अमडापूर येथे 8 मार्चला एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
* 14 ते 15 वर्षांच्या मुलींसाठी लसीकरण
* नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : महिलांमधील गर्भाशय मुखाच्या (Cervical
Cancer) कर्करोगापासून संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत
राज्यभर विशेष एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय
शुभारंभ 8 मार्च 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र अमडापूर (ता. चिखली) येथे जिल्हाधिकारी
डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते होणार असून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांची
प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन
व आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या
मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय
बिराजदार तसेच जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांच्या समन्वयातून
जिल्हाभर तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना
एचपीव्ही लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र मुलींना लसीकरणाचा लाभ मिळावा
यासाठी शाळा व आरोग्य संस्थांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. एचपीव्ही
लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच
शाळांमध्ये विशेष सत्रांद्वारे लसीकरण उपलब्ध असणार आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते ह्युमन पॅपिलोमा व्हायरस
(HPV) हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. एचपीव्ही लस घेतल्यास या कर्करोगापासून
प्रभावी संरक्षण मिळते. लसीकरणानंतर लाभार्थींना 30 मिनिटे निरीक्षणाखाली ठेवले जाते.
काही वेळा हलका ताप किंवा इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणे अशी सौम्य लक्षणे दिसू शकतात,
जी साधारणतः 2 ते 3 दिवसांत आपोआप कमी होतात.
सध्या समाजमाध्यमांवर या लसीकरण मोहिमेबाबत दिशाभूल
करणारे व अफवा पसरवणारे काही व्हिडिओ प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे
नागरिकांनी अशा अफवा व नकारात्मक प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत
करण्यात आले आहे.
आपल्या मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी
14 वर्ष वयोगटातील सर्व मुलींना एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात गर्भाशय
मुखाच्या कर्करोगापासून त्यांचे संरक्षण होईल. जिल्हा आरोग्य विभागामार्फत ही मोहीम
यशस्वी करण्यासाठी सर्व आवश्यक नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य
करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य
केंद्राशी संपर्क साधावा.
0000
Comments
Post a Comment