Friday 21 July 2017

news 21.7.2017 DIO BULDANA

शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी)चे  22 जुलै रोजी आयोजन
  • पेपर 1 साठी 4732, तर पेपर 2 करीता 3300 परीक्षार्थी
  • 21 परीक्षा केद्रांचे नियोजन
बुलडाणा दि. 21जिल्ह्यात शनिवार 22 जुलै 2017 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा – 2017 आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचे दोन पेपर होणार आहेत. पहिला पेपर सकाळी 10.30 ते 1 या वेळेत  होणार आहे. तर दुसरा पेपर दुपारी 2 ते 4.30 या कालावधीत होणार आहे. या परीक्षेत पेपर 1 करीता 4732 व पेपर 2 साठी 3300  विद्यार्थी बसणार आहे. तसेच परीक्षेसाठी बुलडाणा, भादोला व कोलवड येथील एकूण 21  परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
    यामध्ये पेपर 1 साठी विद्याविकास विद्यालय कोलवड,महात्मा फुले प्राथमिक शाळा मुठ्ठे ले आऊट बुलडाणा, पंकज पद्धड अभियांत्रिकी महाविद्यालय बुलडाणा, शाहू अध्यापक विद्यालय सुंदरखेड, जिजामाता महाविद्यालय बुलडाणा, गांधी प्राथमिक शाळा एचडीएफसी चौकाजवळ बुलडाणा, गोडे डिएड महाविद्यालय जुना अजिसूपर रोड बुलडाणा महात्मा फुले विद्यालय नांद्राकोळी परीक्षा केंद्र आहेत. तसेच पेपर 1 व पेपर 2 करीता शिवाजी विद्यालय सुवर्ण नगर मंदीराजवळ बुलडाणा, राजीव गांधी सैनिकी शाळा अजिंठा रोड बुलडाणा, सहकार विद्या मंदीर चिखली रोड बुलडाणा,  उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इक्बाल चौक बुलडाणा,  प्रगती बीएड महाविद्यालय येळगांव बुलडाणा, मुलांची जिल्हा परिषद हायस्कूल बुलडाणा, सेंट जोसेफ हायस्कूल खामगांव रोड बुलडाणा, श्री शिवाजी हायस्कूल भादोला, शारदा ज्ञानपीठ बुलडाणा, भारत विद्यालय चिखली रोड येथील ए केंद्र व बी केंद्र,  राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनीयरींग व कॉलेज पॉलीटेक्नीक पाळणा घराजवळ बुलडाणा परीक्षा केंद्र असणार आहेत.
     परीक्षा केंद्रांची जिल्ह्यात पाच झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून पाच झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेस उपस्थित रहावे, असे आवाहन सदस्य सचिव टीईटी परीक्षा आयोजन समिती तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे.
******
शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाचे धडे मिळणार विदेशात
·         विदेश अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज आमंत्रित
·         इस्त्राईल, जर्मनी, नेदरलँड व ऑस्ट्रेलिया दौऱ्यांचे नियोजन
·         31 ऑगस्ट 2017 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावे
बुलडाणा दि. 21विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब याची माहिती होण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषि विभाग विदेशात पाठविणार आहे. संबंधित देशातील शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पन्नात आधुनिक तंत्रज्ञान वापरून वाढ केली आहे. अशाप्रकारचे तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करून शेतमालामध्ये वृद्धी करता येईल, याबाबत अभ्यास करण्यासाठी सदर विदेश दौरे काढले जाणार आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षात दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
    इस्त्राईल, जर्मनी, नेदरलँड व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये नियोजन आहे. या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 1 लक्ष रूपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान शासनामार्फत देण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्याची निवड सोडत पद्धतीने होणार आहे.  शेतकऱ्यांनी विहीत प्रपत्रातील परिपूर्ण प्रस्ताव 31 ऑगस्ट 2017 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

