Thursday 13 July 2017

NEWS 13.7.2017 DIO BULDANA

दिव्यांग बांधवांकडून राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
  • 15 ऑगस्ट 2017 पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. 13 -  केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग बांधवांना विविध क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये उत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी, उत्कृष्ट नियोक्ता, संस्था अथवा नियुक्ती अधिकारी, दिव्यांग बांधवांसाठी काम करणारी उत्कृष्ट संस्था किंवा व्यक्ती, पुनर्वसनाच्या उत्कृष्टरित्या सुविधा पुरविणारे केंद्र, उत्कृष्ट ब्रेल मुद्रणालय, उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू यांचा समावेश असणार आहे. या पुरस्कारासाठी अर्ज हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच असणे आवश्यक आहे. त्यासोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, कार्यविवरण करणारा बायोडाटा, कार्याचे पुरावे, उत्कृष्ट कार्याचे विवरणाचा एक पानाचा मजकूर सोबत आणावा. सदर अर्ज ओ.पी डोगरा,  संचालक, दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, खोली क्रमांक 519, बी-2, पाचवा माळा,  पंडीत दिनदयाल अंत्योदया भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली- 110003 या पत्त्यावर 15 ऑगस्ट 2017 पर्यंत पाठवायचे आहेत. या पुरस्काराविषयी अधिक माहितीसाठी www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळाचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
*******
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जिल्ह्यात 5712 परीक्षार्थी
  • रविवार, 16 जुलै 2017 रोजी परीक्षेचे आयोजन
  • 17 परीक्षा केंद्रांचे नियोजन
  • विक्रीकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा
बुलडाणा दि.13 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पुर्व परीक्षा-2017  रविवार, 16 जुलै 2017 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सकाळी 10.30 ते 12 वाजे दरम्यान होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून 5712 उमेदवार बसणार आहे. तसेच परीक्षेसाठी बुलडाणा येथील 17  परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
    यामध्ये शिवाजी विद्यालय, सुवर्ण नगर येथील परीक्षा केंद्रात 600 परीक्षार्थी, एडेड हायस्कूल चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 432, सहकार विद्यामंदीर चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 456, शारदा ज्ञानपीठ चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 336, रामभाऊ लिंगाडे पॉलीटेक्नीक कॉलेज चिखली रोड परीक्षा केंद्रात 312, जिजामाता महाविद्यालय चिखली रोड परीक्षा केंद्रात 240, राजीव गांधी सैनिकी शाळा अजिंठा रोड बुलडाणा परीक्षा केंद्रात 288, सेंट जोसेफ इंग्लीश हायस्कूल भादोला परीक्षा केंद्रात 240, उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जोहर नगर बुलडाणा परीक्षा केंद्रात 240, राजर्षी शाहू पॉलीटेक्नीक शाहू नगर सागवण येथे 432 परीक्षार्थी, डॉ. राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालय जुना अजिसपूर रोड बुलडाणा येथे 144 परीक्षार्थी, भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिखली रोड येथे 408, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पाळणा घराजवळ बुलडाणा येथे 240, प्रबोधन विद्यालय जिजामाता नगर एचडीएफसी बँकेमागे बुलडाणा येथे 240 परीक्षार्थी परीक्षेस बसणार आहे. तसेच चिखली येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 480 परीक्षार्थी व देऊळघाट येथील जिल्हा परीषद हायस्कूल येथे 336 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे.
     परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षा कक्षात सकाळी 10.30 वाजता प्रवेश देण्यात येणार असून परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र व काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कॅलक्युलेटर, भ्रमणध्वनी, वह्या, पुस्तके, पेजर, मायक्रोफोन, डिजीटल डायरी आदी आक्षेपार्ह वस्तू, साहित्य परीक्षा कक्षात आणण्यास व स्वत:जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. याबाबत सर्व परीक्षार्थी उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच संबंधीत परीक्षार्थींनी त्यांचेसोबत स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा चालक परवाना यापैकी एकाची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे, असे केंद्र प्रमुख तथा आरडीसी ललीत वराडे यांनी कळविले आहे.
******
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या प्रशिक्षणाचे आयोजन
·                    17 ते 19 जुलै 2017 दरम्यान प्रशिक्षण
बुलडाणा दि.13 पेन्शन फंड रेग्युलेटरी ॲण्ड डेव्हलपमेंट ॲथोरीटी यांनी नियोजित केल्यानुसार आहरण व संवितरण अधिकारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन येाजनेसंबंधी माहिती आणि तक्रार निवारण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण आय एल ॲण्ड एफ एस स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमीटेड यांच्याकडून तज्ज्ञ प्रशिक्षक देणार आहे. त्यानुसार 17 जुलै ते 19 जुलै 2017 दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन प्रशासकीय इमारतीचे सभागृह, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे करण्यात येणार आहे.
  कार्यक्रमानुसार 17 जुलै रोजी सकाळी 10 ते 1 दरम्यान बुलडाणा कोषागार कार्यालयातंर्गत येणाऱ्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे व दुपारी 2 ते 5 दरम्यान डिडीओ कोड 6301002460 ते 6301903421 या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होईल. तसेच 18 जुलै 2017 रोजी सकाळी 10 ते 1 दरम्यान चिखली, मोताळा व मेहकर उपकोषागार कार्यालयातंर्गत येणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे व दुपारी 2 ते 5 पर्यंत लोणार, सिं.राजा व दे.राजा उपकोषागर कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. त्याचप्रमाणे 19 जुलै 2017 रोजी मलकापूर, खामगांव व नांदुरा उपकोषागार कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सकाळी 10 ते 1 दरम्यान आणि दुपारी 2 ते 5 दरम्यान जळगांव जामोद, शेगांव व संग्रामपूर उपकोषागारातंर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे.
   तरी उपरोक्त ठिकाणी प्रशिक्षणासाठी आपल्या वेळेनुसार आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषांगार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.
                                                                        ******  

अभ्यासातील सातत्य हेच स्पर्धा परीक्षेच्या यशाचे गमक..
·        भूषण अहिरे यांनी साधला परीक्षार्थ्यांशी संवाद
·        एमपीएससीच्या परीक्षेत राज्यातून प्रथम आलेले आहेत भूषण अहिरे
बुलडाणा दि.13 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत नाशिक येथील भूषण अहिरे राज्यातून प्रथम आलेले आहेत. ते बुलडाणा येथे आले असता त्यांनी जिल्हा ग्रंथालयाला सदीच्छा भेट दिली. याप्रसंगी अभ्यासिकेत प्रवेशित परीक्षार्थी विद्यार्थीनींशी त्यांनी संवाद साधला आणि स्पर्धा परीक्षेच्या यशामागील गमक सांगितले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिष जाधव, माहिती सहायक निलेश तायडे आदी उपस्थित होते.
   सर्वप्रथम भूषण अहिरे यांचे स्वागत करण्यात आले. माहिती सहायक श्री. तायडे यांनी  भूषण अहिरे यांचा परिचय करून दिला. तसेच त्यांनी केलेल्या अभ्यासतंत्राचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिष जाधव यांनी अभ्यासिकेबद्दल व ग्रंथालयासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थीनींशी भूषण अहिरे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी 14-14 तास अभ्यास करावा लागतो. मोठ्या मोठ्या बॅनरचे क्लासेस लावावे लागतात, असा बहुतांश विद्यार्थ्यांचा समज आहे. मात्र प्रत्यक्षात तुमची इच्छाशक्ती, संयम, अभ्यासातील सातत्य असणे महत्वाचे आहे. या सर्व गोष्टी आपणाकडे असतील, तर स्वत: अभ्यास करून आपण यश संपादीत करू शकतात. अभ्यासात सातत्य असणे अत्यंत महत्वाचे आहे. कुठल्याही परिस्थितीत हे सातत्य कमी होता कामा नये. केवळ 14-14 तास अभ्यास करायचा आणि सातत्य ठेवायचे नाही, यामुळे  यश प्राप्त करता येत नाही.स्पर्धा परीक्षेतील यशासाठी चौफेर वाचन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
   याप्रसंगी परीक्षार्थ्यांनी त्यांना विविध प्रश्न विचारली. या प्रश्नांची समर्पक उत्तरे देवून परीक्षार्थ्यांचे समाधान भूषण अहिरे यांनी केले. शेवटी निलेश तायडे यांनी आभार मानले. यावेळी अभ्यासिकेतील परीक्षार्थी विद्यार्थीनी, जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
                                                                                    *****


  अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 85 टक्के अनुदानावर साहित्य वितरण
·        आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. 13 -  न्युक्लीअस बजेट योजनेतंर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकरीता 85 टक्के अनुदानावर शेतीपयोगी विविध साहित्याचे वितरण करण्यात येते. त्यामध्ये काटेरी तार, टिनपत्रे व ताडपत्री, विजपंप, तेलपंप, घरकूल यांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांनी अर्ज मागितले आहेत. लाभार्थ्यांची निवड तालुका निहाय आदिवासी लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार ज्येष्ठतेप्रमाणे करण्यात येते.

   योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी कुणाही दलाल अथवा पैशाची मागणी करणाऱ्या लोकांना पैसे देवू नये. काही व्यक्ती आपली दिशाभूल करून या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवितात व पैशांची मागणी करातात. अशा व्यक्तींपासून सावध रहावे. याबाबत तक्रार असल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात यावी किंवा प्रकल्प अधिकारी कार्यालयाला अवगत करावे, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment