जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; 16 मार्चपर्यंत मुदतवाढ

 

बुलढाणा (जिमाका), दि. 4 : जिल्ह्यातील युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तर युवा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. सदर पुरस्कार ल्ह्यातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहे. यासाठी यापूर्वी 28 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. मात्र, संस्थेचे 2 व वैयक्तिक 1 असे तिनच प्रस्ताव प्राप्त झाल्याने इच्छुकांकडून प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून 16 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे अंतर्गत राज्याचे युवाधोरण २०१२ अन्वये दि. १२ नोव्हेंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार पात्र युवक-युवती व संस्थांनी आवश्यक कागदपत्रे, शासन निर्णयानुसार पात्रतेचे पुरावे, मुल्यांकनासंबंधी सबळ कागदपत्रे तसेच युवक-युवतींसाठी पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र आणि संस्थांसाठी सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र जोडून आपला संपूर्ण प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  लक्ष्मीशंकर यादव यांनी केले आहे.

युवक व युवतींसाठी पात्रतेचे निकष : अर्जदाराचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी किमान १३ वर्ष पूर्ण व ३१ मार्च रोजी कमाल ३५ वर्षांपर्यंत असावे, संबंधित जिल्ह्यात सलग किमान पाच वर्ष वास्तव्य असावे, केलेल्या कार्याचे सबळ पुरावे (वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्रे, छायाचित्रे, चित्रफिती इ.) जोडणे आवश्यक, पुरस्कारानंतर किमान दोन वर्ष कार्यरत राहण्याचे हमीपत्र व कार्य स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. शासकीय/निमशासकीय अधिकारी-कर्मचारी व विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन प्राध्यापक/कर्मचारी पात्र राहणार नाहीत, पोलीस विभागाकडून प्रमाणित चारित्र्य दाखला अनिवार्य.

संस्थांसाठी पात्रतेचे निकष : संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० नुसार नोंदणीकृत असावी. नोंदणीनंतर किमान पाच वर्ष कार्यरत असणे आवश्यक, कार्याचे सबळ पुरावे जोडणे बंधनकारक, पुरस्कारानंतर किमान दोन वर्ष कार्यरत राहण्याचे हमीपत्र आवश्यक, संस्थेच्या सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक.

पुरस्कारासाठी मुल्यांकन निकष : दि. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत गत तीन वर्षांतील कार्य कामगिरी विचारात घेतली जाईल, ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक कार्य, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी व दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, रोजगार, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान आदी क्षेत्रातील योगदान, राष्ट्रीय एकात्मता, आपत्ती व्यवस्थापन, नागरी वस्ती सुधारणा आदी क्षेत्रातील कार्य.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या