Wednesday 6 May 2020

DIO BULDANA NEWS 6.5.2020



लॉकडाऊनचा काळ.. धान्य वितरणाचा ‘सुकाळ’..!
·        एप्रिल महिन्यात 10 हजार 989 मेट्रीक टन धान्य वाटप
·        8322.5 मेट्रीक टन मोफत तांदुळाचेही वितरण
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : कोरोना विषाणूची भिती.. पुढे काय..असा प्रश्न. या विषाणूमुळे सर्वत्र सुन्नता आली असताना गरीबांना दोन वेळच्या भोजनाची भ्रांत. अशा परिस्थितीत गरीबांची थाळी रिकामी राहू नये म्हणून शासनाने लॉकडाऊनच्या कालावधीत युद्ध पातळीवर वितरणाचे आदेश दिले. सार्वजनिक पुरवठा विभागाने यासाठी काटेकोर नियोजन करून प्रत्येक गरजू पर्यंत स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरणाची कार्यवाही केली. परिणामी जिल्ह्यात एप्रिल महिन्यात आतापर्यंत सर्वात जास्त्‍ धान्य वितरणाचा उच्चांक झाला आहे. या लॉकडाऊनच्या काळात धान्य वितरणाचा सुकाळ असल्याचा परिचय यामधून करून दिला आहे.
  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माहे एप्रिल 2020 च्या नियमित नितनाचे व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांना विहीत वेळेत धान्य वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार धान्य वितरण करण्यात आले. एप्रिल महिन्यात नियमित नियतनाचे एकूण 4 लक्ष 38 हजार 478 शिधापत्रिकाधारकांपैकी 4 लक्ष 66 हजार 064 शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 21 लक्ष 92 हजार 578 लाभार्थी असून 21 लक्ष 13 हजार 600 लाभार्थ्यांना 10 हजार 989 मेट्रीक टन धान्य वाटप करण्यात आले आहे. सदर धान्य वाटप जिल्हा पुरवठा कार्यालय, सर्व तहसिल कार्यालय, गोदामपालक व स्वस्त्‍ धान्य दुकानदार यांनी केलेल्या काटेकोर नियोजनामुळे शक्य झाले आहे. त्यामध्ये धान्य वितरण करताना लाभार्थ्यांनी सामाजिक अंतर ठेवून केलेले सहकार्य मोलाचे ठरले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 96.39 टक्के धान्याचे वितरण करण्यात आले आहे.
   त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील एकूण 3 लक्ष 97 हजार 377 शिधापत्रिकाधारकांपैकी 3 लक्ष 63 हजार 630 शिधापत्रिका धारकांमधील प्रत्येक व्यक्तीस 5 किलो मोफत तांदुळाचे वितरण करण्यात आले आहे.  याप्रमाणे एकूण वितरण 8 हजार 322.5 मेट्रीक टन तांदुळाचे वितरण झाले आहे.या वितरणाचे प्रमाण 91.51 टक्के आहे.  जिल्ह्यात अंत्योदय योजनेतंर्गत 65 हजार 140 शिधापत्रिका असून 3 लक्ष 5 हजार 74 लाभार्थी आहेत. तसेच प्राधान्य कुटूंब योजनेत 3 लक्ष 32 हजार 237 शिधापत्रिका आहेत, तर 15 लक्ष 4 हजार 138 लाभार्थी आहेत. शेतकरी योजनेतंर्गत जिल्ह्यात 86 हजार 101 शिधापत्रिका आहेत व लाभार्थी 3 लक्ष 83 हजार 366 आहेत. तसेच जिल्ह्यात कुठल्याही योजनेत समाविष्ट नसलेले केशरी शिधापत्रिका 92 हजार 142 व लाभार्थी 3 लक्ष 97 हजार 224 आहेत. या लाभार्थ्यांना मे महिन्यात धान्य वितरण करण्यात येत आहे.
  जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना कुठल्याही प्रकारे धान्याची टंचाई निर्माण झाली नाही. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत प्रत्येकाने अगदी गंभीरतेने वितरण पूर्ण करण्याचे काम केले आहे.त्यामुळे निश्चितच काळ जरी लॉकडाऊनचा असला तरी, धान्य वितरणाच्या सुकाळाचा होता. एवढे मात्र निश्चित..!
                                                                                 *****
                        जिल्ह्याला 1 लक्ष 43 हजार 890 मेट्रीक टन खताचे आवंटन मंजूर
·        खताचा पुरवठा महिनानिहाय, जिल्ह्यात 47 हजार 496 मेट्रीक टन खत उपलब्ध
