Wednesday 15 June 2022

DIO BULDANA NEWS 15.6.2022

 

अधिकृत घोषणा होईपर्यंत समृद्धी महामार्गाचा प्रवासासाठी उपयोग करू नये

  • राज्य रस्ते विकास महामंडळाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.15 : जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचे बहुतांशी काम पुर्ण झालेले आहे. त्यामुळे या महामार्गावरून अनधिकृत व विनापरवानगी वाहतूक, वर्दळ सुरू आहे. अद्याप महामार्गावरून अधिकृतपणे वाहतूकीस परवानगी देण्यात आलेली नाही. वाहतूक सुरक्षिततेची काही कामे करणे प्रगतीत आहे. अनधिकृत वाहतूकीमुळे काही ठिकाणी अपघात होऊन जिवीत हानी देखील झालेली आहे. सर्व जनतेस व वाहनधारकांनी या महामार्गावर वाहतूक सुरू करण्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत समृद्धी महामार्गाचा प्रवासासाठी उपयोग करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                            ******


21 जून रोजी 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस

  •  योग दिनाचे आयोजन बाबत बैठक

           बुलडाणा,(जिमाका) दि.15 :  संयुक्त राष्ट्रांनी 21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषीत केलेला आहे.  यावर्षी दि.21 जून 2022 रोजी 8 वा आंतरराष्ट्रीय योगदिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत असल्याने आयुष मंत्रालययामार्फत देशभरातील 75 प्रसिध्द स्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने 21 जुन  रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलबुलडाणा येथे साजरा करण्यासाठी क्रीडा अधिकारी कार्यालयबुलडाणा व आयोजन समितीच्या वतीने 14 जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. 

  यावेळी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) उमेश जैनश्रीमती वृंदा कुळकर्णी,  नेहरु युवा केंद्राचे अजयसिंग राजपूतआयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. प्रमोद ढवळेप्रशांत लहासे, आर्ट ऑफ लिव्हींगचे बी.डी.सावळेजिल्हा संघटक स्काऊट गाईड सुभाष आठवलेश्रीकृष्ण शेटेक्रीडा भारतीचे बाळ आयचीतसौ.अंजली परांजपेउर्मीला दिदीडॉ.उमेश सावळेडॉ.संजय सोनुनेडॉ.नरेंद्र भिसेराजसिंग सोळंकीअरविंद अंबुसकरएस.पी.चेकेएन.टी.उबरहंडेडॉ.बाबाराव सांगळेसंतोष टाकसाळप्रकाश भुतेकरभास्कर घटाळे, क्रीडा अधिकारी आर.आर.धारपवारराज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे आदी उपस्थित होते.

     आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याकरीता जिजामाता क्रीडा व वपारी संकुलबुलडाणा येथे 21 जून रोजी सकाळी 7 ते 7.45 पर्यंत Common Yoga Protocal (CYP) नुसार योग प्रात्यक्षीक सादर करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाला बुलडाणा शहरातील सर्व शाळामहाविद्यालयेशैक्षणिक संस्थासर्व शासकीय निमशासकीय कार्यालयेमहीला मंडळेक्रीडा मंडळएन.सी.सी.एन.एस.एस.भारत स्काऊट गाईडनेहरु युवा केंद्रपोलीस विभागविविध खेळ संघटनायोग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्था व इतर सर्व आस्थापनांचे अधिकारी / कर्मचारी सहभागी होणार आहेत.

सदर उपक्रम यशस्वी करणेसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा, जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग (माध्यमिक/प्राथमिक), आयुष मंत्रालय, बुलडाणा जिल्हा योग संघटना, नेहरु युवा केंद्र, क्रीडा भारती, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, योग विद्याधाम बुलडाणा, योगांजली योग वर्ग, पतंजली योग समिती, एकविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, आयुर्वेद / नर्सिंग महाविद्यालये यांचे सहकार्याने आयोजन करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील नागरीक, युवक-युवती, विद्यार्थी- विद्यार्थीनी, खेळाडू अधिकारी/कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळे, युवा मंडळे, महिला मंडळे, इतर सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच योगप्रेमी नागरीक यांनी 21 जुन 2022 रोजी सकाळी 6.30 वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

*******

रिदास इंडिया प्रॉपर्टीज कंपनीकडून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक

 बुलडाणा,(जिमाका) दि.15 :  रिदाज इंडिया प्रॉपर्टीज कंपनी बेंगलोर शाखा औरंगाबाद या कंपनीने वर्तमानपत्रात जाहीरात देवून आर्थिक फसवणूक केली असल्याची फिर्याद बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला मो. साजीद अबुल हसन देशमुख रा. इकबाल नगर, बुलडाणा यांनी दिलेली आहे.

    फियादीच्या रिपोर्टनुसार रिदाज इंडिया प्रॉपर्टीज कंपनीने वर्तमानपत्रात कंपनीत 50 हजार रूपये गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला 2650 ते 3125 रूपये नफ्यापोटी परतावा मिळेल. तसेच मुळ रक्कम परत पाहिजे असल्यास अर्ज केल्यास 40 दिवसात रक्कम परत मिळेल व औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रोड टच प्लॉट पाहिजे असल्यास स्वस्त दरात मिळेल, अशी जाहीरात दिली. जाहीरातीवरून फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांनी एकूण 11 लक्ष 50 हजार रूपये सदर कंपनीमध्ये गुंतवणूक केली. काही महिने कंपनीने परताव्यापोटी फिर्यादी व इतर गुंतवणूकदार  यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा केली. परंतु नंतर जाहीरातीप्रमाणे रक्कम जमा न करता रिदाज इंडिया प्रॉपर्टीज कंपनीने डायरेक्टर आरोपी अयुब हुसेन व अनिस आयमन रा. बेंगलोर यांनी फिर्यादी व इतर गुंतवणूकदार यांचा विश्वासघात करून फसवणूक केली.

    अशा रिपोर्टवरून बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे कलम 409, 406, 420, 34 भादविसह एमपीईडी ॲक्ट 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन मोरे करीत आहे. तरी नमूद आरोपीतांकडून रिदाज इंडिया प्रॉपर्टीज, औरंगाबाद या नावाने गुंतवणूकदारांना जास्त नफ्याचे  आमिष दाखवून कुणाची फसवणूक झालेली असल्यास अशा व्यक्तींनी त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या रिदाज इंडिया प्रॉपर्टी कंपनी शाखा औरंगाबादच्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन बुलडाणा शहर आवार येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी केले आहे.

                                                            *****

  बेरोजगार युवक युवतींनी रोजगार उभारायचाय..

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घ्या

बुलडाणा,(जिमाका) दि. 15: उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेवुन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगष्ट 2019 पासुन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात 50 लक्ष रूपये प्रकल्प मर्यादेपर्यंतचे उद्योग ग्रामीण भागात उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहे.   बेरोजगार युवक युवतींना रोजगार उभारण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आधार त्यांना मिळाला आहे.  

 राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागात व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत शहरी भागात राबवण्यिात येत आहे. या योजनेतंर्गत उत्पादन प्रक्रिया असलेल्या उद्योगासाठी जास्तीत जास्त  50 लक्ष तर सेवा उद्योगासाइी 10 लक्ष रूपये मर्यादा आहे. या याजनेतंर्गत शहरी भागासाठी प्रकल्प किंमतीच्या 15 ते 25 टक्के तर ग्रामीण भागासाठी प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के रक्कम मार्जिन मनी अनुदान स्वरूपात दिली जाते. उत्पादन प्रक्रिया असलेल्या व सेवा उद्योगासाठी प्रकल्प किंमत 5 लक्ष रूपयापेक्षा जास्त असेल तर किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्ष दरम्यान असावे. नविन उद्योजक, कारागिर, संस्था व बचत गट या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.  या योजनेचा अर्ज ऑनलाईन स्वीकारल्या जात असून  शासनाच्या https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. तसेच योजनेची संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  योजनेची अधिक माहितीसाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा कार्यालय व सर्व तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

*****

 

No comments:

Post a Comment