DIO BULDANA NEWS 09.06.2024

 



बालगृहाला जिल्हाधिकारी यांची भेट

*सहपरिवार भेटीने बालकांना आधार
बुलडाणा, दि. ९ : बालगृह, दत्तक विधान संस्था लव्ह ट्रस्ट, तसेच आपत्कालीन परिस्थितीत महिला व मुलींचे संगोपन करण्याऱ्या सखी सेंटरला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सहपरिवार भेट दिली. या भेटीने अनाथ निराधार बालकांना आधार देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत महिला व बालकांच्या काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने दाखल असणाऱ्या बालकांना जिल्हाधिकारी यांनी सहपरिवार भेट देऊन बालकांना मानसिक आधार दिला.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी अनाथ मुलांना पालक मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच बाल न्याय मंडळा मार्फत दाखल असलेल्या बालकांचे मानसिक आरोग्य चांगले रहावे याकरिता मानसिकतज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञांचा सल्ला आणि सेवा घेण्यात यावी, अशा सूचना दिल्या. यावेळी संस्थेतील दहावी उत्तीर्ण गुणवंत बालकांचा सत्कार करण्यात आला. 
जिल्हाधिकारी यांनी बालगृह भेटीनंतर दत्तक विधान संस्था दि लव्ह ट्रस्ट येथे भेट दिली. संस्थेतील सहा वर्षांपर्यंतच्या बालकांचे पोषण, देखरेख आणि आरोग्यविषयक बाबी समजून घ्याव्यात. सोडून दिलेले व दत्तक जाण्यासाठी मुक्त करण्यात येणाऱ्या बालकांची दत्तक विधान प्रक्रिया साधारण नागरिकांपर्यंत पोहोचावी. यासाठी प्रचार प्रसिद्धी करावी. नकोसे बाळ आढळल्यास सामाजिक संस्था आणि बाल संरक्षण यंत्रणांनी एकत्र येऊन कार्य करावे, अशा सूचना संस्थाचालक आणि महिला व बाल विकास विभागाला देण्यात आल्या. तसेच जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांना सहभागी करून अर्थसहाय्य आणि मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. 
धार्मिक ठिकाण, आरोग्य केंद्रे आणि मुद्रांक नोंदणी आणि निबंध कार्यालय अशा ठिकाणी बालकांचे कायदेशीर समर्पण करणाऱ्या माता आणि कुटुंबांची गोपनीयता पाळून समुपदेशनाचे काम करावे. संस्थेत दाखल अनाथ बालकांसाठी विशेष आरोग्य चाचण्या आणि सोयीसुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.
संकटात सापडलेल्या आणि आधाराची गरज असणाऱ्या सखी सेंटरवर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेतील महिला व मुलींशी संवाद साधला. वास्तव्यास असणाऱ्या मुलींच्या सुरक्षित हस्तांतरणाबद्दल मार्गदर्शन केले. संस्थेत दाखल मुलींच्या शिक्षण आणि कौशल्य विकास उपक्रमांबाबत त्यांनी निर्देश दिले.
0000


जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रताप जयंती साजरी
बुलडाणा, दि. ९ : जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली.
नायब तहसीलदार प्रमोद करे यांनी जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नाझर गजानन मोतेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
00000
*धनंजय मुंडेंकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हाट्सअप क्रमांक जारी*
*बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदीची सक्ती आदी बाबींची थेट तक्रार करता येणार; तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवणार*
बुलडाणा, दि. ९ : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक दिवस आधी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी 'कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक' जारी करण्याचे निर्देश दिले, त्याप्रमाणे कृषी विभागाकडून *9822446655* हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. 
राज्यात कुठेही कृषी निविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे किंवा खत घेण्याची सक्ती करत असतील, बी-बियाणे, खते किंवा कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करत असतील, अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करत असतील, एखादे बोगस वाण विक्री करत असतील, किंवा अशा काही तक्रारी असतील, त्या तक्रारी शेतकऱ्यांनी दुकानाचे नाव, ठिकाण झ तालुका, जिल्हा यांसह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह वरील व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवावेत. त्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊन, त्याची शहानिशा करून त्यावर कारवाई केली जाईल, त्याचबरोबर तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 
मागील वर्षी देखील धनंजय मुंडे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला होता. त्याद्वारे हजारो तक्रारींची सोडवणूक करण्यास मदत मिळाली होती. त्यामुळे याही वर्षी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला असून, सदर व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यासाठी 7588041008 आणि 7588619505 हे दोन क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांनी कळविले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या