आशियाई लेक्रॉस स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून सत्कार

 



बुलढाणा(जिमाका) दि. २५:  सौदी अरेबियातील रियाध येथे संपन्न झालेल्या आशियाई लेक्रॉस स्पर्धेत (Asian Lacrosse Championship) अजिंक्यपद मिळवून देशाचा तिरंगा फडकवणाऱ्या भारतीय संघाचा आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी गौरव केला. नवी दिल्ली येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी हा सत्कार सोहळा पार पडला.

भारताची ऐतिहासिक कामगिरी

            सौदी अरेबियातील रियाध येथे १ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान आशियाई लेक्रॉस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इराकविरुद्ध ९-२ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या संघात देशभरातील १८ गुणवंत खेळाडूंचा समावेश होता.

विजेत्या संघाला आपल्या दिल्ली येथील निवासस्थानी आमंत्रित करून प्रतापराव जाधव यांनी सर्व खेळाडूंशी जिव्हाळ्याने संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक केले.

याप्रसंगी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की, आज भारत देश सर्वच क्षेत्रांत जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. खेळ क्षेत्रात तुम्ही केलेली ही कामगिरी भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि बहुमोलाची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव रोशन करणाऱ्या तुमच्यासारख्या खेळाडूंमुळेच भारताची मान उंचावते. केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी संपूर्ण संघाचे अभिनंदन करून त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुवर्णपदक विजेत्या या संघात विविध राज्यांतील खेळाडूंचा समावेश असून, त्यांच्या या यशाबद्दल देशभरातून कौतुक होत आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या