ज्या शाळांनी सदर लींकवर ऑनलाईन माहिती सादर केली आहे, त्या शाळांना शासनाच्या वतीने प्रत्येकी 3 फुटबॉल देण्यात येणार आहे.  तरी सर्व संबंधीत शाळांनी आपल्या शाळेतील किमान 10 मुला-मुलींचे संघ तयार करुन त्यांच्यात फुटबॉल आंतरवर्ग सामने घेण्यासाठी पूर्वतयारी करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांना परवाना देण्याची प्रक्रीया आता ऑनलाईन
  • www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावे अर्ज
  • मागील वर्षीचा हिशेब नवीन परवानगीसाठी देणे आवश्यक
     बुलडाणा,दि‍. 23 - सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सव 2017 करिता परवाना देण्याची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे. मंडळांनी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे. मंडळांना मुंबई सार्वजनिक विश्वस्त्‍ा व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 क अन्वये सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करण्याकरिता सहायक धर्मदाय आयुक्तांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सव 2017 करिता परवाना घेणे बंधनकारक आहे. या परवान्यासाठी अर्ज ऑनलाईन सादर करावा.
   संस्था नोंदणी अधिनियम 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा 1950 अन्वये नोंद असलेल्या व ज्यांच्या उद्देशामध्ये गणेशोत्सव व नवरात्र उत्सव साजरा करणे असा उल्लेख असणाऱ्यांना संस्थांना अशी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तात्पुरत्या स्वरूपातील परवानगीसाठी अर्ज करतांना मागील वर्षी परवानगी घेतलेल्या संस्थांनी मागील वर्षीचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे.  त्याचप्रमाणे नविन परवानगी अर्ज करतेवेळी त्या-त्या क्षेत्रातील नगरसेवक, ग्रामपंचायत यांच्याकडील त्यांचे याठिकाणी गणेश उत्सव साजरा करण्यास अनुमती असल्याचे संमतीपत्र व प्रथम वर्ष असल्यास दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
    गणेशोत्सव 2017 करिता निधी गोळा करण्यासाठी परवानगी देण्याचे सुरू झाले असून ऐनवेळची गैरसोय टाळण्यासाठी अर्ज करावे. देणगीदारांनी देणगी देण्यापूर्वी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडील परवानगी प्रत पाहून खात्री करूनच देणगी, वर्गणी बाबात निर्णय घ्यावा, असे सहायक धर्मदाय आयुक्त यांनी कळविले आहे. वरील संकेतस्थळावर जावून लॉग ईन करावे. नंतर रजिस्टर युजर यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी. अपलोड करावयाच्या कागदपत्रांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सहायक धर्मदाय आयुक्त यांनी कळविले आहे.
                                                                          **********
जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत तुरीची खरेदी करण्यात येणार
·        31 मे 2017 तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तुर खरेदी
·        13 तुर खरेदी केंद्र, तुर तपासणी झालेल्या शेतकऱ्यांनी तुर विक्रीस आणावी
बुलडाणा, दि. 23 -  ज्या शेतकऱ्यांनी तुर खरेदी केंद्रावर 31 मे 2017 पर्यंत त्यांचे तुर विक्रीबाबत नोंद केलेली आहे. अशा शेतकऱ्यांची तुर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेतंर्गत 31 ऑगस्ट 2017 पर्यंत खेरदी करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात 13 तुर खरेदी केंद्र संबंधित तालुक्याच्या कृषि बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आलेली आहेत. या तुर खरेदीची कार्यवाही जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नियंत्रणात मार्केटींग फेडरेशनमार्फत सुरू असून तुर तपासणीचे कामकाज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, महसूल, कृषी विभागामार्फत सुरू  आहे. ज्या शेतकऱ्यांची तपासणी पूर्ण झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून तुर विक्रीसाठी खरेदी केंद्रावर बोलाविण्यात येत आहे.  मात्र बरेचशे शेतकरी तुर घेवून खरेदी केंद्रावर येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
शासनाने तुर खरेदीची अंतिम मुदत वाढविली असून ती 31 ऑगस्ट 2017 केली आहे. तरी तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे संपर्क साधून आपली तुर खरेदी केंद्रावर आणावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी केले आहे.
                                               
                                                                        *******





पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा,दि. 23 : कृषि व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर हे दिनांक 24 ऑगस्ट, 2017 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  दिनांक 24.08.2017 रोजी सकाळी 05.28 वाजता मुंबई येथून हावडा मेलने शेगाव येथे आगमन व शासकीय मोटारीने खामगावकडे प्रयाण,  सकाळी 06.00 वाजता खामगाव येथे आगमन व राखीव, सकाळी 10 वाजता खामगांव येथून मोटारीने बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता बुलडाणा येथे आगमन व गट शेती शासन निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीस उपस्थिती, दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती,  सोयीनुसार बुलडाणा येथून मोटारीने खामगांवकडे प्रयाण, खामगांव येथे आगमन, राखीव व मुक्काम.
                                                        *********
अपंग कल्याण राज्य पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
·                 9 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. 23 -  राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत 1982 पासून अपंग राज्य पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी 3 डिसेंबर या जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून सन 2017 साठीचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप उत्कृष्ट कर्मचारी, स्वयंउद्योजक अपंग व्यक्ती, उत्कृष्ट  नियुक्तक संस्था असे आहे.  अर्जाचे नमुने जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांच्या कार्यालयात 28 ऑगस्ट 2017 पर्यंत उपलब्ध आहेत. इच्छूक पात्र अपंग व्यक्ती, संस्था, अपंगांचे नियुक्तक यांनी 9 सप्टेंबर 2017 पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परीषद यांचे कार्यालयात सादर करावे.
   पुरस्कारामध्ये स्वयंउद्योग करणाऱ्या अपंग व्यक्ती किंवा अपंग कर्मचारी यांना उत्कृष्ट कर्मचारी/ स्वयंउद्योजक पुरस्कार देण्यात येतो. सदरचा पुरस्कार शासकीय/निमशासकीय क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्रामधील अंध, अस्थीव्यंग, कर्णबधीर व मतिमंद प्रवर्गातील व्यक्तींना देण्यात येतो. तसेच जास्तीत जास्त अपंग व्यक्तींना त्यांच्या आस्थापने नोकरी उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय/ सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्थेला उत्कृष्ट नियुक्तक म्हणून पुरस्कार दिल्या जातो. तरी पात्र अपंग व्यक्तींनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केले आहे.
                                                                        **********



No comments:

Post a Comment