विशेष लेख : उष्माघात टाळा, आरोग्य सांभाळा; प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करा
सध्या उन्हाळा सुरु झाला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. भारतात हवामान
खाते व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निकषानुसार मैदानी भागात 40
डिग्री अंश सेल्सीअस, डोंगराळ भागात 30 डिग्री अंश सेल्सीअसपेक्षा व समुद्र किनारी
भागात 37 अंश डिग्रीपेक्षा जास्त तापमान जात असल्यास त्यास उष्मलाट प्रवण क्षेत्र मानले
जाते. उष्मा-लहर ही वातावरणीय तापमानाची स्थिती आहे. ज्यामुळे शारीरिक ताण येतो, ज्यामुळे
कधीकधी मानवी जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होत असतो. कोणत्याही ठिकाणचे कमाल तापमान
सलग दोन दिवस 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्यास त्याला उष्मा लहरी स्थिती म्हणतात.
वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता नाकारता
येत नाही. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी,
उपाययोजना याची माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्यात येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढत आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा
पारा पुढील तीन महिने 42 ते 45 अंशांच्या घरात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात.
त्यामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे उष्माघाताचा
लोकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक
आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू
केले आहेत. उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन यासह
औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उष्माघाताची लक्षणे व घ्यावयाची काळजी : उन्हाळा सुरु झाला की, उन्हात फिरल्यामुळे
डोके दुखी, ताप, जास्त घाम येणे आणि बेशुद्ध पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे,
नाडी असामान्य होणे लक्षणे दिसून येतात. असे लक्षणे आढळल्यास व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी
झोपवा, त्रास झालेल्या मुला,मुलीला लगेच घरात किंवा सावलीत आणावे, संवेदनशील राहुन
त्यांचे कपडे सैल किंवा ढिले करावेत, नळाच्या पाण्याने ओल्या केलेल्या पट्ट्या शरीरावर
ठेवाव्यात, उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे. जेणेकरुन ते गुदमरुन जाणार
नाहीत, हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा, पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवुन त्यांना
आडवे पडायला सांगावे, वारंवार स्वच्छ आणि थंड पाण्याचे घोट पाजावेत, बेशुद्ध असल्यास
त्यांना खायला किंवा प्यायला काहीही देण्याचा प्रयत्न करु नये.
उष्माघाताची प्रौढांमध्ये दिसणारी लक्षणे :
शरीराचे तापमान 104 फॅरन्हाईटपर्यत (40 डिग्री सेल्सिीअस) पोहोचल्यास स्नायुंचे
आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे
व चक्कर येणे हृद्याचे ठोके वाढणे, धडधडणे.
उष्माघाताची लहान मुलांमध्ये लक्षणे
: आहार घेण्यास नकार देणे, नियीमत चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, कुठूनही
रक्तस्त्राव होणे, तोंडाच्या येथील त्वचा कोरडी होणे, शुष्क डोळे होणे.
उष्णतेच्या
लाटेदरम्यान काय करावे : हलके खावे, फळे आणि सलाड सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे,
पुरेसे पाणी प्या, सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत. गॉगल, छत्री,
टोपी, बुट, चप्पल घालूनच घराबाहेर पडावे. प्रवास करतांना पाण्याची बाटली आपल्याजवळ
बाळगावी. थंड पाण्याने आंघोळ करावी. घराबाहेरील उपक्रम, मैदानी उपक्रमादरम्यान थोड्या-थोड्या
वेळाने विश्रांती घ्यावी. विश्रांतीची वारंवारता वाढवावी.
उष्माघातापासुन बचावासाठी काय करावे : घराबाहेर जाण्यापुर्वी भरपुर पाणी प्यावे,
सुती, सैल आणि आरामदायी कपडे घाला. भरपुर ताजे अन्न खाल्यानंतरच घरातुन बाहेर पडा.
घराबाहेर जातांना डोके झाका किंवा छत्रीचा वापर करा. पाणी, ताक, ओ.आर.एस पाण्याचे द्रावण किंवा लस्सी,
निंबुपाणी, आंबा, पन्हे इत्यादी पेय घ्या.
उष्माघातापासुन बचावासाठी काय करू नये : रिक्याम्या पोटी घराबाहेर पड्डु नका,
उन्हात अधिकवेळ राहु नका, तिखट, मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नका, नेहमी पाणी सोबत ठेवा,
शरिरात पाण्याची कमतरता कमी पड्डु देवु नका. उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत
करत असतांना या गोष्टीचा अवलंब करावा. संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी तातडीने हलवावे.
शरिराच्या जास्तीत जास्त भागांवर किंवा कपड्यावर थंड पाण्याचा मारा करावा. शक्य असेल
तेव्हढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा. शरिराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेली,
घाम येणे, थांबलेली अशी आपल्या नजरेस आल्यास टोल क्रमांक 108 किंवा 102 या क्रमांकावर
संपर्क साधावा.
उष्माघात ही गंभीर स्थिती असून वेळीच उपचार
न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. त्याची लक्षणे ओळखून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना
करणे महत्त्वाचे आहे. गरम वातावरणात स्वतःची काळजी घेणे आणि इतरांनाही सावध करणे गरजेचे
आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी तीव्र उन्हात फिरु नये, आरोग्याची काळजी
घ्यावी. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी वरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी केले आहे.
: संकलन :
श्री. सतिश आनंदराव बगमारे, माहिती सहायक,
जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा
0000000
Comments
Post a Comment