गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


बुलढाणा, दि. 11 (जिमाका): गटई काम (कातडी सोलणे व त्यापासून चपला-जोडे तयार करणे) करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत सन २०२५–२६ या वर्षासाठी योजना राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पात्रतेच्या अटी व शर्ती:

  1. अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरून त्यावर पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटविलेला असावा.
  2. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
  3. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
    • ग्रामीण भागासाठी ₹८०,००० पेक्षा अधिक नसावे
    • शहरी भागासाठी ₹१,००,००० पेक्षा अधिक नसावे
      (तहसीलदाराने निर्गमित केलेले उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक)
      किंवा अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असावा.
  4. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे.
  5. ज्या जागेसाठी स्टॉल मागितला आहे ती जागा ग्रामपंचायत, नगर परिषद/नगरपालिका, छावनी बोर्ड (कटक मंडळ) किंवा महानगरपालिका यांच्याकडून भाडेकराराने/खरेदीने/मोफत अधिकृत ताब्यात दिलेली असावी किंवा अर्जदाराची स्वतःची मालकीची असावी. यासंबंधी कागदपत्र जोडणे आवश्यक.
  6. अर्जदाराचा अधिकृत जातीचा दाखला जोडणे बंधनकारक.
  7. शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड प्रत, आधार कार्ड प्रत, अधिवास प्रमाणपत्र इत्यादींच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक.

अर्ज सादर करण्याबाबत सूचना:

  • विहित नमुना अर्ज विनामूल्य सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातून प्राप्त करून घ्यावा.
  • आवश्यक सर्व कागदपत्रांसह पूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलढाणा येथे दि. २०/०२/२०२६ रोजी कार्यालयीन वेळेत सादर करावा.
  • उशीरा अथवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्जातील त्रुटीपुर्ततेबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही.
  • विहित नमुन्याव्यतिरिक्त इतर अर्ज नमुने स्वीकारले जाणार नाहीत.

असे मनोज मेरत, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा यांनी कळविले  आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या