Friday 29 December 2023

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

 

 बुलडाणा,दि.29(जिमाका): राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांच्या  मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये 102 गुन्हे नोंदविण्यात आले असून,  101 वारस, एक बेवारस गुन्हे नोंदवून तब्बल 108 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 16 दुचाकी व एका ऑटोसह एकूण 28 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये देशी 615 तर विदेशी मद्य 78 लिटर, ताडी 42  आणि रसायन (सडवा) 28 हजार 486, हातभट्टी 1041 व बिअर 11.7 लिटर मद्य पकडण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत धामणगाव बढे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सिंदखेड लपाली येथील गोपाल दगडु मुंडाळे याच्या घरातून 10 किलो गांजा व गुगळी शिवारात अंदाजे 32 किलो गांजाची झाडे असा एकूण 42 किलोचा साठा पकडला. या प्रकरणी गोपाल मुंडाळे याला अटक केली असून, त्याला 4 जानेवारी 2024पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक नयना देशमुख यांनी नुकतीच मेहकर येथील हॉटेल कैलास ढाबा येथे तर दुसऱ्या एका प्रकरणात निरीक्षक श्री. रोकडे व श्रीमती नयना देशमुख यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील प्रविण मधुकर जाधव यांच्या हॉटेल निसर्ग धाब्यावर छापा टाकला असता दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन याप्रमाणे चार ग्राहकांविरोधात विनापरवाना मद्य सेवन करत असल्यावरून त्यांच्याविरुध्द दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.

 तसेच या कार्यालयाने नाताळ व नववर्षानिमित्त 24 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष मोहीम राबवत अवैध ढाबे तसेच अवैध मद्यविक्री करणा-या व्यक्तींविरुध्द कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही विनापरवाना असलेल्या अवैध धाब्यांवर मद्यसेवन तसेच अवैध मद्यविक्री करू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पंडीत यांनी केले आहे. 

आपल्या परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास १८००८३३३३३ या निशु:ल्क क्रमांकावर किंवा व्हॉट्स ॲप ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाच्या पोर्टलवर तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*****

No comments:

Post a Comment