Tuesday 10 October 2017

NEWS 10.10.2017 DIO BULDANA


किटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्यावी
·       हवेच्या दिशेने फवारणी करावी, तणनाशकांचा पंप किटकनाशकांसाठी वापरू नये
·       पंपाचे नोझलमधील कचरा तोंडाने काढू नये
·       कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि‍. 10 - किड व रोग नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. किटकनाशकांची फवारणी करताना तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. फवारणी करणारी व्यक्ती पीक हंगामात दीर्घकाळ किटकनाशकांची फवारणी केल्यामुळे सतत किटकनाशकांच्या संपर्कात येते. दाटलेल्या पिकांमध्ये शेतमजुर दिवसभर फवारणी करीत असल्याचे दिसुन येते. अशा व्यक्तींमध्ये त्वचेची ॲलर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, चक्कर येणे, दृष्टी कमी होणे आदी प्रकारची लक्षणे दिसण्याची शक्यता असते. किटकनाशक हाताळणी, साठवणूक व फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
  फवारणीचे द्रावण तयार करताना अशी घ्यावी काळजी : दाटलेल्या पिकात फवारणी करताना एकेरी नोझल असलेला पंप वापरावा, नेहमी स्वच्छ पाणी वापरावे, गढुळ पाणी अथवा साचलेल्या पाण्यात फवारणी करू नये, हातमोजे, मास्क, टोपी, ॲप्रान, पुर्ण पँट, गॉगल हे संरक्षण साहीत्य वापरल्याशिवाय द्रावण तयार करू नये,  किटकनाशक शरीराच्या कुठल्याही भागावर पडणार नाही याची काळजी घ्यावी, नाक, कान, डोळे व हात फवारणी होत असलेल्या औषधापासून संरक्षित राहतील, याची संपूर्ण काळजी घ्यावी, किटकनाशक यांच्या लेबलवरील सुचना समजून घ्याव्यात, गरजेनुसार व गरजे इतकेच द्रावण तयार करावे, दाणेदार प्रकारची औषधे तशीच वापरावीत, त्यांना पाण्यात विरघळू नये, स्प्रे पंपाची टाकी भरताना औषधे सांडणार नाही याची काळजी घ्यावी, फवारणी संपल्यावर आंघोळ करावी व कपडे स्वच्छ धुवावे, फवारणी करताना खाणे,पिणे, धुम्रपान करणे, तंबाखू खाणे आदी प्रकार अजिबात करू नये, शिफारस केलेल्या तिव्रतेच्या औषधांचा वापर करावा, अतितीव्रतेची औषधे वापरले म्हणजे किडरोग नियंत्रणात होतो असे नाही किंबहुना त्यायोगे पर्यावरण व पिकांच्या स्वास्थ्यावर परीणाम होवू शकतो.
साठवणूक करताना घ्यावयाची काळजी : किटकनाशके कुलुपबंद ठेवावी, लहान मुलांपासून दूर ठेवावी, सुर्यप्रकाश, पावसाचे पाणी व हवेची झुळुक यांचे संपर्कात किटकनाशक येणार नाही याची काळजी घ्यावी, किटकनाशके व तणनाशके यांची वेगवेगळी साठवणूक करावी, औषधे मुळ पॅकींगमधून इतर पॅकींगमध्ये ओतून घेवू नये, औषधे त्यांचे मूळ पॅकींग अथवा वेस्टनात ठेवावी, राहत्या घरामध्ये किटकनाशके ठेवू नये,
बाधित व्यक्तिची घ्यावयाची काळजी : विषबाधा झाल्यास बाधीत व्यक्तीस अपघात स्थळापासून दूर न्यावे, त्याच्या अंगावरील कपडे बदलावे, व्यक्तीला घाम येत असल्यास टॉवेलने पुसून काढावा, श्वासोच्छवास योग्य रितीने सुरू आहे की नाही याची खात्री करावी, व्यक्तीला झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी ठेवावी, बेशुद्धावस्था असल्यास काहीही खाऊ घालण्याचे प्रयत्न करू नये, थंडी वाजत असल्यास पांघरून द्यावे, व्यक्तीला पिण्यासाठी दुध तसेच विडी, सिगारेट व तंबाखु देवू नये, शरीर अथवा बाधित भाग साबणाने  ताबडतोब स्वच्छ करावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
*******
     




13 ऑक्टोंबर रोजी आपत्ती निवारण दिनाचे आयोजन
बुलडाणा, दि. 10संयुक्त राष्ट्र संघटनेने 13 ऑक्टोंबर 2017 रोजी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस साजरा करण्याचे घोषीत केले आहे. त्यानुसार जगभरात प्रथमच आपत्ती धोके निवारण दिवसा साजरा करण्यात येणार आहे. आपत्ती धोके निवारणाविषयी जनजागृती करून व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवून हा दिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
    त्याचप्रमाणे 9 ते 13 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत आपत्ती  धोके निवारण उपक्रम राबविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती व मानव निर्मित आपत्तीबाबत माहिती देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आपत्तीबाबत जास्तीत जास्त जाणीव जागृती व्हावी, यासाठी इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंत चित्रकला स्पर्धा, 5 वी ते 7 वी पर्यंत चित्रकला/ निबंध स्पर्धा, 8 ते 10 वी पर्यंत पोष्टर्स व घोषवाक्य स्पर्धा तसेच कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयीन स्तरावर परीसंवाद आणि वर्क्तृत्व  स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच 13 ऑक्टोंबर रेाजी शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे.
     पोलीस विभागाकडून उपवीभागीय स्तरावर रस्ता अपघाताचे मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नगर पालिका अग्नीशामक दल यांचेकडून बुलडाणा, खामगांव व शेगांव येथे आगीचे मॉक ड्रील आयोजीत करण्यात आले. तसेच शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण तहसीलदार बुलडाणा, जिल्हा होमगार्ड कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांचे अंतर्गत स्व. भोंडे सरकार जलाशय, येळगांव येथे बोटीचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये 13 ऑक्टोंबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
                                                                        **********
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत पत्रकारांना पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित
·       24 ऑक्टोंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन
 बुलडाणा, दि. 10 :  राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी जलयुक्त शिवार अभियानाची प्रचार व प्रसिद्धी  तसेच जनजागृती केली आहे, अशा पत्रकारांच्या प्रवेशिका बुधवार, दिनांक 20 ऑक्टोबर 2017 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयामध्ये स्विकारण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 कालावधीत प्रसिद्धा केलेले साहित्य विचारात घेण्यात येईल.
       जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट येागदान देणाऱ्या पत्रकारांसाठी सुरु करण्यात आलेल्या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार राहणार असून यामध्ये प्रथम पुरस्कार 31 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 21 हजार रुपये व तृतीय 15 हजार रुपये बक्षीसाची रक्कम राहणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समितीकडे प्रवेशिका सादर करणे आवश्यक आहे.
               विभागीय पुरस्कार राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार या नावाने देण्यात येणार असून प्रथम पुरस्कार 50 हजार, द्वितीय 35  हजार व तृतीय 25 हजार रुपये आहे. राज्यस्तरावर महात्मा ज्योतीराव फुले जलमित्र पुरस्कार या नावाने देण्यात येणार असून यामध्ये प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, द्वितीय पुरस्कार 71 हजार व तृतीय पुरस्कार 51 हजार रुपये राहणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी राज्यस्तरावर तीन पुरस्कार असून यामध्ये प्रथम पुरस्कार 1 लक्ष रुपये, द्वितीय पुरस्कार 71 हजार रुपये तर तृतीय पुरस्कार 51 हजार रुपये आहे. राज्यस्तरावर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्या प्रतिनिधींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.  इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकाराने राज्यस्तरावर पुरस्कारासाठी संचालक मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन पुणे यांच्याकडे दिनांक 2 नोव्हेंबर 2017 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत व मुद्रीत माध्यमांतील पत्रकारांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडे 24 ऑक्टोंबर 2017 प्रस्ताव, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
                                                ******



‘महाराष्ट्र वार्षिकी’, ‘महामानव’ पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध
  •  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची प्रकाशने
   बुलडाणा, दि. 10 : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाव्‍दारे ‘महाराष्‍ट्र वार्षिकी 2017’ हा संदर्भग्रंथ व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जीवनाच्‍या विविध पैलूवर प्रकाश टाकणारे ‘महामानव’ हे पुस्‍तक प्रकाशित करण्‍यात आले आहे. ही दोन्‍ही पुस्‍तके जिल्‍हयातील बुक स्‍टॉल, स्‍पर्धा परिक्षा केंद्र व जिल्‍हा माहिती कार्यालय येथे विक्रीस उपलब्‍ध आहे. वाचक व स्‍पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी पुस्‍तकात अतिशय उपयुक्‍त माहिती दिली आहे. वाचक विद्यार्थ्‍यांना पुस्‍तक खरेदी करावयाचे असल्‍यास जिल्‍हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कळविण्यात येत आहे.
‘महाराष्‍ट्र वार्षिकी’ या पुस्‍तकात महाराष्‍ट्राची अधिकृत, वस्‍तुनिष्‍ठ माहिती,  महाराष्‍ट्राचा इतिहास,  भूगोल,  जनजीवन,  महाराष्‍ट्राची परंपरा, महाराष्‍ट्रातील जिल्‍हे, शासनाचे विभाग, गत वर्षातील राज्‍य शासनाने घेतलेले महत्‍वाचे निर्णय, योजना,  घडामोडी तसेच  भारताचे राष्‍ट्रपती, उपराष्‍ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, मंत्रीमंडळ निर्णय, केंद्राचे व महाराष्‍ट्राचे मंत्रीमंडळ, महाराष्‍ट्र विधिमंडळ सदस्‍य, संसद सदस्‍य आदी माहितीचा समाविष्‍ट आहे.  ‘महामानव’ पुस्‍तकात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विविधांगी पैलूवर आधारित अभ्‍यासपूर्ण लेख, राज्‍यातील मान्‍यवर लेखक, संशोधक, प्राध्‍यापक, संपादक, लेखक यांनी लिहिले आहे. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चतुरस्‍त्र प्रतिमेची नेमकी व प्रभावीरित्‍या ओळख होते. हे पुस्‍तक अभ्‍यासक, संशोधक आणि वाचक या सर्वासाठी अतिशयक उपयुक्‍त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे श्रेष्ठत्व आणि त्‍यांचे चौफेर व्यक्तिमत्व जाणून घेण्‍यासाठी हे पुस्‍तक सहाय्यभूत ठरेल. दोन्ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असून अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे संपर्क साधावा. तसेच कार्यालयाच्या 07262-242341 क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
                                                ********
ऑनलाईन ई चलानद्वारे मुद्रांक शुल्काचा भरणा करावा
  • नागरिकांनी http://gras.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर चलान भरावे
  • नागरिक स्वत: चलन तयार करू शकतात
   बुलडाणा, दि. 10 :  राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनी मागण्या मान्य करण्यासाठी बेमुदत संप पुकारला असल्याचे निवेदन सह जिल्हा निबंधक कार्यालयाला दिले आहे. त्यामुळे नागरिकांची कामकाजासाठी गैरसोय होवू नये म्हणून शासनाने ई चलानद्वारे मुद्रांक शुल्क  भरण्याची व्यवस्था केली आहे. सदरचे चलन GRASS http://gras.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना स्वत: तयार करता येते. मुद्रांक शुल्काची आवश्यक ती रक्कम ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष बँकेत जावून भरणा करता येते.
   विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर विविध दस्तऐवजांचे मसुदे उपलब्ध असून या संकेतस्थळावरून ग्रास प्रणलीच्या संकेतस्थळावरसुद्धा जाता येते. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधीत तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी एन.व्ही पिंपळे यांनी केले आहे.
                                                                       **********
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तरूणांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
  • पात्र उमेदवारांनी 24 ऑक्टोंबर 2017 रोजी सामाजिक न्याय भवन येथे उपस्थित रहावे
   बुलडाणा, दि. 10 :  जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील युवक-युवतींना व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी 24 ऑक्टोंबर 2017 रोजी शारिरीक मापदंड चाचणीचे आयोजन सकाळी 11 वाजता सहायक आयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक , चिखल रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
   उमेदवार हा राज्याचा रहीवासी व अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील असावा, उमेदवार हा 18 ते 25 वर्ष वयोगटातील असावा,  पुरूष उमेदवारांची उंची 165 से.मी व महिला उमेदवारांची 155 से.मी असावी, पुरूष उमेदवारांकरीता छाती 79 से.मी व फुगवून 84 सेमी असावी, उमेदवार / प्रशिक्षणार्थी इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा, उमेदवाराने जात प्रमाणपत्र, रहीवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातंर्गत नाव नोंदणी दाखला व ओळखपत्राची सत्यप्रत असावी. उमेदवार हा शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा. या अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांनी 24 ऑक्टोंबर रोजी आवश्यक त्या मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असेआवाहन सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
                                                                                   *********
चिखली येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
  • 175 पदांसाठी होणार भरती
  • www.mahaswayam.in  या संकेतस्थळावर उमेदवारांनी नोंदणी करावी
बुलडाणा, दि. 10 - खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी हेरून बेरोजगार युवक-युवतींना त्या उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभाग नेहमी तत्पर असतो. त्यानुसार येत्या शुक्रवार, 13 ऑक्टोंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली येथे बेरोजगारांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात रेमंड लक्झरी कॉटन लिमीटेड, अमरावती या कंपनीला प्रशिक्षणार्थी टेक्नीशियन, भारतीय जीवन निगम, बुलडाणा यांना  ग्रामीण व्यवसायिक एजंट पदाकरीता भरती होणार आहे. ही भरती एकूण 175 पदांसाठी  करण्यात येणार आहे.
   या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी उमेदवारांनी www.mahaswayam.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणी न केलेल्या उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होता येणार नाही. संकेतस्थळावर Employment टॅबवर क्लिक करा, जॉब सिकर पर्याय निवडून आपला नोंदणी/आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने sign in  करावे. त्यानंतर होमपेजवरील जॉब फेअर  हा पर्याय निवडून बुलडाणा जिल्हा निवडावा. तसेच 13 ऑक्टोंबर 2017 रोजी होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थिती नोंदविण्यासाठी क्लिक करावी व आय ॲग्री या बटनावर क्लिक करावी. त्यान्रतर आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनावर क्लिक करावी.  इच्छूक पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने संबंधित ठिकाणी उपस्थित राहून नोंद करावी व  या मेळाव्यास उपस्थित रहावे.  सहभागाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी काही अडचण आल्यास 18602330133 क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच मेळाव्याकरीता 07262-242342, 07264-242995 व सचिन पवार यांच्या 9552319696 क्रमांकावर संपर्क साधावा.

    मेळाव्यासाठी येताना उमेदवारांनी कार्यालयाचे नोंदणी ओळखपत्र, शैक्षणिक अहर्ततेच्या मूळ प्रमाणपत्र व पाच प्रती, बायोडाटा, आधार कार्ड/ निवडणूक ओळखपत्र, 5 पासपोर्ट फोटो सोबत आणावे. तरी मोठ्या संख्येने उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून मेळाव्यात सहभागी व्हावे आणि आपली संधी स्वीकारावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक श्री. चिमणकर यांनी केले आहे.  

No comments:

Post a Comment