मुलींनी एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी
Ø गर्भाशयाच्या कर्करोगापासून
संरक्षणासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात
बुलढाणा,
(जिमाका) दि. 12 : महिलांमध्ये आढळणारा गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा
गंभीर आजार असून त्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी एचपीव्ही (HPV) लस अत्यंत सुरक्षित
व प्रभावी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक
आरोग्य विभागामार्फत बुलढाणा जिल्ह्यात 8 मार्च 2026 पासून एचपीव्ही लसीकरण मोहिमेला
सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत सर्व पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींना एचपीव्ही
लस देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात
यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत 14 ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलींना
एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळविण्यासाठी
ही लस अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने पालकांनी कोणतीही भीती न बाळगता आपल्या मुलींना
ही लस द्यावी, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने
गावपातळीवर शाळा, अंगणवाडी व शासकीय आरोग्य संस्थांमार्फत जनजागृती करण्यात येत असून
लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका सक्रियपणे
कार्यरत आहेत.
पालकांनी आपल्या मुलींना जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत
किंवा शाळेमध्ये आयोजित लसीकरण सत्रात नेऊन एचपीव्ही लस द्यावी व त्यांच्या आरोग्याचे
भवितव्य सुरक्षित करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल
होणाऱ्या अफवा किंवा नकारात्मक व्हिडिओंना बळी न पडता शासनाच्या आरोग्य विभागावर विश्वास
ठेवून पात्र मुलींनी एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
000000

Comments
Post a Comment