Thursday 28 May 2020

DIO BULDANA NEWS 28.5.2020

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत आता सर्वांना उपचाराचा लाभ
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता राज्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार करोनाबाधित रुग्ण तसेच करोनाची लागण नसलेल्या राज्यातील 12 कोटी लोकांना या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.
       शासकीय व पालिका रुग्णालयांचे सध्या करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत असल्यामुळे शासकीय व पालिका रुग्णालयांमध्ये गुडघेबदल शस्त्रक्रिया व अन्य 120 उपचारांसाठीच्या विशेष व्यवस्थेचा लाभ यापुढे जन आरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयातही घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 996 आजारांवरील उपचाराची सोय असून पंतप्रधान जीवनदायी योजनेत 1209 आजारांवर उपचार केले जातात. राज्यातील जवळपास 85 टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र 23 मे रोजी आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार पांढरी शिधापत्रिका धारकांसह राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा मिळणार आहे. तो येाजनेचा लाभार्थी नसला तरी हा लाभ मिळणार आहे.
  युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असून 31 जुलैपर्यंत या नव्या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील त्यातही मुंबईतील करोनाच्या रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन बहुतेक शासकीय व पालिका रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे.   करोना रुग्णांसाठी आगामी काळात खाटा कमी पडू नयेत व करोना नसलेल्या रुग्णांनाही व्यवस्थित उपचार मिळावे यासाठी सर्वच नागरिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.
   महत्वाचे शासकीय रुग्णालयांत 120 आजारांवर उपचार घेण्यासाठीचे तयार केलेल्या विशेष पॅकेज योजनेचा लाभ आता या योजनेतील अन्य खाजगी रुग्णालयातही घेता येणार आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली असली तरी राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन गरज वाटल्यास या योजनेला मुदतवाढ दिली जाणार आहे, असे आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयान्वये कळविले आहे.
******
                        शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू नये
·        खतांच्या किंमती जाहीर
·        कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : खरीप हंगाम 2020 मध्ये शेतकऱ्यांना रास्त भावाने खते मिळावीत. त्यांची फसवणूक होवू नये, यासाठी खतांच्या प्रति बॅग किंमती जाहीर करण्यात आलेल्या आहेत. याच किंमतीला शेतकऱ्यांना खत विक्री करावी. शेतकऱ्यांनी याच किंमतीला खत खरेदी करावे. कुठलाही गैरप्रकार आढळल्यास नजिकच्या तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती, कृषि अधिकारी यांना अवगत करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे वतीने करण्यात आले आहे.
खताचे कंपनीनुसार प्रती बॅग दर :
कंपनी जीएसएफसी :  ग्रेड 20.20.0.13 - किंमत प्रति बॅग 975, ग्रेड 10.26.26 – प्रति बॅग 1175, ग्रेड 12.32.16 – प्रति बॅग 1185, डिएपी - प्रति बॅग 1200,  कंपनी कोरोमंडल : ग्रेड  डीएपी – 1250, ग्रेड 10.26.26- प्रति बॅग्‍ 1185, ग्रेड एमओपी – प्रति बॅग 950, ग्रेड 20.20.0.13-  प्रति बॅग 1000,  कंपनी स्मार्टटेक : ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 1065, ग्रेड 10.26.26- प्रति बॅग 1295, कंपनी आयपीएल : ग्रेड डीएपी- प्रति बॅग 1225,  ग्रेड एमओपी – प्रति बॅग 950, ग्रेड 16.16.16 – प्रति बॅग 1075, कंपनी आरसीएफ : ग्रेड युरीया – प्रति बॅग 266.50, ग्रेड 15.15.15- प्रति बॅग 1060, कंपनी इफको : ग्रेड 10.26.26 - प्रति बॅग 1200, ग्रेड 12.32.16- प्रति बॅग 1185, ग्रेड 20.20.0.13- प्रति बॅग 975 रूपये, कंपनी झुआरी : ग्रेड डिएपी - प्रति बॅग 1255 रूपये, कंपनी जीएनव्हीएफसी : ग्रेड 20.20.0-  प्रति बॅग 950.   
                                                                        **********
डोंगरखंडाळा गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. डोंगरखंडाळा येथील लोकसंख्या 8630 असून टँकरद्वारे गावाला दररोज 1 लक्ष 66 हजार 400 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.                                                                                            *******

कोरोना अलर्ट : आज प्राप्त 38 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 3 पॉझीटीव्ह
·        आव्हा येथील एका रूग्णाला सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 41 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 38 अहवाल कोरोना निगेटीव्ह, तर 3 अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये रायगड कॉलनी, बुलडाणा येथील 24 वर्षीय तरूण, सावरगांव जहाँ ता. मोताळा येथील 35 वर्षीय पुरूष आणि येरळी ता. नांदुरा येथील 39 वर्षीय पुरूष आहे. सावरगांव जहाँ ता. मोताळा येथील तरूणाचा मुंबई प्रवास इतिहास आहे. तसेच येरळी ता. नांदुरा येथील पुरूषही मुंबई येथून आलेला आहे. मात्र सदर व्यक्तीला नांदुरा येथील आयटीआय येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे बुलडाणा येथील युवक हा फिलीपाईन्स येथून आलेला आहे.
    तसेच आव्हा ता. नांदुरा येथील एका 24 वर्षीय रूग्णाला आज कोविडचे मागील दहा दिवसांपासून कुठलेही लक्षणे नसल्यामुळे  रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.  आतापर्यंत 1053 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 53 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.  आतापर्यंत 29 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 29 आहे.  सध्या रूग्णालयात 21 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
   तसेच आज 28 मे रोजी 41 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 38 निगेटीव्ह, तर 3 पॉझीटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 91 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1053 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.
****
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन
बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज 28 मे 2020 रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयात अभि‍वादन करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी  यांनी  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभि‍वादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थित होती.
                                                                                                ******

No comments:

Post a Comment