नांदुरा येथे राज्यस्तरीय शालेय तेंग सु-डो क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

 


 

            बुलढाणा (जिमाका) दि.25: क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तेंग सु-डो स्पोर्ट्स असोसिएशन, नांदुरा यांच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्याने राज्यस्तरीय शालेय तेंग सु-डो (१४, १७ व १९ वर्षांखालील मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन २४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 

            नांदुरा येथील नगर परिषदेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन शहराच्या प्रथम नागरिक आणि नगराध्यक्षा मंगलाताई सुधीरजी मुऱ्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आदित्यकुमार सिंह, पोलीस निरीक्षक पावरा, मुख्याधिकारी मिलिंद दरोकार, जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस. महानकर, तेंग सु-डो असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रॉकी डिसोजा आणि स्थानिक असोसिएशनचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुऱ्हेकर उपस्थित होते. तसेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी रामभाऊ कोलते, सचिव अनिल अंबुसकर, उपाध्यक्ष विजय अंबुसकर यांच्यासह राज्यभरातील क्रीडा अधिकारी व तांत्रिक पंचांची उपस्थिती होती.

 

भव्य रॅली आणि शिस्तबद्ध नियोजन

            स्पर्धेच्या प्रारंभी नांदुरा शहरातून खेळाडूंची भव्य रॅली काढण्यात आली, ज्याने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्व. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय खेळाडू किरण अंबुसकर याने सर्व सहभागी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली.

 

महाराष्ट्रातील विविध विभागांतून सुमारे ५०० खेळाडू, संघ व्यवस्थापक आणि पंच सहभागी झाले आहेत. खेळाडूंसाठी प्रथमच वातानुकूलित (AC) निवास व्यवस्था आणि उत्तम भोजनाची सोय करण्यात आली आहे, ज्याचे खेळाडू व पालकांनी कौतुक केले. आमदार चैनसुख संचेती यांनी या स्पर्धेसाठी स्थानिक विकास निधीतून ५ लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

            जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस. महानकर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. आदित्यकुमार सिंह आणि रॉकी डिसोजा यांनी खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय अंबुसकर यांनी मानले.

 

            या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी लक्ष्मीकांत यादव, मिलिंद काटोलकर, प्रशांत मंडले, संदीप केळे, डॉ. जीवन मोहोड आणि तेंग सु-डो असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. ही स्पर्धा २५ मार्चपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या