DIO BULDANA NEWS 10.06.2024



 एआरटी सेंटरला 20 वर्षे पूर्ण

*उत्कृष्ट कार्याबद्दल कर्मचाऱ्यांचा गौरव

बुलडाणा, दि‍. 10 : बुलडाणा येथील एआरटी सेंटरला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. 20 वर्षे अविरत सेवा दिल्याबद्दल केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांचा प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भागवत भुसारी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद टाले, जिल्हा पर्यवेक्षक गजानन देशमुख, रणजीतसिंग राजपूत उपस्थित होते. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लता भोसले आणि कर्मचाऱ्यांनी स्मृतिचिन्ह स्विकारले.

डॉ. भुसारी यांनी केंद्र आणि विहान प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच केंद्रातील औषधांचे सातत्य आणि नवीन एचआयव्ही संक्रमनाचे प्रमाण कमी झाले, अशी माहिती दिली. डॉ. लता भोसले यांनी मार्गदर्शन केले.

विदर्भ रिजनल डाटा मॅनेजर विदर्भ रिजन लक्ष्मीकांत गोंदकर यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सतीश खरात, महेंद्रसिंग राजपूत, प्रदीप बंबाटकर, वैशाली इंगळे राजपूत, लता गवई, मिलिंद इंगोले, दीपक गवई, प्राची राजपूत, आकाश उमाळे यांना गौरविण्यात आले. तसेच 20 वर्षांपासून केंद्रामध्ये औषधे घेत असलेल्या दांपत्याचा सत्कार करण्यात आला.

विहानचे प्रोजेक्ट मॅनेजर गजानन जायभाये यांनी प्रास्ताविक केले. विहान प्रोजेक्ट कोऑर्डीनेटर मंगला उमाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी वंदना चव्हाण, नीता जमाले, भीमसेन हिवराळे, आकाश हिवाळे यांनी पुढाकार घेतला.

00000

सैनिक कार्यालयात माजी सैनिकांसाठी मानधनावर भरती

बुलडाणा, दि‍. 10 : जिल्हा सैनिक कार्यालयात माजी सैनिक प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने तीन पदांवर नियुक्ती करण्यत येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सभामंडप मॅनेजर हे 1 पदा फक्त माजी सैनिक जेसीओ, सफाई कर्मचारी 1 पद माजी सैनिक, सिव्हिलीयन, आणि चौकीदार हे 1 पद माजी सैनिकांमधून भरण्यात येणार आहे. सदर पदांकरीता इच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या व पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांनी दि. 14 जून 2024 पर्यंत  डिस्चार्ज बुक, पीपीओ, माजी सैनिक ओळखपत्र. एम्पलायमेंट कार्ड आणि वैयक्तिक अर्जासह जिल्हा सैनिक कार्यालयात अर्ज सादर करावेत

सभामंडप व्यवस्थापकासाठी दहावी पास, वयोमर्यादा 55 वर्षापर्यंत, महाराष्ट्र शासनाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी टंकलेखनाचा वेग दर मिनीटास किमान 40 शब्द असावा. यासाठी 24 हजार 79 रूपये मानधन देण्यात येणार आहे. सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी गुड, मेडीकल कॅटेगरी ही शेप-1 असावी लागणार आहे. सफाई कर्मचारी हा दहावीपर्यंत शिक्षित आणि वयोमर्यादा 50 वर्षापर्यंत असावी. यासाठी 12 हजार 90 रूपये मानधन देण्यता येणार आहे. सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी गुड, मेडीकल कॅटेगरी ही शेप-1 असावी लागणार आहे. चौकीदार पदासाठी दहावीपर्यंत शिक्षण आणि वयोमर्यादा 50 वर्षापर्यंत असावी लागणार आहे. तसेच 19 हजार 992 रूपये मानधन देण्यात येणार आहे.

            इच्छुकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

00000

देऊळगाव राजा येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीयर शिबीर

            बुलडाणा, दि‍. 10 : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबईच्या वतीने देऊळगाव राजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवार, दि. १९ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीयर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

            या शिबिरात तज्‍ज्ञ मार्गदर्शक म्हणून उप विभागीय अधिकारी संजय खडसे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. बी. बचाटे, मुख्याधिकारी श्री. मोकळ, उद्योजक श्री. मनियार आदी उपस्थित राहणार आहेत.

            आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. बी. बचाटे अध्यक्षस्थानी राहतील. शिबिरात तज्‍ज्ञ व्यक्तींचे करिअरसंबंधी मार्गदर्शन लाभणार आहेत. शिबिरामध्ये दहावी, बारावीनंतरचे शिक्षण, व्यक्त‍िमत्व विकास, मुलाखत तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारीत रोजगाराच्या संधी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आणि कर्जयोजनेबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी दहावी, बारावी. डिप्लोमा, डिग्री उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, सर्व विद्यार्थी व पालकांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. भावले यांनी केले आहे.

000000





हुमणी अळी नियंत्रणासाठी मोहीम

            बुलडाणा, दि‍. 10 : खरीप हंगाम पेरणीपूर्वी बियाण्याची प्रतवारी बीजप्रक्रिया व उगम शक्ती मोहिमेनंतर सर्व गावामध्ये हुमणी अळी नियंत्रण करण्यात येत आहे. यात कृषी विभागाकडून सामूहिक पद्धतीने हुमणी अळी नियंत्रणाबाबत मोहीम राबविण्यात येत आहे.

मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्यानंतर हुमणी अळीचे नियंत्रण केल्यास प्रभावी नियंत्रण होते. तसेच शेतामध्ये लाईट ट्रॅपचा वापर केल्यास हुमणी अळीचे भुंगेरे मोठ्या प्रमाणावर नष्ट केल्या जातात. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये शेतकरी सभेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. धाड परिसरातील धाड, धामणगाव, मासरूळ, गुमी, मसला, इरला, बोधेगाव, सावळी, चांडोळ, रुईखेड मायंबा, भादोला, माळ विहीर, अजितपूर, नांद्रा कोळी, हतेडी, दुधा, देवपूर, ढाल सावंगी, पाडळी, अंबोडा, केसापूर, माळवंडी, दहिद, रायपूर, पळसखेड, पिंपळगाव सराई गावामध्ये क्षेत्रीय पातळीवर हुमणी आळी नियंत्रणाबाबत प्रभावी मोहीम राबविण्यात येत आहे.

मे किंवा जूनमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर प्रौढ भुंगेरे सुप्त अवस्थेतून बाहेर निघतात. संध्याकाळच्या वेळी प्रौढ भुंग्यांचे मिलन बाभूळ किंवा कडुनिंबाच्या झाडावर होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी सकाळी मादी जमिनीमध्ये सहा ते दहा सेंटीमीटर खोलीवर अंडी घालते. एक मादी 50 ते 70 अंडी घालते. अंडी 9 ते 24 दिवसांमध्ये उबतात. त्यातून अळी बाहेर पडते. ही अळी खरीप पिकाचे नुकसान करते. हुमणी अळी पिकाच्या वाढीच्या वस्तीमध्ये मुळे कुरतडून खात असल्यामुळे सद्यस्थितीत हुमणी अळी नियंत्रणाचा योग्य कालावधी आहे. सदरील अळीचे नियंत्रण प्रादूर्भाव होण्यापूर्वी केल्यास पिकाचे होणारे नुकसान टाळता येऊन किटकनाशकाच्या खर्चात बचत होते. त्यामुळे हुमणी अळी नियंत्रण मोहीमेमध्ये सामूहिक पद्धतीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

वळवाचा पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचे भुंगेरे कोशातून बाहेर पडून बाभूळ, कडूनिंब किंवा बोर झाडावर अंडे द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे सदरील झाडाखाली लाईट ट्रॅपचा वापर केल्यास प्रभावी नियंत्रण शक्य आहे. तसेच पावसामध्ये खंड पडल्यास ओमनी अळीचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात निदर्शनास येते. त्यामुळे 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय पिकांची पेरणी करण्यात येऊ नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या