Monday 4 December 2023

मतदारयादीत नाव नोंदवून लोकशाही बळकटीकरणास हातभार लावा - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील

 बुलडाणा,दि.04(जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, लोकशाही तत्वावर आधारित देश आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यासाठी आपण सर्व मतदार बहुमूल्य मताच्या आधारे लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळकट करण्याचे काम करतात. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे काम केले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम मतदार यादीत नाव नोंदवून घेत लोकशाही बळकटीकरणास हातभार लावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

सध्या भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम सुरु असून, जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदार यादी पुनरिक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या युवक-युवतींनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदणी करावे जेणेकरून  आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी आवाहनातून सांगितले आहे.  

  आपले नाव आजच मतदार यादीमध्ये नोंदवावे. आपले नाव मतदार यादीत असेल, परंतु, चुकीचे नोंदविले गेले असेल, आपले छायाचित्र नोंदविले नसेल किंवा चुकीचे नोंदविले गेले असेल तसेच नाव नोंदविले गेले आहे. परंतु छायाचित्र नसेल तर अशा सर्वासाठी ही एक सुवर्ण संधी असून, भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमातंर्गत आपल्या स्मार्टफोनमध्ये www.voterportal.in या संकेतस्थळावर व voter helpline app वर भेट देऊन नाव नोंदणी व दुरुस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

            दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण होणा-या सर्व युवक व युवतींना घर बसल्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणी स्मार्टफोनद्वारे करता येईल. तसेच ज्या युवक-युवतींना अशाप्रकारे नोंदणी करता येत नाही, अशा सर्व युवा वर्गाने आपल्या जवळच्या तहसील कार्यालयाशी किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क करावा. तसेच नोंदणी करता येते अशा युवा वर्गाने  नाव नोंदणी करता येत नाही अशांना मदत करावी व राष्ट्र सक्षमीकरण व लोकशाही बळकटीकरणाच्या या पवित्र कामात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

            लोकशाही मजबुतीकरणाच्या या प्रक्रियेत महिला, युवती, दिव्यांग अशा सर्वच घटकांचा सहभाग महत्त्वाचा असून, आपण सर्वांनी मतदार नोंदणी प्रक्रियेत तसेच मतदानाच्या पवित्र राष्ट्रीय कामात सहभागी व्हावे व खऱ्या अर्थाने लोकशाहीचे बळकटीकरण करावे. ‘मतदार म्हणजेच लोकशाहीचा आधारस्तंभ’ मतदान आपला अधिकार आहे तो बजावलाच पाहिजे. आपले मत बहुमूल्य आहे आणि त्यासाठी आपली मतदार नोंदणी झालीच पाहिजे. जेणेकरुन मतदान व लोकशाही बळकटीकरणाच्या पवित्र राष्ट्रीय कार्यात आपण सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.  

*****

 

No comments:

Post a Comment