संग्रामपुरात औषध विक्री केंद्रांची तपासणी; ७ जणांना नोटीस अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम

 


बुलढाणा (जिमाका), दि. ३० : संग्रामपुर तालुक्यात बेकायदेशीर औषध विक्री होत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने अचानक तपासणी मोहीम राबवून ७ औषध विक्री केंद्रांना नोटीस बजावली आहे.

सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, दि. २४ मार्च २०२६ रोजी एका वृत्तपत्रात संग्रामपुर तालुक्यात बेकायदेशीर औषध विक्री होत असल्याबाबत तसेच एका व्यक्तीने १६ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. या अनुषंगाने सहायक आयुक्त  गजानन प्रल्हाद घिरके यांनी दि. २७ मार्च २०२६ रोजी संग्रामपुर, वरवंट, बकाल व वानखेड या भागांतील औषध विक्री केंद्रांची अचानक तपासणी केली.

या मोहिमेदरम्यान एकूण १२ औषध विक्री केंद्रांची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान झोपेच्या गोळ्या, गर्भपातासाठी वापरले जाणारे एमटीपी किट्स किंवा गुंगी आणणारी औषधे आढळून आली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापि, काही केंद्रांमध्ये नियमभंग आढळल्यामुळे ७ औषध विक्री केंद्रांना औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० तसेच नियम १९४५ अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उर्वरित ५ केंद्रांकडून त्रुटी पूर्ततेबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

दरम्यान, संग्रामपुर तालुक्यातील सर्व औषध विक्रेत्यांना विना फार्मासिस्ट दुकान चालवू नये, तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या