·        मुबलक प्रमाणात खत उपलब्ध, तालुकास्तरावर पुरवठा व विक्री सुरू
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : खरीप हंगाम 2020 करीता शासनाकडून जिल्ह्याला 1 लक्ष 43 हजार 890 मेट्रीक टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. सदर खताचा पुरवठा हा महिना निहाय करण्यात येतो. तो एकत्र करण्यात येत नाही. जिल्ह्यात माहे एप्रिल अखेर व्हावयाचा एकूण 17 हजार 267 मेट्रीक टन पुरवठ्यानुसार जिल्ह्यात आजअखेर 47 हजार 496 मेट्रीक टन खत उपलब्ध झालेली आहेत.
   नियोजन व पुरवठ्याचे आकडेवारीनुसार आज अखेर मुबलक प्रमाणात खत उपलब्ध असून तालुकास्तरावर पुरवठा व विक्री सुरू झाली आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत येत्या काळात खते व बियाण्याचा तुटवडा होवू नये, यासाठी कृषि आयुक्तालयाकडून खते, बियाणे पुरवठा कंपन्या व जिल्हा स्तरावरून नियेाजन करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक तथा आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी तालुकास्तरावर 13 व जिल्हास्तरावर 1 असे एकूण 14 भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये काही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधीतावर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर एकूण 14 तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारींची नोंद ठेवण्यात येवून प्रत्येक तक्रारीचा निपटारा करण्यात येणार आहे. खते व बियाण्यांची टंचाई कुठल्याही तालुक्यात असणार नाही, याबाबत शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावे.
   खते व बियाण्यांची खरेदी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्राकडून करावे, दुकानदारांकडून पक्के बिल घ्यावे, बॅगवरील लॉट क्रमांक व बिलावरील लॉट क्रमांका बरोबर असल्याची खात्री करावी. तसेच कुठल्याही गैरप्रकार आढळल्यास नजिकच्या तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती, कृषि अधिकारी यांना अवगत करावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                  ****
        नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांनी आधार कार्ड ऑनलाईन संलग्न करावे
·        जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन संलग्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन आधार कार्ड लिंक करण्याची सुविधा आहे. नोकरीसाठी सदर कार्यालयाकडे बेरोजगारांना सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
   राज्यभरात वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळविणे  व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करून सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई मेल यामध्ये दुरूस्त करणे, उद्योजकांनी वेळोवेळी अधिसुचीत केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
   उद्योजकाच्या मागणीनुसार डाऊनलोड केलेल्या उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीतील आधार लिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीसह आधारकार्ड जोडणी करणे गरजेचे आहे. ऑनलाईन पद्धतीने आधार लिंक करण्यास अडचणी आल्यास जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07262-242342 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे. असे करा आधार लिंक : www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर एम्प्लॉयमेंट या टॅबमध्ये जॉबसिकर मध्ये जॉब सिकर लॉगीनवर क्लिक करावे. त्यामध्ये अपडेट आधार कार्ड अँड अदर डिटेल्सवर क्लिक करावे.
                                                                                   ***

