टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची तात्पुरती ज्येष्ठता यादी प्रसिद्ध; २७ मार्च रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन
बुलढाणा
(जिमाका)दि.26: सर्वोच्च न्यायालय
आणि महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, बुलढाणा जिल्ह्यातील
टी.ई.टी. (TET) किंवा सी.टी.ई.टी. (CTET) उत्तीर्ण शिक्षकांची पदोन्नतीसाठीची अंतरिम
ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील त्रुटी, दुरुस्त्या आणि आक्षेपांचे
निराकरण करण्यासाठी २७ मार्च २०२६ रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा
यांच्या २४ मार्च २०२६ च्या पत्रानुसार ही तात्पुरती ज्येष्ठता यादी अंतरिम स्वरूपात
प्रसिद्ध करण्यात आली आहे. २५ मार्च रोजी ही यादी सर्व पंचायत समिती आणि गटसाधन केंद्रांच्या
नोटीस बोर्डावर तसेच शिक्षकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ज्येष्ठता यादीवर ज्या शिक्षकांचे आक्षेप असतील,
ज्यांना माहितीमध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा ज्यांचे नाव यादीत समाविष्ट करायचे
असेल, अशा सर्व शिक्षकांसाठी २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता 'श्री छत्रपती शिवाजी
महाराज सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा' येथे कार्यशाळा आयोजित केली आहे.
ज्यांनी अद्याप आपले अर्ज गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केलेले नाहीत, त्यांनी आवश्यक
पुराव्यांसह आणि लेखी अर्जासह या कार्यशाळेला स्वतः उपस्थित राहावे. तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी
किंवा त्यांच्या जबाबदार प्रतिनिधींना या कार्यशाळेत उपस्थित राहून दुरुस्त्यांचे कामकाज
पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यशाळेतील कामकाजानंतर शिक्षकांची
'अंतिम ज्येष्ठता यादी' प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे आक्षेप विचारात
घेतले जाणार नाहीत. तरी बुलढाणा जिल्ह्यातील
सर्व पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या माहितीची खातरजमा करून घ्यावी, असे
आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment