Wednesday 19 July 2017

news 19.7.2017,1 dio buldana

टाकळी हट ते खेर्डा रस्त्याच्या डांबरीकरणाचे  काम पूर्ण
·        पुर्ण झालेल्या कामाचेच देयक कंत्राटदारास अदा
·        अदा केलेल्या देयकात 4.24 लक्ष रूपये कामाचे देयकाची अदायगी
बुलडाणा, दि. 19 -  कार्यकारी अभियंता, खामगांव यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेगांव तालुक्यातील टाकळी हट ते खेर्डा या रस्त्याच्या सुटलेल्या लांबीचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू होते.  यासंदर्भात 16 व 17 जुलै 2017 रेाजी काम न करताच सदर रस्त्याच्या कामाचे देयक काढल्याची बातमी प्रकाशित झाली. या वृत्ताचे कार्यकारी अभियंता यांनी खंडन करीत खुलासा केला आहे. टाकळी हट ते खेर्डा ता. शेगांव या रस्त्याचे काम सन 2015-16 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 23.57 लक्ष एवढ्या किंमतीस  मंजूर होते. सद्यस्थितीत रस्त्याचे डांबरीकरणाचे व क्राँक्रीट रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे. रस्ता सद्यस्थितीत सुस्थितीत आहे. तसेच पुर्ण झालेल्या कामाचेच देयक कंत्राटदारास अदा करण्यात आले आहे. अदा करण्यात आलेल्या देयकामध्ये डांबरीकरण कामाचे केवळ 4.24 लक्ष एवढीच रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यामुळे या कामात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, असे कार्यकारी अभियंता, सार्व. बांधकाम विभाग, खामगांव यांनी कळविले आहे.
                                                ******
गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांविरूद्ध कठोर कारवाई
-         जिल्हाधिकारी
·        सोनोग्राफी केंद्रधारकांची एकदिवशीय कार्यशाळा
बुलडाणा दि. 19 – वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसायासोबत समाजामध्ये मुला-मुलींच्या नैसर्गिक समानता ठेवण्यासाठी सहकार्य करावे. आपली सामाजिक बांधिलकी समजून डॉक्टरांनी गर्भलिंग निदान करणाऱ्या जोडप्यांना मुलींच्या जन्माचे महत्व पटवून द्यावे. तसेच त्यांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणावेत. समाजात चांगल्याप्रमाणे काही वाईट प्रवृत्तीही कार्यरत असतात. त्यामध्ये वैद्यक व्यवसायही सुटला नाही. कुणी वैद्यकीय व्यावसायिक अवैध गर्भलिंग निदान अथवा कायद्याचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांचेवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिला.
   पीसीपीएनडीटी कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय/खाजगी सोनोग्राफी केंद्रधारकांच्या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन आय.एम.ए सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती रेवती देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोफणे, सरकारी अभियोक्ता ॲड. संतोष खत्री, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. आर मकानदार, आयएमए अध्यक्ष डॉ. एल. के राठोड, फॉग्सीचे अध्यक्ष डॉ. डी.डी कुळकर्णी, रेडीओलॉजीस्ट  डॉ. राजीव भागवत आदी उपस्थित होते.
   प्रास्ताविकामध्ये  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन म्हणाले, मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि जन्मदर वाढविण्यासाठी विविध उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहेत. प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती देशपांडे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत श्री. गोफणे यांनी आईसी ॲक्टीव्हीटीबाबत सादरीकरण करून जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराबाबत माहिती दिली. तसेच डॉ. राठोड, डॉ. भागवत, डॉ. कुळकर्णी यांनी सोनोग्राफी केंद्रधारकांच्यावतीने आपले मनोगत व्यक्त केले.
    कार्यशाळेत उपस्थित सोनोग्राफी केंद्रधारकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. कार्यशाळेला डॉ. वैशाली पडघान, डॉ. एम. ए चाटे, डॉ. बोथरा, डॉ. भवटे, डॉ. एस.आर मनवर, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एम कुटूंबे, जिल्ह्यातील स्त्री रोग तज्ज्ञ, सोनोग्राफी केंद्रधारक, एमटीपी केंद्रधारक, तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. संचलन एस. बी सोळंकी यांनी तर आभार प्रदर्शन ॲड. वंदना काकडे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता पीसीपीएनडीटी विभागातील कर्मचारी के. पी भोंडे व अन्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
                                                                        *****
अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्वयंम’ योजना
  • 25 जुलै 2017 पर्यंत अर्ज करावे
  • swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज
बुलडाणा, दि.19 -  स्वयंम योजनेतंर्गत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात विभागीय व जिल्हा स्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या-ज्या विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहाचे किंवा स्वयंम योजनेचे ऑनलाईन अर्ज भरावयाचे राहून गेले असतील, त्यांनी लगेचच www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहे.अर्ज भरावयाची शेवटची तारिख 25 जुलै 2017 आहे. यानंतर संकेतस्थळ लॉक होणार असल्यामुळे एकाही विद्यार्थ्यास अर्ज भरता येणार नाही.  
   सन 2016-17 मध्ये स्वयंम योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर त्वरित renew बटन दाबून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावा. जेणेकरून सन 2017-18 या वर्षात त्यांना स्वयंम योजनेचा लाभ घेता येईल. जे विद्यार्थी 25 जुलै 2017 च्या आत ऑनलाईन अर्ज भरणार नाहीत. त्यांना सन 2017-18 च्या स्वयंम योजनेचा लाभ घेता येणार नाही. स्वयंम योजनेच्या अर्जांच्या छाननीची जबाबदारी संपुर्णरित्या त्या-त्या महाविद्यालयाची आहे. त्याकरीता सर्व विद्यार्थ्यांनी आपआपल्या महाविद्यालयाकडून सदरील योजनेची अंमलबजावणी त्वरित व्हावी. याकरीता महाविद्यालयाच्या स्वयंम योजना सांभाळणाऱ्या संबंधिताच्या संपर्कामध्ये रहावे. जे विद्यार्थी सन 2016-17 मध्ये शासकीय वसतिगृहात प्रवेशित होते. त्यांनी त्वरिात उपरोक्त संकेतस्थळावरील renew  बटन दाबून शासकीय वसतीगृहाचा ऑनलाईन अर्ज भरावा. जेणकूरन सन 2017-18 या वर्षात त्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश घेता येईल. जे विद्यार्थी 25 जुलै 2017 च्या आत ऑनलाईन अर्ज भरणार नाहीत. त्यांना 2017-18 च्या शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर तात्काळ संपर्क करून ऑनलाईन अर्ज सादर करावे. ऑनलाईन अर्ज नोंदणीस काही अडचणी येत असल्यास त्यासाठी नजीकच्या वसतीगृहाचे गृहपाल यांचेकडे संपर्क करावा, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी कळविले आहे. 
                                                           *****
पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा दि. 19 - राज्याचे कृषि‍ व फलोत्पादन मंत्री, तथा पालकमंत्री  पांडुरंग  फुंडकर आज जिल्हा  दौऱ्यावर   आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम  पुढीलप्रमाणे :- गुरूवार, 20 जुलै 2017 रोजी  सकाळी  10 वाजता  खामगांव येथून शासकीय मोटारीने बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता  बुलडाणा  येथे  आगमन व नगर परिषद, बुलडाणा यांचेद्वारा आयोजित विविध कामांच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, सोयीनुसार बुलडाणा  येथुन  शासकीय  मोटारीने नांदुराकडे प्रयाण, रात्री 9.18 वाजता नांदुरा रेल्वे स्थानकावर आगमन व हावडा-मुंबई मेलने मुंबईकडे प्रयाण करतील.
                                                *****

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा
बुलडाणा दि. 19 - राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे आज जिल्हा  दौऱ्यावर   आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम  पुढीलप्रमाणे :- गुरूवार, 20 जुलै 2017 रोजी  दुपारी  12.15 वाजता कडवंची, जि. जालना येथून लोणारकडे प्रयाण, दुपारी 1 वाजता लोणार तहसिल कार्यालय येथे आगमन व समृद्धी महामार्गावरील संपादीत केलेल्या जमिनींची नोंदणी कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 1.30 वाजता लोणार शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 2.30 वाजता सिंदखेड राजाकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता सिंदखेड राजा येथे आगमन व समृद्धी महामार्गबाधीत शेतकऱ्यांशी चर्चा, दुपारी 3.30 वाजता सिंदखेड राजा येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.  
                                                *****


No comments:

Post a Comment