स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना ; भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही लाभ
• अपघाती मृत्यूसाठी २ लाख, तर कायमस्वरूपी अपंगत्वासाठी
१ लाखांचे सानुग्रह अनुदान
• अपघातानंतर दोन महिन्यांत अर्ज करणे आवश्यक
बुलढाणा,
दि. 26 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या कृषी
विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह
अनुदान योजने’ची
व्याप्ती वाढविण्यात आली असून, आता भूमिहीन शेतमजूर आणि पात्र महिला शेतकऱ्यांनाही
या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपघातग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार
देणाऱ्या या योजनेचा मलकापूर तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा,
असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने १० सप्टेंबर २०२६ रोजीच्या
शासन निर्णयानुसार ही योजना १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी
लागू केली आहे. योजनेत करण्यात आलेल्या सुधारणांमुळे शेतकरी कुटुंबांसह प्रत्यक्ष शेतीत
काम करणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांनाही आर्थिक संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अपघाती मृत्यूसाठी दोन लाखांचे अनुदान : या
योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे दोन्ही डोळे, दोन्ही हात अथवा
दोन्ही पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तसेच
अपघातामुळे एक डोळा, एक हात किंवा एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयांचे
अनुदान मिळू शकते.
भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकऱ्यांचाही समावेश
: पूर्वी प्रामुख्याने सातबारा उताऱ्यावर नाव असलेल्या खातेदार शेतकऱ्यांपुरती मर्यादित
असलेल्या या योजनेत आता पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात
आला आहे. भूमिहीन शेतमजुरांसाठी ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी आवश्यक असल्याचे नमूद करण्यात
आले आहे. तसेच संबंधित तरतुदींनुसार प्रमाणपत्र प्राप्त महिला शेतकरी आणि पात्र कुटुंबीयांनाही
योजनेचा लाभ मिळू शकतो. लाभार्थ्यांसाठी १० ते ७५ वर्षे हा वयोगट नमूद करण्यात आला
आहे.
१४ प्रकारच्या अपघातांचा समावेश : रस्ता व रेल्वे
अपघात, सर्पदंश, विंचूदंश, वीज पडणे, पाण्यात बुडणे, कीटकनाशकांमुळे विषबाधा, उष्माघात,
उंचावरून पडणे, जनावरांचा हल्ला तसेच दंगलीत मृत्यू किंवा अपंगत्व येणे अशा विविध आकस्मिक
घटनांचा योजनेत समावेश आहे.
मात्र, नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या किंवा आत्महत्येचा
प्रयत्न, अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली झालेला अपघात आणि गुन्हेगारी उद्देशाने कायद्याचे
उल्लंघन करताना झालेला अपघात यांसारख्या प्रकरणांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच
१० ते १८ वर्षे वयोगटातील व्यक्तीने विनापरवाना वाहन चालविताना झालेल्या अपघातासाठी
लाभाची तरतूद नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतर शासकीय योजनांमधून त्याच घटनेसाठी
लाभ घेतल्यास दुहेरी लाभ मिळणार नाही.
अपघातानंतर दोन महिन्यांत अर्ज करणे आवश्यक
: या योजनेतील सर्वांत महत्त्वाची अट म्हणजे अपघात घडल्यापासून दोन महिन्यांच्या, म्हणजेच
६० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे बंधनकारक मुदतीत अर्ज न केल्यास दावा अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे
पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
मंजूर अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी)
पद्धतीने लाभार्थी किंवा त्यांच्या कायदेशीर वारसदाराच्या आधारशी संलग्न बँक खात्यात
जमा केली जाणार आहे. योजनेची अधिक माहिती, पात्रतेचे निकष आणि अर्जाचा विहित नमुना
मिळविण्यासाठी मलकापूर तालुक्यातील संबंधित गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ
कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात
आले आहे.
00000

Comments
Post a Comment