माहिती अधिकार अर्ज संबंधित शाळेकडेच सादर करण्याचे आवाहन

 


बुलढाणा (जिमाका), दि. 5 : जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा या स्वतंत्र सार्वजनिक प्राधिकरण म्हणून घोषित असल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आवश्यक माहितीचे अर्ज संबंधित शाळास्तरावरच सादर करावेत, असे आवाहन शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 5 (1) व (2) तसेच कलम 19 नुसार प्रत्येक स्वतंत्र सार्वजनिक प्राधिकरणामध्ये सहाय्यक जनमाहिती अधिकारी, जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी संबंधित पदनिर्देशन नियुक्त्या केलेल्या आहेत. यामुळे शाळांसंदर्भातील माहिती मागविण्यासाठीचे अर्ज तसेच प्रथम अपील अर्ज हे शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद बुलढाणा या कार्यालयाकडे न करता संबंधित शाळेकडेच सादर करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, अर्जदारास माहिती न मिळाल्यास किंवा प्रथम अपील अर्जावर संबंधित शाळेच्या प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन नियमानुसार आदेश पारित न केल्यास, समाधान न झालेल्या अर्जदारांनी द्वितीय अपील राज्य माहिती आयोग, अमरावती खंडपीठ, अमरावती यांच्याकडे विहित मुदतीत सादर करावे, असेही शिक्षण विभागाने कळविले आहे. नागरिकांनी योग्य प्राधिकरणाकडेच अर्ज सादर करून माहिती अधिकार प्रक्रियेचे पालन करावे, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या