बुलढाण्यात २० मार्च रोजी 'जिल्हास्तर कन्या क्रीडा महोत्सवा'चे आयोजन

 


 

Ø  बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत मुलींसाठी विविध क्रीडा स्पर्धा; जिल्हा क्रीडा संकुल येथे रंगणार सामने

 

बुलढाणा (जिमाका)दि.16:  केंद्र पुरस्कृत 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' मोहिमेअंतर्गत मुलींच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी बुलढाणा येथे जिल्हास्तरीय कन्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हा महिला व बालविकास कार्यालय आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे या स्पर्धा पार पडतील.

 

या क्रीडा महोत्सवात मैदानी आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानी स्पर्धामध्ये १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे आणि लांब उडी तसेच वैयक्तिक खेळामध्ये बॅडमिंटन आणि बुद्धीबळ तर सांघिक खेळांमध्ये कबड्डी क्रीडा स्पर्धा होणार आहे.

 

सदर स्पर्धा १४ आणि १७ वर्षांखालील मुलींसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या मुलींचे वय १२ ते १८ वर्षे वयोगटातील असावे. तसेच खेळाडूंची जन्मतारीख ही शालेय जन्म दाखल्याच्या निकषाप्रमाणे असणे अनिवार्य आहे.

 

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि विजयी ठरणाऱ्या खेळाडूंना ट्रॉफी (करंडक) व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींना आपली क्रीडा प्रतिभा सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. क्रीडा महोत्सवात जिल्ह्यातील जास्तीत जास्त किशोरवयीन मुलींनी सहभागी व्हावे आणि शाळांनी आपल्या विद्यार्थिनींना या स्पर्धांसाठी प्रोत्साहित करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि. एस.महानकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या