Thursday 13 February 2020

DIO BULDANA NEWS 13.2.2020

‘पाच दिवसांचा आठवडा’ निर्णयाचे राजपत्रित अधिकारी महासंघाकडून स्वागत
  • प्रलंबित मागणी पुर्ण झाल्याचे समाधान
बुलडाणा, दि. 13 : राज्य शासनाने राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रलंबित असलेली पाच दिवसांच्या आठवडा करण्याची मागणी काल 12 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेवून पूर्ण केली. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी  महासंघाने स्वागत केले आहे.
    राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदसिद्ध अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी या निर्णयाचे स्वागत करीत म्हणाले, राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना आदी संघटनांची बऱ्याच दिवसांची पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी होती. ही  प्रलंबित मागणी पुर्ण झाल्याचे समाधान आहे. पाच दिवसांचा आठवडा करताना शासनाने मुंबई व मुंबई बाहेरील कार्यालयांसाठी एकच वेळ ठेवली आहे. आठवड्यातील अन्य चार दिवसांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत वाढ केलेली आहे. या वाढीव कामकाजाच्या वेळेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्ष राहून कामकाज करावे. सामान्य नागरिकांच्या हिताची कामे करताना वेळ कमी पडणार नाही, यावर कटाक्ष द्यावा. दिवस कमी असले तरी कामकाजाची वेळ वाढवलेली असल्याने नियमित कामेही अधिक मार्गी लागू शकतील.
   महासंघासोबतच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीसुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे. आठवड्याच्या कामकाज केल्यानंतर कामाचा ताण कमी करण्यास निश्चितच मदत मिळणार आहे. कुटूंबाला जास्त वेळ देवून जीवनमान आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. दिवसाच्या कामाची वेळ वाढल्याने पाच दिवसांचा आठवडा झाल्यानंतरही एकूणच कामाच्या तासांमध्ये वाढ झाली असल्याने कामावर परिणाम होणार नाही, अशा प्रतिक्रियाही कर्मचाऱ्यांमधून आल्या आहेत.
****
   आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत मालाची वाहतूक कंत्राटदाराने प्रमाणीत मार्गानेच करावी
  • पुरवठा विभागाने दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे
बुलडाणा, दि. 13 : सन 2016-17 पासून धान्य व भरडधान्यासाठी विकेंद्रीत खरेदी योजना राबविण्यात येत आहे. सन 2019-20 मध्ये काही जिल्ह्यात धानाची खरेदी होत असल्याने त्या धानापासून प्राप्त होणाऱ्या तांदुळाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा जास्त असून अतिरिक्त तांदुळाचे नियतन इतर जिल्ह्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यालाही मार्च 2020 साठी अंत्योदय योजनेसाठी 1330 मे.टन व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजनेकरीता 3039 मे.टन नियतन प्राप्त झाले आहे. या नियतनातील तांदुळाची उचल भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आमगांव गोदाम येथून करावयाची आहे. ही वाहतूक करताना कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणीत केलेल्या जवळच्या मार्गाव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने अथवा आडमार्गाने धान्याची वाहतुक करू नये.
   वाहतूक केल्याचे निदर्शनास आल्यास सदरचे वाहन काळ्या बाजारात जाण्याच्या उद्देशाने जात असल्याचे मानून वाहतुक दारावर कारवाई करण्यात येईल. आपत्कालीन परिस्थितीतील नियोजीत मार्गाव्यतिरिक्त अन्य पर्यायी मार्गाने वाहतुक करावी लागल्यास वाहतुकदाराने जिल्हाधिकारी यांची लेखी परवानगी घ्यावी. वाहतुकीदरम्यान वाहतुक कंत्राटदाराचे प्रतिनिधी, चालक, वाहक यांचेकडून होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अफरातफर / काळ्या बाजारास सर्वस्वी वाहतुक कंत्राटदारास जबाबदार धरण्यात येईल. वाहतुक कंत्राटदाराने त्यांच्या विश्वासातील प्रतिनिधी, परवानाधारक वाहन चालक, वाहक यांची नेमणूक करावी. अन्नधान्य व इतर जिवनावश्यक वस्तुंचा अपहार, चोरी, काळाबाजार याची रक्कम वाहतुक कंत्राटदाराकडून बाजार भावाच्या दुप्पट किंमतीने वसूल करण्यात येईल.  वाहतुक कंत्राटदारास उपकंत्राटदाराची नियुक्ती करता येणार नाही.
     वाहन वापराबाबत आणि वाहनांचे कर, विमा, प्रदुषण आदीबाबत शासनाच्या अस्तित्वात असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यास कंत्राटदार बांधील राहील. तसेच वाहतूक करतांना भरावे लागणारे विविध मार्गावरील पथकर, जकात कर, प्रवेश फी, एस्कॉर्ट फी तसेच वाहतुकीसंदर्भात वेळोवेळी शासनाकडून लावण्यात येणारे कर वाहतूक कंत्राटदारास भरणे बंधनकारक राहणार आहे.  तरी आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत सीएमआर तांदुळाची वाहतूक करताना जिल्हा पुरवठा विभागाने दिलेल्या अटी व शर्तींची पुर्तता वाहतुक कंत्राटदाराने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिल्या आहेत.
                                                                        *****  
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी गहु धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,दि‍ 13 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत मार्च 2020 चे नियतनातील प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी योजनेकरीता गहू धान्याची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत करावी लागणार आहे. प्रती लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये प्रतिकिलो व परिमाण 3 प्रति किलो आहे.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.   चिखली गोदामासाठी गहू 4222 क्विंटल, बुलडाणा : गहू 5124  क्विंटल,  दे.राजा गोदामाकरीता गहू 1965, अमडापूर : गहू 1373 क्विंटल, मोताळासाठी गहू 3100 क्विंटल, नांदुरासाठी गहू 3081 क्विंटल, खामगांव गोदामकरीता गहू 4701, शेगांवकरीता गहू 2625, जळगांव जामोदकरीता गहू 2954, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 2467,  मेहकरसाठी गहू 3401 , लोणारकरीता गहू 1964, सिंदखेड राजाकरीता गहू 1597 क्विंटल,  मलकापूर : गहू 3040, साखरखेर्डा गहू 1212, आणि डोणगांव करीता गहू 1204  क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण 44030 क्विंटल गव्हाचा  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा दौरा
बुलडाणा,दि‍ 13 - राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी दु. 1 वाजता अकोला येथून देऊळगांव घुबे ता. चिखलीकडे प्रयाण, दु. 3.30 वाजता दे. घुबे ता. चिखली येथे आगमन व आयोजित सत्कार कार्यक्रमास उपस्थिती, सोयीनुसार बुलडाणाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम करतील.
                                                                        ******

--

No comments:

Post a Comment