साखळी खुर्द येथे 'जल अर्पण दिवस' उत्साहात साजरा; पाऊस पाणी संकलनावर भर देण्याचे गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांचे आवाहन

 




 

        बुलढाणा (जिमाका), दि. 17: जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे संचलन आणि जबाबदारी आता लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी देशभर 'जल उत्सव' साजरा होत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून बुलढाणा तालुक्यातील साखळी खुर्द येथे आज अत्यंत उत्साहात 'जल अर्पण दिवस' साजरा करण्यात आला. "भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रत्येकाने पाऊस पाणी संकलनावर भर द्यावा," असे आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांनी यावेळी केले.

            दिनांक 8 ते 22 मार्च दरम्यान देशभर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जल उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बुलढाणा तालुक्यातील साखळी खुर्द येथे जल अर्पण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी साखळी खुर्दचे सरपंच पंडित बळीराम हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता नितेश घुसळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

 

या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पाणीपुरवठा योजनेचे अधिकृत हस्तांतरण करणे हे होते. आता गावातील पाणीपुरवठा प्रणालीचे नेतृत्व ग्रामपंचायत आणि ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती करणार आहे. डॉ. पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की, या योजना म्हणजे समुदाय आणि सरकार यांच्यातील भागीदारीचे प्रतीक आहेत, त्यामुळे ग्रामस्थांनी त्याचे 'पालकत्व' स्वीकारणे गरजेचे आहे.

'जल अर्पण दिवसा'निमित्त गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये  पाण्याचे आणि नळ योजनेचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी पाण्यावर आधारित भारुड, गाणी आणि नृत्याद्वारे प्रबोधन केले. विद्यार्थ्यांनी गावातून फेरी काढून जल बचतीचा संदेश दिला. उपस्थितांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि भविष्यासाठी जलसाक्षर होण्यासाठी सामुहिक 'जल प्रतिज्ञा' घेतली.

             उपअभियंता नितेश घुसळकर यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जल अर्पण दिवसाचे महत्त्व विषद केले. तसेच मनीषा शेजव यांनी पाणीपुरवठा समितीचे कार्य आणि पाऊस पाणी संकल्पनेबाबत माहिती दिली. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे संदीप सुखधान यांनी जल प्रतिज्ञा वाचन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाखा अभियंता शुभम बारोटे यांनी केले. या सोहळ्यासाठी उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितेश घुसळकर, संदीप सुखधान, मनीषा शेजव, किरण शेजोळे, जया गवई आणि वर्षा खैरे यांच्या चमूने परिश्रम घेतले.

 

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी