20 टक्के सेसफंड योजनेतील लाभार्थ्यांनी 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करा; जिल्हा परिषद प्रशासनाचे आवाहन

 


बुलढाणा (जिमाका) दि. 17 : सेसफंड योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे, त्यांनी संबंधित योजनाचे साहित्य खरेदी करून दि. 20 मार्च 2026 पर्यंत पंचायत समिती स्तरावर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशसनाव्दारे करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या 20 टक्के सेसफंड योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण भागातील मागासवर्गीय शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर 5 एच.पी. विद्युत मोटार पंप तसेच ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांसाठी शिलाई मशीन पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेसाठी पंचायत समिती स्तरावर प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली असून, पात्र व परिपूर्ण अर्जांची ईश्वर चिठ्ठी पद्धतीने दि. 12 मार्च 2026 रोजी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलडाणा येथे अर्जदारांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित पंचायत समितींना पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे, त्यांनी संबंधित योजनेचे साहित्य खरेदी करून दि. 20 मार्च 2026 पर्यंत पंचायत समिती स्तरावर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

सादर करावयाच्या कागदपत्रांमध्ये जीएसटी बिल, प्रतिज्ञापत्र, स्थळ पाहणी अहवाल (साहित्यासह फोटो) तसेच इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे. निर्धारित मुदतीत कागदपत्रे सादर केल्यास लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळणे सुलभ होईल. विहीत मुदतीत देयके सादर करून कोणताही लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गुलाब खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रमोद यंडोले यांनी केले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन