Friday 21 May 2021

DIO BULDANA NEWS 21.5.21

लहान मुलांवरील कोविड उपचारांसाठी बाल रोग तपासणी कक्ष तयार ठेवावे - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक म्युकर मायकोसिसवरील उपचारासाठी सामान्य रूग्णालयात विशेष शस्त्रक्रीया कक्षाची व्यवस्था बुलडाणा,(जिमाका) दि.21 : देशात पुढील सहा ते सात महिन्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेमध्ये लहान मुले प्रादुर्भावग्रस्त होणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने लाटेपासूल लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी आतापासून तयारीला लागावे. त्यासाठी जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये विशेष बाल रोग तपासणी कक्ष तयार करण्यात यावे, तसेच बेडची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कोविडबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते. ऑक्सिजन दिलेल्या कोविड बाधीत रूग्णांना म्युकर मायकोसिस (काळी बुरशी) हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, म्युकर मायकोसिस आजाराबाबत सध्या बाधीत रूग्णांवर प्रभावी उपचार करावे. या आजारावरील इंजेक्शन व औषधांचा मागणीनुसार पुरवठा सनियंत्रीत करावा. कुठेही औषधाविना रूग्णांचे हाल होवू नये. म्युकर मायकोसिस आजाराबाबत रूग्णालयांना स्वच्छतेबाबत सुचीत करावे. सर्व शासकीय व खाजगी रूग्णालयांमध्ये स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. म्युकर मायकोसिस उपचाराकरीता जिल्हा सामान्य रूग्णालयात शस्त्रक्रीया कक्षाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवरील उपचारांसाठी बाल रोग तज्ज्ञांची समिती तयार करावी. त्यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. जिल्ह्यात बऱ्याच गावांनी लोकांच्या पुढाकारातून विलगीकरण कक्ष स्थापन केलेले आहे. या कक्षात गावातील संशयीत रूग्णांना आणून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे गावातील संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे कक्ष जिल्हा परिषदेने गावागावात सुरू करण्यात यावेत, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात सध्या लागू असलेले निर्बंध शासनाच्या आदेशानुसार कायम ठेवावे. निर्बंधामुळे जिल्ह्यातील रूग्णसंख्येत घट झालेली दिसून आली आहे. पोलीस विभागाने निर्बंधाचे काटेकोर पालन करण्याची कार्यवाही करावी. नागरिकांनी लसीकरण झालेले असले तरी कोरोना संसर्ग सुरक्षेची त्रि सुत्रीचे पालन करावे. घराबाहेर विनामास्क पडू नये, हात वारंवार धुवावे किंवा सॅनीटाईज करावे, गर्दीमध्ये जाणे टाळावे व सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यावेळी केले. याप्रसंगी त्यांनी मे महिन्यातील रूग्णवाढ, मृत्यू, झालेल्या एकूण तपासण्या, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर बेड, कोविड केअर सेंटरवरील भोजन, पाणी, स्वच्छता, जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची सद्यस्थिती आदींचाही आढावा घेतला. सध्या जिल्ह्यात म्युकर मायसिसचे 27 रूग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील एकूण गावांपैकी 640 गावांमध्ये कोरोना रूग्ण आढळून आले असून 130 गावांमध्ये आजपावेतो एकही कोरोना रूग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती जि.प उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी दिली. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी उपस्थित होते. ***** म्युकर मायकोसीस आजारावर महात्मा फुले जनारोग्य अभियानातून उपचाराची सुविधा बुलडाणा,(जिमाका) दि.21 : म्युकर मायकोसीस या आजाराच्या उपचारावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रूग्णालयांमध्ये उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आजारावर उपचाराकरीता महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतगंर्त सर्जीकल पॅकेज 11 व मेडीकल पॅकेज 8 उपलब्ध आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत प्रति कुटूंब प्रति वर्ष 1.50 लक्ष रूपये एवढे विमा संरक्षण आहे. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये प्रति कुटूंब प्रति वर्ष 1.50 लक्ष रूपये पर्यंत विमा संरक्षण आहे. त्यापुढे हमी तत्वावर 5 लक्ष रूपया पर्यंत संरक्षण आहे. तसेच म्युकर मायकोसीस आजारावरील या आजारापूर्वी बाधीत व्यक्तीवर अथवा त्याच्या कुटूंबातील व्यक्तीवर उपलब्ध विमा संरक्षणापैकी काही रक्कम खर्च झालेली असू शकते. म्युकर मायकोसिस आजारावरील उपचाराकरीता योजनेतील विविध पॅकेज एकत्रितरित्या व वारंवार पुर्नवापर करावा लागण्याची शक्यता आहे. या दोन्ही आरोग्य योजनांमध्ये अनुज्ञेय विमा संरक्षणापेक्षा अधिक खर्च आल्यास अधिकचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर भागविण्यात येणार आहे. या आजारावरील उपचारामध्ये अँटी फंगल औषधे हा महत्वाचा भाग आहे. संबंधित औषधे कमी प्रमाणात उपलब्ध असून महागडी आहेत. शासनाच्या प्रचलित नियमानुसार विहीत कार्यपद्धती अनुसरून संबंधित प्राधिकरणाकडून उपलब्ध करून घेण्यात यावीत व अंगीकृत रूग्णालयास पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेमार्फत सनियंत्रण केले जाईल. म्युकर मायकोसिस आजाराची तीव्रता जास्त प्रमाणात असून याकरीता बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासते. तसेच याकरीता येणारा खर्च ही जास्त आहे. यामुळे खाजगी रूग्णालयातील उपचारावरील खर्चामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे या आजारावरील उपचार योजनांच्या अंगीकृत रूग्णालयातून करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. **********

No comments:

Post a Comment