      शव विच्छेदनाचे काम करणाऱ्या अफसर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले एक महिन्याचे वेतन
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : जिल्हा सामान्य रूग्णालयात सफाईगार पदावर शव विच्छेदनाचे काम करणारे मोहम्मद अफसर शेख गफ्फार यांनी कोविड – 19 आजारावरील नियंत्रणाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक महिन्याचे वेतन दिले आहे. श्री. अफसर यांनी आपले माहे एप्रिल महिन्याचे 23 हजार रूपये वेतन आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बँक खात्यात जमा केले. वर्ग ड मधील कर्मचारी असलेल्या श्री. अफसर यांनी आपले वेतन देवून सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे. या कार्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.   

खेळाडूंना सवलतीच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
·        13 मे अंतिम मुदत
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस सन 2019-20 मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या अथवा सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत कळविण्यात आले आहे. इयत्ता 10 आणि इयत्ता 12 परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे सवलतीचे प्रस्ताव संबंधित शाळा अथवा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी खेळाडू विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव विहीत नमुन्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे 30 मार्च 2020 पर्यंत सादर करण्याचे कळविले होते. मात्र कोविड -19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सदर प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून शाळा / महाविद्यालयांनी खेळाडूंचे परिपूर्ण ऑनलाईन प्रस्ताव तयार करून त्या प्रस्तावाची हार्ड कॉपीसह विहीत नमुन्यात दोन प्रतीसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत 13 मे 2020 पर्यंत सादर करावेत.
  यापूर्वी ज्यांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले असतील, त्यांनी हार्ड कॉपी सदर कार्यालयास देणे बंधनकारक राहील. त्याशिवाय प्रस्ताव अमरावती विभागीय मंडळाकडे सादर केल्या जाणार नाही. जिल्ह्यातील मान्यताप्राप्त एकविध खेळ संघटनांनी इयत्ता 10 व इयत्ता 12 वी च्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याचे कार्यपद्धतीनुसार अशा जिल्हा व राज्य संघटनांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांना स्पर्धा अहवाल 10 मे 2020 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. संघटनांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र, जिल्हा क्रीडा संघटना अथवा राज्य क्रीडा संघटना संलग्नतेबाबतचे पत्र, स्पर्धेचा संपूर्ण अहवाल, सहभागी संघाची यादी, सहभागी खेळाडूंची यादी, स्पर्धेची भाग्यपत्रिका, स्पर्धेचे अंतिम निकाल, स्पर्धा आयोजनाचे परिपत्रक, राज्य संघटनेचे अध्यक्ष / सचिव यांची सही व शिक्क्‌यासह नमुना स्वाक्षरी असलेले पत्र, एकविध क्रीडा संघटनांनी वेळेत सादर करावे. न केल्यास संबंधीत खेळाडूंना वाढीव क्रीडा गुण सवलत प्राप्त न झाल्यास संबंधीत संघटना जबाबदार राहील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी कळविले आहे.
                                                                                  ****
            कोरोना निर्मुलनासाठी ‘अपाम’च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : कोरोना विषाणू प्रादुर्भावमुळे मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत गरीब, गरजू लोकांना मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन मा. मुख्यमंत्री यांनी केले होते. त्यानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अधिकारी / कर्मचारी यांनी सामाजिक बांधीलकी म्हणून 82 हजार रूपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली आहे.
   महामंडळ समाजातील तरूणांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी अर्थसहाय्य देत असते. महामंडळाच्या माध्यमातून अनेक तरूण व्यावसायिक बनले आहेत. महामंडळाचे सर्व अधिकारी, कर्मचारी/ सर्व  जिल्हा समन्वयक यांनी आपल्या स्वइच्छेने वेतनातून 82 हजार रूपयांचा निधी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पवार, व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनातून जमा केला आहे, असे जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांनी कळविले आहे.
                                                                                   ***
कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 29 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह '
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : जिल्ह्यात आज प्राप्त 29 रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत 584 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 24 रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आतापर्यंत 20 कोरोनाबधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 20 असून सध्या रूग्णालयात 3 रूग्ण उपचार घेत आहेत.
   तसेच आज 6 मे रोजी 29 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 29 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 13 आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 3 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 584 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
                                                                                 *****

No comments:

Post a Comment