जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचा एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक संदेश; आरोग्य सेविकेचा पुढाकार; एचपीव्ही लसीकरणावर वाढला विश्वास

 

 

बुलढाणा (जिमाका) दि.27: प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळखेड येथे एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत सकारात्मक व प्रेरणादायी संदेश देणारी घटना घडली असून, आरोग्य सेविका (ANM) वर्षा नागरे यांनी स्वतःच्या मुलीला HPV लस देऊन समाजात विश्वास निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे.

ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अनेकदा भीती, अफवा व गैरसमज आढळून येतात. या पार्श्वभूमीवर वर्षाताई नागरे यांनी स्वतःच्या कृतीतून आधी केले मग सांगितले या तत्त्वाचा अवलंब करत नागरिकांसमोर विश्वासार्ह उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे परिसरातील पालकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी आपल्या मुलींच्या लसीकरणाबाबत पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.

HPV (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) हा संसर्गजन्य विषाणू असून, त्यातून पुढे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून HPV लसीकरण अत्यंत प्रभावी मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, 9 ते 14 वयोगटातील मुलींना ही लस दिल्यास भविष्यातील धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

आरोग्य विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, शाळा, अंगणवाडी व गावपातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. आशा वर्कर, ANM आणि आरोग्य कर्मचारी घरभेटीद्वारे पालकांना समुपदेशन करत आहेत.

यावेळी वर्षा नागरे म्हणाल्या, लसीकरणाबाबत भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. मी माझ्या स्वतःच्या मुलीला लस दिली आहे, कारण तिचे आरोग्य माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी हा निर्णय घ्यावा. तसेच, संबंधित जनजागृतीपर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचेल आणि गैरसमज दूर होतील.

आरोग्य विभागाने स्पष्ट केले की, HPV लस सुरक्षित, प्रमाणित व प्रभावी असून ती शासनाच्या आरोग्य सेवांद्वारे उपलब्ध आहे. पालकांनी पुढाकार घेऊन पात्र मुलींचे वेळेत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आज घेतलेला योग्य निर्णय उद्याच्या आरोग्यदायी आयुष्याची हमी ठरतो, असा संदेश देत आरोग्य विभागाने नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या