बुलढाणा जिल्हा परिषदेचा ४१.२३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

 


बुलढाणा (जिमाका) दि. 25:  जिल्हा परिषद बुलढाणा यांचा सन २०२५-२६ चा सुधारित व सन २०२६-२७ चा रु. ४१ कोटी २३ लाखांचा मूळ अर्थसंकल्प सामान्य सभेत मंजूर करण्यात आला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांनी अर्थसंकल्प सादर केला असून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गुलाबराव खरात यांनी त्यास मंजुरी दिली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) कोल्हे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, जिल्हा कृषी विकास अधिकारी अंगाईत, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हा अर्थसंकल्प मुद्रांक शुल्क अनुदान, जमीन महसूल अनुदान, गुंतवणुकीवरील व्याज व इतर उत्पन्न यांचा विचार करून तयार करण्यात आला असून, जिल्हा परिषदेच्या गुंतवणुकीवरील व्याजातून उत्पन्नात वाढ झाल्याने यंदाचा अर्थसंकल्प वाढीव आहे. शासन नियमांनुसार खर्चात समाज कल्याणासाठी २० टक्के, महिला व बाल कल्याणासाठी १० टक्के, देखभाल-दुरुस्ती २० टक्के, दिव्यांग कल्याण ५ टक्के, शाळा दुरुस्ती ५ टक्के, समृद्ध पंचायत अभियान १० टक्के व ई-गव्हर्नन्ससाठी ०.५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

विभागनिहाय तरतूद पुढीलप्रमाणे :

बांधकाम विभाग – ६.७३ कोटी,

शिक्षण – ३.५८ कोटी,

सार्वजनिक आरोग्य – ५९ लाख,

ग्रामीण पाणीपुरवठा – ४.०५ कोटी,

महिला व बाल कल्याण – १.१२ कोटी,

समाज कल्याण – २.०६ कोटी,

दिव्यांग कल्याण – ८५ लाख (अनुशेष २.०८ कोटी),

कृषी – ८१ लाख,

पशुसंवर्धन – ६४ लाख,

सामान्य प्रशासन – २.९० कोटी,

वित्त – ७१ लाख,

पंचायत – ४.३१ कोटी,

लघु पाटबंधारे – १.८१ कोटी.

ठळक योजना :

‘सीईओ संग्राम योजना’ अंतर्गत १०० संवेदनशील ग्रामपंचायतींसाठी ५१ लाखांचे प्रोत्साहन.

• ‘मिशन ZEDD’ अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ५० लाखांची तरतूद; १०० विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशासाठी     कोचिंग.

• विधवा, परित्यक्ता व एकल महिलांसाठी सहाय्य अनुदान योजनेसाठी ५० लाख; सुमारे १००० महिलांना लाभ.

• बायोगॅस योजनेसाठी ४० लाख; १३ तालुक्यांतील सुमारे १३० लाभार्थ्यांना फायदा.

• २९३ अर्धवेळ स्त्री परिचारिकांसाठी गणवेश व भाऊबीज भेटीसाठी ६ लाखांची तरतूद.

• दिव्यांग कल्याणासाठी ८५ लाख तर मागील अनुशेषासाठी २.०८ कोटींची तरतूद. तसेच राजमाता जिजाऊ जयंती, संत चोखामेळा जयंती, पातुर्डा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सोहळा, सैलानी यात्रा आदी सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांसाठीही निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

या अर्थसंकल्पाद्वारे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी