हिवरखेड पूर्णा वाळू डेपोतून ऑनलाईन वाळू विक्री सुरू; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे नागरिकांना आवाहन

 


 

बुलढाणा (जिमाका), दि. 5 : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे हिवरखेड पूर्णा वाळू घाटातील वाळू आता नागरिकांना शासकीय दरात उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आवश्यक असलेली वाळू अधिकृतरीत्या प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या १६ फेब्रुवारी २०२४ च्या धोरणानुसार, मौजे टाकरखेड वायाळ येथील गट क्रमांक २७५ मध्ये उभारण्यात आलेल्या वाळू डेपोतून ही विक्री केली जाणार आहे. या वाळूचा दर प्रति ब्रास १२३० रुपये निश्चित करण्यात आला असून, यामध्ये मंजूर निविदा दर ५५३.५० रुपये, ६०० रुपये स्वामित्वधन, ६० रुपये जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधी आणि १६.५२ रुपये एसआयई शुल्काचा समावेश आहे. वाळू वाहतुकीचा खर्च मात्र ग्राहकांना स्वतः करावा लागणार आहे. 

 

नागरिकांनी वाळू नोंदणीसाठी 'महाखनिज' प्रणालीचा वापर करावा, ज्यासाठी सेतू सुविधा केंद्र, ई-महासेवा केंद्र किंवा https://mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'SAND BOOKING' या पर्यायाची सोय उपलब्ध आहे. ही नोंदणी सुविधा दिनांक ६ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेपासून कार्यान्वित होणार आहे. ग्राहकांनी वाळूची मागणी नोंदवल्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित ट्रान्सपोर्टरशी संपर्क साधून वाळू नेणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यानंतर शासन जबाबदार राहणार नाही, असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 

00000

Comments