कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी अनुदान ; अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन
बुलढाणा (जिमाका), दि. 04 : देशाला कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या
उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी “कडधान्य आत्मनिर्भरता अभियान”जाहीर केले आहे. अभियानांतर्गत कडधान्य
प्रक्रिया युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल २५ लाख प्रति युनिट इतके
अनुदान दिले जाणार आहे. इच्छुक वैयक्तिक अर्जदार, संस्था, महासंघ व शेतकरी बांधवांनी
काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत,
असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
सन २०२५-२६ ते २०३०-३१
या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाची अंमलबजावणी राज्यात रब्बी हंगाम २०२५-२६
पासून सुरू झाली आहे.अभियानांतर्गत तूर, उडीद व मसूर या प्रमुख कडधान्य पिकांवर विशेष
लक्ष केंद्रित करण्यात येणार असून उत्पादनवाढीसोबतच मूल्यवर्धनावर भर देण्यात येणार
आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने काढणीपश्चात पायाभूत सुविधा बळकट
करण्यावरही विशेष भर देण्यात येत आहे.
सन २०२६-२७ या वर्षात
काढणीपश्चात प्रक्रिया युनिट (Processing Unit) स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात
येणार आहे. या घटकासाठी वैयक्तिक अर्जदार, शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), क्लस्टर स्तर
महासंघ (CLFs), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) तसेच महाराष्ट्रातील विविध कायद्यांअंतर्गत
नोंदणीकृत उपक्रम व संस्था पात्र राहतील. योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के,
कमाल रु. २५ लाख प्रति युनिट इतके अनुदान देय राहणार आहे. त्यामुळे कडधान्य प्रक्रिया,
स्वच्छता, ग्रेडिंग, पॅकेजिंग आदी सुविधा उभारून स्थानिक स्तरावर मूल्यवर्धनाला चालना
मिळणार आहे.
इच्छुक वैयक्तिक
अर्जदार, FPOs, CLFs, PACS व शेतकरी बांधवांनी काढणीपश्चात प्रक्रिया युनिट घटकाचा
लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. घटकाच्या
अंमलबजावणीसंदर्भात कृषी विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचना लागू
राहतील. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment