जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; १५ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


बुलढाणा (जिमाका), दि. ३० :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्ह्यातील युवक-युवती व संस्थांच्या समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी आपले प्रस्ताव १५ एप्रिल २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

 

दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांतर्गत जिल्ह्यातील एक युवक, एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजाभिमुख कार्य करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देणे व युवा विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

पात्रता निकष (युवक/युवती):

अर्जदाराचे वय १ एप्रिल रोजी किमान १३ वर्षे पूर्ण व ३१ मार्च रोजी कमाल ३५ वर्षांपर्यंत असावे. संबंधित जिल्ह्यात सलग किमान पाच वर्ष वास्तव्य आवश्यक आहे. अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे (वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, फोटो, व्हिडिओ) जोडणे बंधनकारक आहे. तसेच पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र आणि विविध हमीपत्रे सादर करणे आवश्यक राहील.

 

पात्रता निकष (संस्था): संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० नुसार नोंदणीकृत असावी व किमान पाच वर्षे कार्यरत असावी. संस्थेच्या कार्याचे पुरावे तसेच सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.

 

मूल्यांकनाचे निकष: गत तीन वर्षांतील (१ एप्रिल ते ३१ मार्च) कार्याचा आढावा घेऊन पुरस्कारासाठी निवड केली जाईल. ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा, राष्ट्रीय एकात्मता, आपत्ती व्यवस्थापन आदी क्षेत्रांतील योगदान विचारात घेतले जाणार आहे.

 

इच्छुक युवक, युवती व संस्थांनी अर्जाचे नमुने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, जांभरुन रोड, बुलढाणा येथून प्राप्त करून घ्यावेत. आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दोन प्रतींमध्ये १५ एप्रिल २०२६ पर्यंत कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या