Friday 27 October 2017

news 27.10.2017 dio buldana

पालकमंत्री यांच्याहस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण
  • राज्यस्तरीय शालेय कराटे  स्पर्धा

     बुलडाणा, दि. 27 : स्थानिक सहकार विद्या मंदीर येथे आयोजित राज्यस्तर शालेय कराटे स्पर्धेतील विविध वजन गटातील विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण आज 27 ऑक्टोंबर 2017 रोजी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, कराटे असोसिएशनचे अध्यक्ष श्री. वाछा, श्री. नायर, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील आदी उपस्थित होते.   
   विदर्भात प्रथमच कराटे खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा बुलडाण्यात आयोजित होत असल्याबद्दल  क्रीडा विभागाचे आभार मानीत पालकमंत्री यावेळी म्हणाले,  या स्पर्धांतून खेळाडूंची राष्ट्रीय चमूमध्ये निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच प्रत्येक खेळाडूने जीव ओतून खेळला असेल. भविष्यात या खेळांमधून खेळाडूने आपले करीअर करून देशाचे नाव उंचवावे.
   याप्रसंगी प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले. आभार बी. आर जाधव यांनी मानले. खेळामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पदक, गुलाबपुष्प देवून खेळाडूंचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला खेळाडूंचे नातेवाईक, परीक्षक, खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
                                                  *********
पाण्याचा वापर काटकसरीने करावा
-       पालकमंत्री
  • पाणी आरक्षण समितीची बैठक
  • पिण्यासाठी पाण्याचे प्रथम आरक्षण करावे
  • प्रकल्पात पाणीसाठा कमी असल्यास ओलीताखालील पीक घेवू नये

     बुलडाणा, दि. 27 : यंदाच्या पावसाळ्यात पाऊस समाधानकारक जरी पडला असेल, तरी  जलसाठे ओसंडून वाहतील, असा झालेला नाही. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचे सावट जिल्ह्यात येणार आहे. या संकटाचा सामना करण्यासठी आतापासून पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. सिंचन विभागाने पाणीसाठ्यातील पाण्याचा साठा लक्षात घेवून लाभ क्षेत्रातील गावांमध्ये सिंचन न करण्याबाबत जागृती करावी. तसेच प्रत्येक नागरीकाने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन  पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.
  पाणी आरक्षण समितीच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी एस षण्मुखराज, बुलडाणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे आदी उपस्थित होते.
  पाणीटंचाईचे भविष्यातील सावट लक्षात घेता पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार करणे गरजेचे असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, ज्या प्रकल्पांमध्ये पाणी साठा अत्यल्प आहे, अशा प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाणी मिळणार नाही. लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी पाणी साठा अत्यल्प असल्यामुळे ओलीताखालील पिक घेवू नये. जेणेकरून भविष्यात पिकाला पाणी न मिळाल्यास पीक नष्ट व्हायची वेळ येणार नाही. ज्या प्रकल्पांमधून प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना पाईप लाईनद्वारे पाणी देणे शक्य असल्यास अशा ठिकाणी नदीद्वारे पाणी सोडण्यात येवू नये. त्यामुळे पाण्याची नासाडी होते. पाण्याची थकबाकी असणाऱ्या स्थानिक स्वराज्‍य संस्था, शासनाचे विभाग यांनी त्वरित थकबाकी जमा करावी. तसेच कुणीही परवानगीशिवाय प्रकल्पांमधील पाणी नदीमध्ये अथवा कालव्याद्वारे सोडणार नाही.
    जिल्हाधिकारी श्री. पुलकुंडवार यावेळी म्हणाले, मोटारीने कुणी प्रकल्पांमधून पाणी उचलत असल्यास त्वरित मोटारींच्या जोडण्या बंद कराव्यात. अशा वेळेस महसूल, सिंचन व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकांनी कारवाई करावी. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये भूजल अधिनियमाची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करावी. सार्वजनिक पाण्याचे स्त्रोतांचे संरक्षण करावे. यावेळी कार्यकारी अभियंता श्री. ठाकरे यांनी विविध प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठा व पिण्याच्या पाण्यासाठी असलेले पाणी मागणी याची माहिती दिली. बैठकीला सिंचन, महसूल, पाणी पुरवठा विभागाचे अधिकार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                  ************
शिष्यवृत्तीच्या महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक मार्गदर्शनासाठी 31 ऑक्टोंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

