जनगणना २०२७ साठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात अचूक आणि पारदर्शक माहिती संकलनावर भर द्या - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलढाणा (जिमाका), दि. २६ : जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया
नसून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणे आखण्याचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे प्रत्येक
प्रशिक्षणार्थ्याने नियमावलीचे काटेकोर पालन करत अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह माहिती
संकलित करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी
डॉ. किरण पाटील यांनी केले.
जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर, जनगणना संचालनालय
व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचा
शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आला, त्याप्रसंगी ते
बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील,
सहायक संचालक अजय ठाकूर, सांख्यिकी अन्वेषण विशाल दिवेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी नमूद केले
की, जनगणना प्रक्रियेत वेळेचे आणि अचूकतेचे विशेष महत्त्व आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात
काम करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी इन्स्ट्रक्शन मॅन्युअलचा
सखोल अभ्यास करावा आणि आपल्या शंकांचे वेळीच निरसन करून घ्यावे. हे प्रशिक्षण टॉप-टू-बॉटम
सर्व घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळे सक्षम आणि जबाबदार मनुष्यबळ तयार होईल,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने
आयोजित केलेल्या या विशेष प्रशिक्षण शिबिराला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे.प्रत्यक्ष
क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार
आहे. या शिबिरातून सक्षम, सजग आणि जबाबदार मनुष्यबळ तयार होऊन आगामी जनगणना अधिक प्रभावीपणे
राबविता येईल.
प्रशिक्षणादरम्यान जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने
समजावून सांगण्यात आली. डिजिटल साधनांचा वापर, मोबाईल अॅपद्वारे माहिती संकलन, डेटा
एंट्रीतील अचूकता आणि माहितीची गोपनीयता राखण्याचे नियम यावर विशेष भर देण्यात आला.
तसेच प्रत्यक्ष क्षेत्रात येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन
करण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण अधिक
प्रभावी केले. प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष सरावाची संधी देण्यात आली. विविध परिस्थितींमध्ये
कसे कार्य करावे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. सहभागींच्या शंकांचे निरसन करण्यात
आले.
0000


Comments
Post a Comment