Saturday 1 May 2021

DIO BULDANA NEWS 1.5.2021

 शेतीशी निगडित दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते सायं 7 वाजेपर्यंत

बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : राज्यात 20 एप्रिलच्या आदेशानुसार  'ब्रेक द चेन' अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. तसेच सदर कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे.  जिल्ह्यात संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा ही सकाळी 7 ते  11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र पर्जन्यमान सुरू झाल्यानंतर कृषी निगडित दुकानांवर कृषी निविष्ठा खरेदीसाठी सदर वेळेत शेतकऱ्यांची गर्दी होवून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्र, शेतीशी संबंधित असलेली उत्पादने व वाहतूक सकाळी 7 ते सायं 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी  आदेश अन्वये परवानगी दिली आहे. मात्र या आस्थापनांनी कोविड १९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

   सदर आदेश  बुलडाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहणार आहे. वरील आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिताच्या कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिलेल्या आदेशात नमुद आहे

*****


महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण

बुलडाणा,दि.1 (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा अत्यंत साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज 1 मे रोजी पार पडला.  यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार,  जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी श्री गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे आदींची उपस्थिती होती.

     कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना हाती घेण्यात आले आहे. यावर्षीचा महाराष्ट्र दिन कार्यक्रमही अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनी जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण करण्याबाबत सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या.  त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा अत्यंत साधेपणे साजरा करण्यात आला.    

****** 

No comments:

Post a Comment