Monday 16 October 2017

article on jalyukt shivar...16.10.17

विशेष लेख :-

शिवार झाले पाणीदार.. सिंचन होईल जोमदार..
     बुलडाणा, दि. 16 - पाणी हे केवळ मानवाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारे संसाधन नसून ते विकासाचे साधन आहे. त्याचा योग्य वापर केल्यास मानवजातीचा विकास चांगल्या प्रकारे व वेगाने होवू शकतो. शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी, विजेची निर्मिती, कारखानदारी यात पाण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. दुष्काळ.. केवळ नावच पुरेसे आहे. या एका शब्दातच सारे सामावले आहे. या शब्दामध्ये असलेल्या गर्भीत अर्थाचे चटके राज्यातील जनतेने अनुभवले आहे. हे चटके दूर करण्यासाठी.. राज्य शासनाने जलयुक्त शिवार नावाचे जलसंधारण व मृद संधारणामध्ये क्रांती घडवून आणणारे अभियानाची अंमलबजावणी केली आहे. या अभियानातून झालेल्या कामांमुळे पाणी अडविल्या गेले, जिरविल्या गेले आणि पिकांना पुरविल्याही गेले. त्यामुळे शिवार झाले पाणीदार..आणि सिंचन होईल जोमदार.. अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे.
 बुलडाणा जिल्ह्यातही या अभियानाने चांगलेच बाळसे धरले आहे. सन 2015-16 मध्ये जिल्ह्यातील 330 गावे पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आली.  या गावांमध्ये जलसंधारणाची विविध प्रकारची 9 हजार 132 कामे पूर्ण करण्यात आली आहे. या वर्षामध्ये विविध कामांच्या माध्यमातून जिल्ह्यात 45 हजार 270 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच 38 हजार 121 हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर 20 हजार 6 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या संरक्षीत सिंचन सुविधा निर्माण झाली. त्याचप्रमाणे सन 2016-17 मध्ये  दुसऱ्या टप्प्यात 245 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या टप्प्यातील प्रत्येक गावात शिवार फेरी काढण्यात येवून गावांच्या शिवारात कुठे-कुठे जलसंधारणाची कामे होऊ शकतात, याबाबत निश्चितता करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील 245 गावांमध्ये 3 हजार 296 कामे पूर्ण करण्यात आली आहे. तर 88 कामे प्रगतीपथावर आहे. या टप्प्यात विविध जलसंधारण कामांच्या माध्यमातून 17 हजार 172 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच 7 हजार 241 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या आणि 12 हजार 625 हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचन होणार आहे.  त्याचप्रमाणे सन 2017-18 मध्ये तिसऱ्या टप्प्यात 195 गावांची निवड अभियानाद्वारे जलसंपन्नतेकरीता करण्यात आली आहे.  या गावांचे गाव आराखडे तयार करण्यात आलेले आहेत.
    पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सतत टँकरग्रस्त असणारी 80 गावे यामध्ये प्राधान्याने निवडण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे भूजलच्या कमतरेतुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. भूजल स्तर कमी झाल्यामुळे जिल्ह्यात या 80 गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या ‘आ’ वासून उभी आहे.  सतत बाहेरून पाणी आणून या गावकऱ्यांची तहान भागविल्या जात आहे.  या गावांमधील जनतेला जलयुक्त शिवार अभियानामुळे साक्षात भगिरथ आल्याचा अनुभव येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे भूजल पातळी निश्चितच वाढली आहे.  नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे जलयुक्त शिवार अभियानातील साठवण बंधारा, तलाव, नाला खोलीकरण व रूंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारा आदींमध्ये चांगले पाणी साठले आहे. 
     जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पावसाने ओढ दिल्यानंतरही अनेक भागांत जलसंधारणांच्या विविध कामांमध्ये साचलेले पाणी उपयोगात आणले जात आहे. या बिकट परिस्थितीत जलयुक्त शिवार अभियान अत्यंत महत्वाची भूमिका बजावित आहे. जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यामध्ये टँकरग्रस्त खामखेड गाव शिवारात पाणीसाठा जलसंधारणच्या विविध उपचारांमुळे वाढला आहे. परिणामी, शेतकरी सिंचन करून पिके आहेत. खामगांव तालुक्यातील तोरणा नदीवर निर्माण करण्यात आलेल्या साखळी सिमेंट नाला बांधमुळे अटाळी, आंबेटाकळी, शिर्ला नेमाने व लाखनवाडा परीसरातील शेतकरी दुबार पीक घेत आहे. तसेच उपसा सिंचनाद्वारेही पिक फुलवित आहे.  मोताळा तालुक्यातील अवर्षण असलेल्या पट्टयामध्ये मोठ्या प्रमाणावर भूजल पातळीत वाढ झाली आहे. खांडवा गाव पाणीदार बनले आहे. गावातील शिवारात सात साखळी सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे दुष्काळाने होरपळणारे येथील शिवार जलयुक्त बनले आहे.
   त्याचप्रमाणे खारपाणपट्टयामधील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांमध्ये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून रिचार्ज शाफ्टची कामे झाली आहे. खांडवी परीसरातील अशाच एका कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आहे. या पद्धतीमुळे भुजल पातळीत कमालीची वाढ नोंदविण्यात आली आहे.  खारपाणपट्टयातील या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यात येत आहे. परिणामी, जमिनीतील क्षारही कमी होण्यास मदत मिळत आहे. अशाप्रकारे जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यात नक्कीच जलसमृद्धी येत असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.
    सध्याही जिल्ह्याला पाणीटंचाईचे संकट भेडसावत आहे. या पार्श्वभुमीवर  प्रशासनाने  प्रथमता  टॅंकरमुक्तीचे ध्येय समोर  ठेवुन  विविध  योजनातंर्गत  मृद  व जलसंधारणाचे उपचार हाती  घ्यावयाचा  निर्णय  हाती घेतला आहे. त्यासाठी  सर्वच विभागांचा बहुमोल  सहभाग प्राप्त करुन घेतला आहे.  जिल्हा प्रशासनाने  मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत प्राप्त झालेल्या  निधीतुन साखळी  सिमेंट नाला बांधची कामे केली. तसेच  कोल्हापुरी  बंधारे दुरुस्ती  व गेट  बसविण्यासाठी  कामेही घेण्यात आली.
     जलयुक्त शिवार अभियानामध्ये दोन टप्प्यात 1205 साखळी सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. तसेच 938  सिमेंट नाला बांध  पूर्ण करण्यात आलेले आहे. साखळी सिमेंट बांध व  पूर्ण झालेल्या  सिमेट नाला बांधामुळे भूजल पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे शेतीसाठी शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण होवून शेतकऱ्यांना दुबार पीक काढता येणे शक्य झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी येवून शेतकरी संपन्न होत आहे.
    या अभि‍यानाच्या प्रथम, द्वितीय टप्प्यात जिल्ह्यातील 575 गावांमध्ये विविध विभागांच्या समन्वयाने  12 हजारावर कामे पूर्ण  करण्यात आली आहे. या संपूर्ण कामांमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावर संरक्षीत सिंचन उपलब्ध झाल्यामुळे पीक उत्पादनात वाढ झाली आहे. शासनाच्या महत्वांकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकरी समाधानी आहे. एकंदरीतच जिल्हा या अभियानांमधील कामांमुळे जलसमृद्ध होणार एवढे मात्र निश्चित.
***********
कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा करण्याची प्रक्रिया 18 ऑक्टोंबरपासून सुरू
·        मुख्यमंत्री यांचे स्वाक्षरीचे शेतकऱ्यांना मिळणार ‘कर्ज बेबाक’ प्रमाणपत्र
·        प्रत्येक जिल्ह्यात प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन
·        मुख्यमंत्री यांच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयात थेट प्रक्षेपण
 बुलडाणा, दि. 16 राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत दीड लाख रूपयांपर्यंत कर्ज पूर्णपणे तर दीड लाखावरील कर्ज एकरकमी पद्धतीने मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, अर्जांची छाननी व लेखा परीक्षण पूर्ण करण्यात आले. ऑडीट केलेल्या अर्जांच्या फाईली शासनाकडे सादर करण्यात आल्या. यामध्ये जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. राज्यात 18 ऑक्टोंबरपासून कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.  यामध्ये दीड लाखापर्यंत कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना थेट मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे ‘कर्ज बेबाक’ प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
   जिल्ह्यात मुदतीपर्यंत कर्जमाफीचे ऑनलाईन 4 लाख 67 हजार 475 शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यात आली.   कुटूंब व्याख्येत 2 लाख 50 हजार 745 कुटूंबांचे अर्ज प्राप्त झाले आहे. त्यानुसार दीड लक्ष रूपयापर्यंत कर्ज माफ झालेल्या प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात कर्ज बेबाक प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. या कार्यक्रमाचे राज्यस्तरीय आयोजन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण 18 ऑक्टोंबर 2017 रोजी दुपारी 12 वाजता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
     जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रम 18 ऑक्टोंबर 2017 रेाजी दुपारी 12 वाजता होणार आहे. यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात शेतकरी कुटूंबाचा सन्मान करण्यात येणार असून मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे.  तसेच मुंबईत प्रत्येक जिल्ह्यातील दोन शेतकरी कुटूंबाना आमंत्रित करून मुख्य कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी कळविले आहे.
                                                                        ********
रब्बी हंगामासाठी महाबिजचे अनुदानावर हरभरा बियाणे उपलब्ध
 बुलडाणा, दि. 16 - जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये हरभरा  डाळवर्गीय पिकाची लागवड करण्यात येते.  या वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी हंगामात हरभरा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगाम 2017-18 करीता जिल्ह्यात हरभरा बियाण्याचा पुरवठा महाबिजच्या माध्यमातून करण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत महाबीजद्वारा जिल्ह्यामध्ये हरभरा जॅकी 9218 व दिग्वीजय वाणाचे प्रमाणित बियाणे मोठ्या प्रमाणात अनुदानावर उपलब्ध आहे.  तरी शेतकरी बांधवांनी संबधित तालुका कृषि अधिकारी यांना भेटून परमीट प्राप्त करून घ्यावे व अनुदानित बियाण्याच्या पेरणीकरीता लाभ घ्यावा, असे आवाहन महाबिजकडून करण्यात आले  आहे.
                                                                                                                                                                        ********
शासकीय वाहनांची माहिती 18 ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन सादर करावी
·        उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
 बुलडाणा, दि. 16 -राज्य शासकीय वाहनांची माहिती ऑनलाईन संकलीत करण्याचे काम सुरू आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय वाहनांची माहिती 18 ऑक्टोंबर 2017 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. तरी परिवहन विभागाच्या 3 ऑक्टोंबर 2017 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातील सुचनांप्रमाणे वन विभागाव्यतिरिक्त सर्व शासकीय कार्यालयांनी कार्यालयातील शासकीय वाहनांची माहिती सादर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आली  आहे.
महाराणा प्रताप संस्थेकडून प्रकाशित पदभरतीची जाहीरात दिशाभूल करणारी
·        संस्थेने पद भरल्यास पदांना वैयक्तिक मान्यता दिल्या जाणार नाही
·        शिक्षणाधिकारी यांचा खुलासा
 बुलडाणा, दि. 16 महाराणा प्रताप संस्था, अकोला यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर 10 पदांची जाहीरात वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केली आहे. ही जाहीरात संस्थापक व अध्यक्ष, महाराणा प्रताप संस्था, अकोला र.न. एफ 1432 – अकोला या नावाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहीरातीमध्ये नमूद पदे कोणत्या शाळेसाठी व अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत यापैकी कोणत्या शाळा प्रकाराची आहेत, या बाबत उल्लेख नाही. जाहीरातीच्या अनुषंगाने काही लोकांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाकडे भ्रमणध्वनीद्वारे विचारणा केली असता ही बाब कार्यालयाच्या निदर्शनास आली. या संस्थेची जिल्ह्यात महाराणा प्रताप विद्यालय, चिखली आणि पांडव विद्यालय, कव्हळा ता. चिखली अशा दोन अनुदानित शाळा आहेत. सदर शाळांवर पद भरणेबाबत शासनाकडून अथवा शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प, बुलडाणा यांचेकडून कोणत्याच प्रकारची जाहीरात परवानगी संस्थेस/शाळेस देण्यात आलेली नाही. सदर पद संस्थेनी भरल्यानंतर शिक्षण विभागाकडे पदांना वैयक्तिक मान्यता मिळणेसाठी प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्याला मान्यता देण्यात येणार नाही. सदर जाहीरात दिशाभूल करणारी असल्याने पदभरती बाबत सर्वस्वी जबाबादारी संबंधीत संस्थेची राहणार आहे, असा खुलासा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीराम पानझोडे यांनी पत्रकान्वये केला आहे.

                                                            ***** 

No comments:

Post a Comment