-प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक अटी-
प्रस्तावासोबत लाभार्थीकडे स्वत:च्या नावाचा 7/12 व नमुना 8-अ उतारा असणे आवश्यक आहे. उताऱ्यावर नोंदविलेले क्षेत्र पिकाखालील असावे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावी. शेतकऱ्याचे वय वर्ष 25 ते 60 दरम्यान असावे, त्यासाठी पुरावा म्हणून जन्मदाखला किंवा तत्सम प्रमाणपत्र सोबत असावे. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीला नसावा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार आदी व्यावसायिक नसावा. शेतकरी वैद्य पारपत्रधारक असावा. पारपत्राची वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत सेाबत जोडावी. पारपत्राची मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान 6 महिने असावी. शेतकरी कुटूंबातून केवळ एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. शेतकऱ्याने सलग 10-15 दिवस कालावधीचा परदेश दौरा संबधित देशामध्ये करण्यास शेतकरी पात्र आहेत. याबाबतचे तालुका / जिल्हा स्तरावरील आरोग्य अधिकारी किंवा तत्सम दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.
                                                                *************
ई-स्कॉलरशीपबाबत प्राचार्यांच्या बैठकीचे 25 जुलै रोजी आयोजन
बुलडाणा दि. 21 भारत सरकार ई-स्कॉलरशीप योजनेबाबत महाविद्यालयांचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम सांभाळणारे  लिपीक यांच्या बैठकीचे आयोजन 25 जुलै 2017 रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले आहे.
  या शैक्षणिक वर्षात ई-स्कॉलरशीप संगणकीय प्रणालीमध्ये शासनामार्फत आमुलाग्र बदल करण्यात येणार आहे. सन 2011-12 ते 2016-17 या कालावधीत ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रणाली मास्टेक लिमिटेड पुणे या कंपनीकडून कार्यान्वीत करण्यात येत होती. मात्र या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना कार्यान्वीत होणार आहे.  सदर पोर्टलवरील विद्यार्थी नोंदणी, महाविद्यालयीन कार्यप्रणाली या विषयी कंपनीचे प्रतिनिधी सदर नविन प्रणालीतील बदल तसेच प्रात्याक्षिक बैठकीत दाखविणार आहे. बैठकीकरीता प्राचार्य व शिष्यवृत्ती कामकाज सांभाळणारे लिपिक यांनी न चुकता दिलेल्या वेळे  बैठकीस उपस्थित रहावे,  असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.
                                                          **********
शबरी आदिवासी व वित्त विकास महामंडळामार्फत अल्प व्याजदरात कर्ज वाटप योजना
·         शबरी आदिवासी महामंडळाच्या यावल जि. जळगांव येथे प्रकरण सादर करावे
बुलडाणा दि. 21 शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक अंतर्गत यावल जि. जळगांव शाखेमार्फत आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांना स्वयंरोजगार करता यावा, यादृष्टीकोनातून त्यांना भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कर्जासाठी अल्प व्याजदर आकारण्यात येणार आहे. सक्षम महिला बचत गट व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना गोदाम बांधकाम व दुरूस्ती, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, खते व बि-बियाणे विक्री दुकान, किराणा दुकान, बंदिस्त शेळीपालन यासारख्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी बांधव व सक्षम महिला बचत गट, विविध कार्यकारी संस्था यांनी सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता शबरी आदिवासी महामंडळाच्या यावल जि. जळगांव शाखेत कर्ज प्रकरण सादर करावे.
   महामंडळाला निधी व इरादा पत्र प्राप्त झाल्यानंतर मिळालेल्या लक्षांकानुसार पात्र अर्जदारांना कर्जवाटप शाखास्तरावरून करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक आदिवासी बांधव, कार्यकारी संस्था व महिला बचत गट यांनी आपले कर्ज प्रकरणे आपले क्षेत्रातील प्रादेशिक शाखा कार्यालयास सादर करून सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
*****
वाहनधारकांनी वाहनाबाबतची कामे स्वत: येवून करावे
·         उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
·         विभागाच्या  http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करावा
बुलडाणा दि. 21 वाहनधारकांनी त्यांचे वाहनाबाबत, अनुज्ञप्तीबाबत किंवा इतर कामकाज स्वत: येवून करावे. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस आपले कामकाज देवू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी. के. तडवी यांनी केले आहे.
   नागरिकांना कार्यालयातील कामकाजाबाबात कुठलीही तक्रार असल्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. या विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विविध अर्ज, शुल्क, कर आकारणी, अपराध व दंड, खाजगी वाहन कर, कर गणना, कर सवलत, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी आदी उपलब्ध आहेत. तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
                                                                        ******
      12797 अर्जांमध्ये अस्वच्छ व्यवसायात असणाऱ्या
पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती प्रदान
बुलडाणा दि. 21 सामाजिक न्याय विभागामार्फत अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना देण्यात येते. त्यानुसार सन 2015-16 मध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयास 13 हजार 371 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 12 हजार 797 अर्जांमध्ये शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. तसेच एप्रिल 2017 पासून mahaeschol. maharashtra.gov.in  सदर संकेतस्थळ बंद असल्याने शिल्लक अर्ज पुढील वर्षातील प्राप्त तरतुदीमधून निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच 2016-17 मध्ये कमी तरतुद प्राप्त झाल्यामुळे जिल्ह्यातील कुठल्याही शाळेतील विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती देता आलेली नाही. तरी सदरची शिष्यवृत्ती ही सन 2017-18 या आर्थिक वर्षात प्राप्त  होणाऱ्या तरतुदीमधून निकाली काढण्यात येईल, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा यांनी केले आहे.
                                                                        *******
माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
बुलडाणा,दि. 21 - माजी सैनिक, युद्ध विधवा, विधवा व अवलंबित यांच्या पाल्यांकरिता शिष्यवृत्ती व विद्यावेतन योजनेतंर्गत कल्याणकारी निधीतून शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेतंर्गत इयत्ता 10 वी, 12 वी पदविका व पदवी परीक्षेत 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देता येते. अशा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणेबाबतचा अर्ज, सोबत लागणारी सर्व कागदपत्रे लवकरात लवकर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बस स्थानकाजवळ, बुलडाणा येथे सादर करावेत.
   या कागदपत्रांमध्ये पाल्याला जर अन्य महाविद्यालयाकडून किंवा कोणत्याही योजनेतंर्गत शिष्यवृत्ती मिळत असेल, तर त्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी माजी सैनिकांचे / विधवेचे पाल्य 15ऑगस्ट 1968 पर्यंत जन्मलेले चवथे व त्या नंतरच्या केवळ तीन पाल्यांनाच लागू राहणार आहे. तसेच ज्या पाल्यांनी सीईटी किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे, अशा पाल्यांच्या प्रकरणात गॅप प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.  
   तरी जास्तीत जास्त माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी व अवलंबित यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
                                                                                                ********                             

No comments:

Post a Comment