बुलढाणा जिल्हा कारागृहात जीवनविद्या मिशनची मानसिक सबलीकरण कार्यशाळा
बुलढाणा (जिमाका), दि. 5 : बंदीजनांच्या मानसिक सबलीकरण व सकारात्मक परिवर्तनासाठी जीवनविद्या मिशनच्या
वतीने बुलढाणा जिल्हा कारागृह येथे प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी
बंदीजनाना मान्यवरांव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यशाळा कारागृह
व सुधारसेवा अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक
योगेश देसाई व पूर्व विभाग नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांच्या प्रेरणा
व मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक मेघा शंकर बाहेकर
उपस्थित होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जीवनविद्या मिशनचे काशिनाथ पवार, निलेश पोपळे,
गजानन उमाळ, विजय तराळे आणि संदीप तायडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला
तुरुंग अधिकारी उमेश नाईक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. गजानन उमाळे यांनी उपस्थित
मान्यवरांचा परिचय करून दिला. निलेश पोकळे यांनी योग व प्राणायामाचे महत्त्व सांगत
बंदीजनांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते काशिनाथ
पवार यांनी जीवनविद्या मिशनचे महत्त्वपूर्ण सूत्र “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” याचा अर्थ स्पष्ट करत बंदीजनांना जीवनाकडे
सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, माणसाचे सुख-दुःख
नशिबावर अवलंबून नसून ते त्याच्या विचारांवर आणि कृतींवर अवलंबून असते. विचारांमध्ये
सकारात्मक बदल घडवून आणल्यास नशिबही बदलू शकते, असा आशावादी संदेश त्यांनी दिला.
कार्यशाळेमुळे बंदीजनांमध्ये
सकारात्मकता निर्माण होऊन त्यांच्या मानसिक सबलीकरण व व्यक्तिमत्व परिवर्तनास चालना
मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कारागृहाचे सुभेदार दरेसिंग चव्हाण, सतीश
भराड, विशाल राजगुरू, सुनील बीबे आदींनी विशेष परिश्रम घेतले. अधीक्षक मेघा बाहेकर
यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
000000
Comments
Post a Comment