Sunday 3 December 2023

राज्य शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी - पालकमंत्री दिलीप वळसे पाटील







 

• पालकमंत्री दिलीप वळसे पाटील शेतक-यांच्या थेट बांधावर

• कृषि विभागाकडून घेतला आढावा

• आसोला जहांगीर येथे छत उडालेल्या नागरिकांना सानुग्रह राशीचे वाटप

• नुकसानग्रस्त भागाचे ता़त्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

• आधार प्रमाणीकरण पुन्हा सुरु होणार

• पिक विम्याचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु

बुलडाणा, दि.03(जिमाका): जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासन नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात अतिवृष्टी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील सावरगाव माळ, गोळेगाव, गिरोली, आसोला जहाँगीर आणि पळसखेड चक्का या नुकसानग्रस्त भागाचा पालकमंत्र्यांनी आज दौरा करून पाहणी केली. 

आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी,  निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, उप विभागीय अधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार सचिन जैस्वाल, शाम धनमने जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोज ढगे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गारपीट व अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकविमा योजनेत समाविष्ट केलेल्या पिकांना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा शासनस्तरावर प्रयत्न करू, असा दिलासा पालकमंत्र्यांनी शेतक-यांना दिला. प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागांनी योग्य समन्वय साधून अहवाल सादर केल्यानंतर मदत मिळवून देण्यात येईल,असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

द्राक्ष पिकासाठी अनेक शेतक-यांनी एकरी लाखो रुपये खर्च केला असून, बागेचे नुकसान झाले आहे. या भागात बीज उत्पादनाचे मोठे प्रमाण असून, कंपन्या शेतमालावर प्रोसेसींग करतात आणि शेतक-यांच्या मालाला चांगला भाव देतात. मात्र या पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतक-यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळासमोर अहवाल ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगीतले

 गारपिटीमुळे कापूस, द्राक्षे, तूर, ज्वारी, मका, शेडनेट, शेडनेटमधील मिरची आदी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी पिक अधिसूचित करण्यासाठी ७२ तासांची अट शिथिल करून पिक विमा प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी अडचण आल्यास‌ जिल्हा प्रशासन व कृषि विभागाशी संपर्क साधावा, त्यांना ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

            गोळेगाव येथे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधून, आधार प्रमाणीकरण करताना पोर्टल बंद असल्यामुळे अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर आता ती प्रक्रिया सुरु होत असून, मदत व पुनर्वसन विभागाकडून लवकरच मदत मिळेल असे त्यांनी सांगितले.

            शेतपिकांच्या नुकसानीचा अंदाज महसूल विभागाला काढण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असून, अधिका-यांनी शेतक-यांना जास्तीत जास्त मदत होईल, यादृष्टीने प्रयत्न करावेत. घरांचे ही नुकसान झाले असून, बियाणे हब असलेल्या भागात अनेक कंपन्या काम करत आहेत. इंडियन कॉन्ट्रँक्ट अँक्ट लागू असल्यामुळे हा कायदा समजून घ्यावा लागेल; या कायद्यात सुधारणा करणे आवश्यक असून, त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलवावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. त्याबाबत कंपन्यावर सरकार किंवा प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्या नियंत्रित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी लागेल. कंपन्यांकडून स्थानिक रोजगारात अडचणी येणार नाहीत, याचाही विचार करावा लागणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. त्यापूर्वी आपण मदत वाटपाचे निकष व नियम बदलून घ्यावेत असे सांगून शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. मात्र आता तांत्रिक अडचणी सुटल्या असून, लवकरच निधी शेतक-यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे श्री. वळसे पाटील म्हणाले.

 विदर्भातील काही भागात मोठ्या प्रमाणावर बीज उत्पादन घेतले जाते. त्यासाठी शेडनेट उभारणीला खर्च येतो त्याचे नुकसान झाले आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेत शेतक-यांना मदत करण्याचे आदेश त्यांनी यंत्रणेला दिले. आसोला जहांगीर येथील घरांवरील छत उडालेल्या नागरिकांना धनादेश देत सानुग्रह मदत करण्यात आली. सोलार प्लेटचे नुकसान झाले; त्यांनाही मदत करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित विभागाला दिल्या.

*****

No comments:

Post a Comment