नांदुरा येथे राज्यस्तरीय शालेय तेंग सु-डो स्पर्धांचे आयोजन

 


          14, 17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींचा सहभाग

          24 व 25 मार्च रोजी स्पर्धा

बुलढाणा जिमाका दि.23 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तेंग सु-डो स्पोर्ट्स असोसिएशन, नांदुरा यांच्या सहकार्याने नांदुरा येथे राज्यस्तरीय शालेय तेंग सु-डो क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. 24 व 25 मार्च 2026 दरम्यान छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, नगर परिषद, नांदुरा येथे पार पडणार असून 14, 17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींचा सहभाग राहणार आहे.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील विविध विभागांतून प्रत्येकी 48 मुले व 48 मुली सहभागी होणार आहेत. तसेच प्रत्येक संघासोबत प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, पंचाधिकारी व स्वयंसेवकांचा सहभाग असणार असून सुमारे 500 जणांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग अपेक्षित आहे.

स्पर्धेचा उद्घाटन समारंभ 24 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असून यावेळी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषदेचे पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, अमरावती विभागाचे उपसंचालक तसेच विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था हरसिद्धी लॉन, खामगाव रोड येथे करण्यात आली असून भोजनाची व्यवस्था स्पर्धा स्थळी करण्यात आली आहे. तसेच सभागृहात तेंग सु-डो खेळासाठी दोन एरिना (कोर्ट) तयार करण्यात आले आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्या कार्यरत असून आयोजन समिती, तांत्रिक समिती, तक्रार निवारण समिती, वैद्यकीय, निवास, भोजन, प्रसिध्दी व स्वच्छता समित्या समन्वयाने काम करत आहेत.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच तेंग सु-डो स्पोर्ट्स असोसिएशन, नांदुरा यांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, तसेच स्थानिक शाळांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा पाहण्यासाठी पाठवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन