क्षयरोगमुक्त जिल्ह्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा -मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात

 








बुलढाणा (जिमाका), दि. 24 : क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार असून वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे निरोगी होऊ शकतो. क्षयरोग संदर्भात ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले.

जिल्हा परिषदच्या शिवाजी महाराज सभागृहात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित टिबी मुक्त ग्रामपंचायत तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल  गिते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वर्षा गट्टे, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर खेरोडकर आदी उपस्थित होते.  अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

क्षयरोगाची लक्षणे सुरुवातीला साधी वाटत असली तरी ती दुर्लक्षित केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे क्षयरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग, प्रशासन आणि नागरिक यांचा सहभाग महत्त्वाचा असून सर्वांनी एकत्र येऊन जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. क्षयरोगमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले.

2030 पर्यंत क्षयरोग मुक्तीचे ध्येय जागतिक आरोग्य संघटनेच्या उद्दिष्टानुसार क्षयरोग मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत.  क्रेद्र शासनाने ‘क्षयरोग मुक्त पंचायत या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली होती. या अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य तपासणी, जनजागृती आणि रुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबविली.

जिल्ह्यात सन 2025मध्ये एकूण 2 हजार 498 क्षयरुग्ण आढळले होते, तर जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान 497 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी आणि जलद निदानासाठी जिल्ह्यात अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यात डिजिटल हॅन्डहेल्ड एक्स-रे मशीन्स व CBNAAT मशीन्स आणि ११ TrueNAAT या यंत्रांच्या सहाय्याने ग्रामीण भागातही क्षयरोगाचे अचूक निदान करणे शक्य झाले आहे.

जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून 2025 सालामध्ये राबवण्यात आलेल्या ‘क्षयरोग मुक्त पंचायत अभियानात बुलढाणा जिल्ह्यातील 326 ग्रामपंचायतींनी निकषांची पूर्तता केली असून, त्यापैकी 22 ग्रामपंचायतींना मानाचा ‘सुवर्ण (Gold) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  तसेच लोकसहभागातून टीबी मुक्त भारत अभियान पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ‘निक्षय मित्रांच्या माध्यमातून 7 हजार 166 फूड बास्केटचे (पौष्टिक आहार) वाटप रुग्णांना करण्यात आले आहे. या मदतीमुळे रुग्णांच्या उपचाराला गती मिळत आहे.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सन २०२५ मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल क्षयरोग पथक बुलढाणा व शेगाव यांना प्रथम क्रमांक, संग्रामपूर व लोणार पथकांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच ‘निक्षय मित्र म्हणून मेहत्रे हॉस्पिटल व लद्धड हॉस्पिटल यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन इंगळे यांनी तर आभार सिद्धेश्वर सोंळकी यांनी मानले.

000000

Comments