Friday 15 May 2020

DIO BULDANA NEWS 15.5.2020

कृषी केंद्र चालकांनी कृषि निविष्ठांचे दर व साठ्याचा फलक लावावा
-    पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
बुलडाणा, (जिमाका) दि. 15 :  सध्या खरीप हंगामातील पेरणीची पूर्व तयारी शेतकरी बांधव करीत आहेत. शेतीसाठी लागणारे खत, बी बियाणे शेतकरी खरेदी करत आहेत. याचा गैरफायदा काही कृषी केंद्र मालक दरवर्षी घेत असतात. जिल्ह्यातील कृषी केंद्र धारकांना त्यांच्याकडे असलेल्या खताचे दर व  त्यांच्याकडे असलेला साठा याची नोंद असलेला फलक कृषी केंद्राच्या दर्शनी भागात लावावा अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी दिल्या आहेत. 
   खरीप हंगामाचे दिवस जवळ आले आहे. बळीराजा कोरोनाच्या संकटकाळातही शेतीच्या पूर्व मशागतीमध्ये व्यस्त आहे. यावर्षी दमदार पावसामुळे रब्बी हंगामात चांगले पीक आले, तसेच अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकेही घेतली. पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे, खतांचा पुरवठा व्हावा. कुठलीही कमतरता पडू नये याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी 21 एप्रिल रोजीच खरीप आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
   जिल्ह्यामध्ये यावर्षी 7, 37,850 हेक्टर जमिनीवर खरीप पेरणी होण्याची शक्यता असून याकरिता 175680 मेट्रिक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर असून आज पर्यंत प्रत्यक्षात 35294 मेट्रिक टन खत मिळाले आहे, उर्वरित खत जुलै पर्यंत प्राप्त होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक खत मिळेल. तरी देखील काही कृषी केंद्र धारकांकडून शेतकऱ्यांची लूट केली जाते. त्यामुळे कृषी केंद्र धारकांनी खताचे दर आणि उपलब्ध असलेला साठा याचा फलक कृषी केंद्राच्या दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे.जर शेतकऱ्यांकडून खतासाठी अतिरिक्त पैसे घेतल्यास संबधित कृषी धारकांवर कडक कारवाही करण्यात येईल असा इशाराही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.
****************
कोरोना अलर्ट : जिल्हयात आज प्राप्त 10 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह '
बुलडाणा, (जिमाका) दि. 15 : जिल्ह्यात आज प्राप्त 10 रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत 673 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 26 रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  आतापर्यंत 23 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 23 आहे.  सध्या रूग्णालयात दोन रूग्ण कोरोनाबाधीत असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
   तसेच आज 15 मे रोजी 10 अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व 10 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 54 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 673 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
                                                                                                ********
--

No comments:

Post a Comment