     बुलडाणा, दि. 27 : महाडीबीटी पोर्टलबाबत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन 31 ऑक्टोंबर 2017 रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
    शिष्यवृत्ती योजनेचे काम पाहणारे कर्मचारी यांनी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गनिहाय एकूण शिष्यवृत्ती व फ्रिशिप विद्यार्थी संख्या, नोंदणी झालेली शिष्यवृत्ती, फ्रिशिप विद्यार्थी संख्या तसेच नोंदणी न होण्याचे सविस्तर कारणासह कार्यशाळेस न चुकता हजर रहावे.  त्याचप्रमाणे ज्या महाविद्यालयांनी विशेष चौकशी पथक यांचेकडून झालेल्या लेखा परिक्षण अहवालातील तदर्थ अनुदानाबाबत माहिती दिलेली नाही. त्यांनी तदर्थ अनुदानाच्या सविस्तर माहितीसह उपरोक्त स्थळी 31 ऑक्टोंबर 2017 रेाजी दुपारी 12 वाजता हजर रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
                                          **********
महाराष्ट्र राज्य  सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांचा दौरा

     बुलडाणा, दि. 27 :  महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर दि. 31 ऑक्टोंबर 2017 रोजी  जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 30 ऑक्टोंबर 2017 रोजी सायंकाळी सोयीनुसार वाशिम येथून बुलडाणाकडे प्रयाण, रात्री शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथे आगमन व मुक्काम, दि. 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता बुलडाणा येथून मलकापूरकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मलकापूर शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11.30 वाजता मलकापूर येथून बुलडाणाकडे प्रयाण, दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 2 वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार परिषद कार्यक्रमास सहकार विद्या मंदीर येथे उपस्थिती, रात्री 9 वाजता बुलडाणा येथून पुणेकडे प्रयाण करतील.
                                          ***********
सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
  बुलडाणा, दि. 27 : संघ लोकसेवा आयोगामार्फत फेब्रुवारी 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरीता जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. पदवीधर उमेदवार असून सीडीएस परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरून पाठवतील. जाहीरातीनुसार पात्र असलेल्या उमेदवारांची निवड परीक्षापूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे करण्यात येणार आहे. सीडीएस परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे.

   कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसच्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे राज्य शासनातर्फे १८ नोव्हेंबर 2017 ते 31 जानेवारी 2018 या कालावधीत प्रशिक्षण वर्ग 55 चालविण्यात येणार आहे. निवास, भोजन प्रशिक्षणाची सोय शासनामार्फत मोफत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी सैन्य दलात अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे 12 नोव्हेंबर 2017 रोजी पदवी पर्यंतच्या सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे. ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर त्याची प्रिंट घेवून मुलाखतीचे वेळेस दाखविल्याशिवाय उमेदवाराची निवड करण्यात येणार नाही. मुलाखतीचे वेळी वस्तुनिष्ठ पद्धतीची लेखी परीक्षा मुलाखत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेकडून घेतली जाणार आहे. मुलाखतीस येण्याआधी उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे संकेतस्थळ www.mahasainik.com  वर recruitment tab ला क्लिक करून त्यामध्ये CDS-55 या कोर्ससाठी उपलब्ध महत्वाच्या तारखा चेक लिस्ट सोबत असणारी सर्व परिशिष्टांचे अवलोकन करून त्यांना डाऊनलोड करावे. त्याची दोन प्रती काढून ते पूर्ण भरून घेवून यावे. अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या 0253-2451031 2451032 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. अथवा प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment