बुलढाणा जिल्ह्यात 'जल उत्सवा'चा जागर; साखळी खुर्द व गारगुंडी येथे 'जल अर्पण' सोहळा

 


Ø  ८ ते २२ मार्च दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन; मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांचे सक्रिय सहभागाचे आवाहन

 

बुलढाणा, (जिमाका) दि. 16 :ग्रामीण भागात 'जल जीवन मिशन' अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना आता पूर्णत्वाकडे गेल्या असून, या योजनांचे व्यवस्थापन थेट ग्रामस्थांच्या हाती सोपवण्यासाठी जिल्ह्यात 'जल उत्सव' साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून बुलढाणा तालुक्यातील साखळी खुर्द येथे १७ मार्च रोजी, तर देऊळगाव राजा तालुक्यातील गारगुंडी येथे १८ मार्च रोजी 'जल अर्पण दिवस' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी आपल्या गावच्या पाणीपुरवठा प्रणालीचे संरक्षक म्हणून पुढाकार घ्यावा आणि या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.

 

ग्रामीण भारतात जल जीवन मिशन अंतर्गत उभारलेल्या सुविधा आता संचालन आणि देखभाल दुरुस्तीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहेत. या योजना पूर्ण झाल्यानंतर त्यांचे हस्तांतरण काळजीपूर्वक आणि स्पष्टतेने होणे आवश्यक आहे, जेणेकरून पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती आणि समुदायाच्या हाती येईल. यासाठीच ८ ते २२ मार्च दरम्यान देशभरात 'जल उत्सव' साजरा करण्यात येत आहे.

 

तांत्रिक व संस्थात्मक पूर्वतयारीवर भर: ज्या गावांमध्ये 'हर घर जल' घोषित झाले आहे, अशा ठिकाणी जल अर्पण दिवसासाठी विशेष तांत्रिक पूर्वतयारी करण्यात आली आहे. यामध्ये नळ पाणीपुरवठा योजनेची १५ ते ३० दिवसांची चाचणी, योजनेच्या भागांची पडताळणी, फिल्ड टेस्ट किटद्वारे पाणी गुणवत्तेची तपासणी आणि दस्तऐवजीकरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बँक खात्यासह पाणीपुरवठा स्वच्छता समिती कार्यान्वित करणे, ऑपरेटर व नल जल मित्र यांचे प्रशिक्षण आणि स्त्रोत शाश्वतता आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

 

विविध जनजागृती उपक्रम: या उत्सवाच्या निमित्ताने ग्रामसभा घेणे, पीआरएचे (PRA) आयोजन करणे, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक व युवक यांचा सुरक्षित पाणी व्यवस्थापनात सहभाग नोंदवणे, असे उपक्रम राबविले जाणार आहेत. साखळी खुर्द व गारगुंडी येथील कार्यक्रमात जल पूजन, नळ पूजन, जल प्रतिज्ञा, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

 

साखळी खुर्दचे सरपंच पंडित बळीराम हिवाळे, ग्रामपंचायत अधिकारी ज्योती मगर, तसेच गारगुंडीचे सरपंच गजानन काकड व ग्रामपंचायत अधिकारी नितीन अंभोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मोहिमेसाठी जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक सतीश देशमुख आणि कार्यकारी अभियंता अनिल चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संबंधित तालुक्यांचे गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे अभियंते या प्रक्रियेत सक्रिय योगदान देत आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन