बुलडाणा जिल्ह्यासाठी रब्बी ज्वारीच्या २ हजार १७० मिनीकिट्सचे उद्दिष्ट; शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करावा
बुलढाणा,
दि. 26 (जिमाका) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व
पोषण अभियानांतर्गत (NFSNM) रब्बी हंगाम २०२६-२७ साठी बुलडाणा जिल्ह्याला ज्वारीच्या
२ हजार १७० मिनीकिट्सचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र
शेतकऱ्यांना महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्जाच्या माध्यमातून देण्यात
येणार आहे.
रब्बी ज्वारी पिकाचे क्षेत्र व उत्पादकता वाढविणे,
सुधारित वाणांचा प्रसार करणे आणि शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे हा
या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना सुधारित बियाण्यांचा
लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी
पोर्टलवर संबंधित योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज भरताना आवश्यक माहिती अचूक नमूद
करावी तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मिनीकिट्सचे
वितरण शासनाच्या प्रचलित मार्गदर्शक सूचना, पात्रता निकष आणि उपलब्ध उद्दिष्टानुसार
करण्यात येणार आहे. योजनेची पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि लाभ वितरणाबाबत अधिक माहितीसाठी
शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी
संपर्क साधावा.
बुलडाणा जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी
या संधीचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment