एचपीव्ही लस सुरक्षित; अफवांवर विश्वास ठेवू नका - जिल्हा आरोग्य विभागाचे आवाहन

 



बुलढाणा जिमाका दि.23 : महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध करण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेली एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम पूर्णपणे सुरक्षित व परिणामकारक असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली आहे.

सध्या समाजमाध्यमांवर एचपीव्ही लसीबाबत विविध अफवा पसरवल्या जात असून त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मात्र, नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत आरोग्य विभागाच्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना मोफत एचपीव्ही लस दिली जात आहे. ही लस गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून लसीकरण पूर्णतः ऐच्छिक आहे. तसेच, पालकांची संमती घेतल्यानंतरच लसीकरण करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बुलढाणा अनिल आकाळ यांनीही या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत आवश्यक असून सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी यासाठी सक्रिय सहकार्य करावे व विद्यार्थिनींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले.

एचपीव्ही लसीकरण सुविधा सर्व शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी व लसीकरणाचे प्रमाणपत्र वितरण डिजिटल पद्धतीने करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागामार्फत सर्व नागरिक आणि पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, अफवांना बळी न पडता आपल्या मुलींचे वेळेत लसीकरण करून त्यांना गंभीर आजारापासून सुरक्षित करावे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी