स्वाधार योजनाचे अर्ज १५ मार्चपर्यंत जमा करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. 9 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात
येणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजना” अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे, अशी
माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, बुलढाणा यांनी दिली आहे.
सामाजिक
न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच वसतिगृहासाठी अर्ज
करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२
वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवता यावे
यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक खर्चासाठी आवश्यक आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या
आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
दि.
६ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त
विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी दि. २६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयान्वये या
योजनेचा विस्तार तालुकास्तरावर करण्यात आला आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी ऑनलाईन
अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील सर्व माहिती अचूक भरून तो ऑनलाईन पद्धतीने
कार्यालयाकडे पाठवावा. तसेच ज्यांचे अर्ज Send Back करण्यात आले आहेत. त्यांनी अर्जातील
त्रुटी दुरुस्त करून विहित वेळेत पुन्हा सादर करावेत. अर्ज फॉरवर्ड करण्यापूर्वी बँक
खाते क्रमांक, IFSC कोड, खातेधारकाचे नाव इत्यादी तपशील अचूक भरावेत, जेणेकरून लाभाची
रक्कम वेळेत जमा करता येईल.
याशिवाय
ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे परंतु अर्जाची हार्डकॉपी व आवश्यक कागदपत्रे
अद्याप कार्यालयात जमा केलेली नाहीत, त्यांनी ती १५ मार्च २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे जमा करावीत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मनोज मेरत
यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment