२ हजार ९८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी, ३ हजार ८२७ जणांचे आधार सीडिंग प्रलंबित; प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन

 


बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांपैकी जिल्ह्यातील २ हजार ९८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी तर ३ हजार ८२७ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग (DBT Enable) प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांनी आपली प्रलंबित ई-केवायसी, आधार सीडिंग तसेच बँक खाते DBT Enable करण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे खाते DBT Enable नाही, त्यांनी India Post Payments Bank मध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून DBT Enable करून घ्यावे, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून वार्षिक प्रत्येकी ६ हजार रुपये तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत राज्य शासनाकडून वार्षिक प्रत्येकी ६,००० रुपये असे एकूण १२ हजार रुपये प्रतिवर्षी शेतकरी कुटुंबांना वितरित केले जात आहेत. या लाभासाठी ई-केवायसी व आधार सीडिंग करणे अत्यावश्यक असून, प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय तसेच तालुक्यातील ग्राम नोडल अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, जेणेकरून कोणताही पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या