Saturday 1 February 2020

DIO BULDANA NEWS 1.2.2020



मन:शांती व तंदुरुस्त शरीरासाठी नियमीत सुर्यनमस्कार आवश्यक
-   आमदार संजय गायकवाड
 बुलडाणा, दि.1 : सर्वांनी दीर्घआयुष्यासाठी दररोज सुर्यनमस्कार हा व्यायाम करावा.  तसेच व्यायामशाळेमध्ये फक्त मशिनवर व्यायाम करण्याबरोबर सुर्यनमस्कार हा व्यायाम घामाच्या धारा लागेपर्यंत करावा. सुर्यनमस्कार या व्यायाम प्रकारामुळे वाढत्या वयामध्ये सुध्दा शरीर यष्टी पिळदार राहते.  सुर्य नमस्कारामुळे मन व शरीर शुध्द होते, तसेच आयुष्य सकारात्मकतेने जगता येते, असे प्रतीपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले.
      जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग (माध्यमिक व प्राथमिक), क्रीडा भारती, आरोग्य भारती, नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हींग, योग विद्याधाम, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, विविध एकविध क्रीडा संघटना व जिल्ह्यातील सर्व योग विषयक काम करणाऱ्या संस्था यांचे सहकार्याने  रथसप्तमी निमित्त जागतिक सुर्यनमस्कार दिन कार्यक्रमाचे आयोजन आज 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 ते 8.45 या दरम्यान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ- पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, उपअभियंता श्री.भगत, शिवजयंती समितीचे अध्यक्ष ॲड.जयसिंग देशमुख, आरोग्य भारतीचे डॉ.राजेश्‍वर उबरहंडे, क्रीडा भारतीचे अध्यक्ष श्रीकृष्ण शेटे आदी उपस्थित होते. 
  प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. पाटील म्हणाले, सुर्यनमस्कार  व योग प्रशिक्षण हा विद्यार्थ्यांचा शरीर संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम असुन, शारीरिक व्यायामाच्या कृती आहेत.  तशाच त्या संस्कारीदेखील आहेत.  यामुळे मन निरोगी व शरीर सुदृढ आणि सुसंस्कृत देखील होते.  कार्यक्रमादरम्यान सामुहीक सुर्यनमस्कार प्रात्यक्षीक कार्यक्रमाचे संचलन सौ.अंजली परांजपे यांनी केले.  तर प्रात्यक्षीक प्रशांत लहासे, भुषण मोरे, अवचितराव उबरहंडे व सौ.कुंदाताई पंधाडे यांनी केले. 
     या सामुहीक सुर्यनमस्कार कार्यक्रमासाठी शहरातील भारत विद्यालय, श्री शिवाजी विद्यालय, प्रबोधन विद्यालय, एडेड हायस्कुल, शारदा ज्ञानपीठ, रुखाई कन्या शाळा, सेंट जोसेफ इंग्लीश मिडीयम स्कुल, सहकार विद्या मंदीर, उर्दु हायस्कुल, मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दु हायस्कुल, शिंदे गुरुजी कन्या शाळा, जिजामाता महाविद्यालय, महात्मा फुले समाज कार्य महाविद्यालय, ए.एस.पी.एम.मेडीकल कॉलेज हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च इन्स्टीट्युट, आयुर्वेदीक महाविद्यालय व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा भारती यांचेमार्फत बिस्कीट वाटप करण्यात आले.  याप्रसंगी विविध शाळा, महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.सिध्दार्थ मेश्राम, प्राचार्य सौ.जे.पी.जगताप, सौ.उल्का अंतरकर, सौ.संजीवनी शेळके, श्री.आखाडे मुख्याध्यापक व फिजीकल डायरेक्टर प्रा.डॉ.आत्माराम राठोड, प्रा.वारे, ॲड. राजेश लहाने, एन.आर. वानखेडे, राजेश डिडोळकर, शारीरिक शिक्षक सर्वश्री बंडु इंगळे, दिनेश गर्गे, संदीप पाटील, रविंद्र गणेशे, राजेश चव्हाण, गिरीष चौधरी, राजेंद्र शिरसाट, एंडोले, बैरागी, महाजन, देशमुख, चिम, गजेंद्रसिंह राजपुत, मो.शकील अ. खलीक, अफजल शरीफ, एस.जी.खान, प्रदीप देशमुख, पुजा श्रीवास, सावजी, किरण चौधरी, श्री. नागरे  आदी उपस्थित होते.
संचलन राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी तर आभार क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी जी.एम.वरारकर, रविंद्र धारपवार, अनिल इंगळे, विजय बोदडे, सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, गणेश डोंगरदिवे, कृष्णा नरोटे, भिमराव पवार, प्रतिक मोरे तसेच पी.आर. वानखेडे, क्रीडा भारतीचे बाळ आयचीत, नेहरु युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, अविनाश मोरे, राजेंद्र लोखंडे (रांगोळी) यांनी प्रयत्न केले.
                                                                        ******




उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्यास मुदतवाढ
·        15 फेब्रुवारी 2020 पर्यंत अंतिम मुदत
       बुलडाणादि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2019 ते 31 डिसेंबर, 2019 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2020 होता. प्रवेशिका स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली असून 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहे.
         विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पध्दतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
        प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
            प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तरी इच्छूक पत्रकारांनी स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                                                    *******
 धनगर समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षापुर्व निवासी प्रशिक्षण मिळणार
  • युपीएससी व एमपीएससी परीक्षांचा होणार सराव
   बुलडाणा, दि. 1 : राज्य शासनाने 6 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार विजाभज, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, इमाव व विमाप्र कल्याण विभागामार्फत धनगर समाजाच्या उत्थानासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजामधील विद्यार्थ्यांचे संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण इतर समाज घटकांच्या तुलनेत कमी आहे.  हे प्रमाण वाढावे, विद्यार्थ्यांना सुविधा मिळावी यासाठी धनगर समाजातील विद्यार्थ्यांना निवासी परीक्षापुर्व प्रशिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आलरी आहे.
   धनगर समाजातील विद्यार्थी हे दुर्गम भागात राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. अशाही परिस्थितीत ते शिक्षण घेवून शिक्षीत होतात. मात्र योग्य प्रशिक्षणाअभावी भारतीय प्रशासकीय सेवेत तसेच राज्य सेवेसाठी अनुक्रमे संघ लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येणाऱ्या परीक्षेमध्ये ते पात्र ठरू शकत नाहीत. त्यामुळे अखिल भारतीय नागरी सेवा तसेच राज्‍य सेवेत धनगर समाजातील अधिकाऱ्यांचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी 6 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        ******

बुलडाणा आयटीआय येथे 4 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा
·        270 पदांसाठी होणार भरती
बुलडाणादि. 1 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था,  बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडि‍त दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार,  दि. 4 फेब्रुवारी 2020 रोजी  सकाळी 11 वाजता करण्यात आले  आहे. या मेळाव्यात निवड पद्धत ही मुलाखत असणार आहे. सदर मेळाव्यात 270 पदांसाठी भरती होत आहे.  तरी तरूण – तरूणींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
        मेळाव्यास उपस्थि‍त राहणेकरीता सेवायोजन कार्ड, आधारकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र, शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती, 5 पासपोर्ट फोटो, बायोडाटा सोबत असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य,औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा यांना व  सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील सचिन पवार यांच्या 9552319696 येथे संपर्क साधावा,असे जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 
                                                          रोजगार मेळाव्यात येणार या कंपन्या
क्लाड मेटल इंडिया प्रा. लि. औरंगाबाद : पदाचे नाव - रेफ्रीजमेंट ॲण्ड एअर कंडीशन,  शिट मेटल वर्कर, मशिनिष्ट, फिटर, वेल्डर, पदे 25, वेतन 8450 मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी व आयटीआय उत्तीर्ण.  पुणे पॉलीमर्स ग्रुप, भोसरी, पुणे : पदाचे नाव  डिझेल मॅकेनीकल, मशिनिष्ट, फिटर, प्लास्टीक पॉलीमर्स ऑपरेटर, पदे 25, वेतन 9 ते 10 हजार मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी व आयटीआय उत्तीर्ण.  संजीव ॲटोपार्ट्स प्रा. लि वाळुज, औरंगाबाद : पदाचे नाव – टर्नर, फौड्रींमॅन, मशिनिष्ट, फिटर, वेल्डर, पदे 25, वेतन 8910 मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी व आयटीआय उत्तीर्ण.  रूप पॉलीमर लि. चाकण, पुणे : पदाचे नाव – मोल्डर, फिटर, वेल्डर, टर्नर व मशिनिष्ट,  पदे 20, वेतन 8500 मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी व आयटीआय उत्तीर्ण. क्रिडाक ॲटो प्रा. लि. औरंगाबाद : पदाचे नाव - फिटर, इलेक्ट्रीक वायरमन, पदे 20, वेतन 8500 मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी व आयटीआय उत्तीर्ण. नरसिम्हा ग्रुप, एमआयडीसी वाळुज, औरंगाबाद : पदाचे नाव – मशिनिष्ट, फिटर, टर्नर,  पदे 20, वेतन 8500 मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी व आयटीआय उत्तीर्ण. इपिटॉमी प्रा. लि, एमआयडीसी औरंगाबाद : पदाचे नाव – इलेक्ट्रीशीयन, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स,  पदे 25, वेतन 8500 मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी व आयटीआय उत्तीर्ण. एकदंत कुलटेक प्रा. लि औरंगाबाद : पदाचे नाव – इलेक्ट्रीशियन, फिटर, पदे 20, वेतन 8000 मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी व आयटीआय उत्तीर्ण.  लंबोदर प्रा. लि. औरंगाबाद : पदाचे नाव – वायरमन, इलेक्ट्रीशीयन,  फिटर, पदे 25, वेतन 8580 मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी व आयटीआय उत्तीर्ण.  यशश्री प्रेस ऑटो प्रा. लि, वाळज, औरंगाबाद : पदाचे नाव - शिट मेटल वर्कर, फिटर, वेल्डर, पदे 30, वेतन 9000 मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी व आयटीआय उत्तीर्ण.  सतिशजी इन्फ्राटेक प्रा. लि, चिखली : पदाचे नाव – वेल्डर, फिटर, हेल्पर व इलेक्ट्रीशियन, पदे 15, वेतन 6 ते 7 हजार मासिक, वयोमर्यादा 18 ते 35 व शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी व आयटीआय उत्तीर्ण. नवकिसान बायो प्लॅण्टेक लिमीटेड, जळगांव : पदाचे नाव – फिल्ड ऑफीसर, पदे 20, वेतन 8000 मासिक, वयोमर्यादा 20 ते 35 व शैक्षणिक पात्रता 10, 12 वी उत्तीर्ण.  
                                                ******
अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश
  • इयत्ता पहिली व दुसरी प्रवेशासाठी अर्ज सादर करावे
   बुलडाणा, दि. 1 : अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येत असलेल्या अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामधील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुले असावीत. या प्रवेशासाठी विनामुल्य अर्ज प्रकल्प अधिकारी, अकोला यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. कोणत्याही भुलथापांना बळी न पडता व कोणाच्याही माध्यमातून प्रवेश अर्ज प्राप्त करून न घेता सदर कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून प्रवेश अर्ज प्राप्त करून प्रकल्प अधिकारी कार्यालयात सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2020 असणार आहे.
  या प्रवेशासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा, पालकाने सक्षम अधिकाऱ्याने दिलेला विद्यार्थ्यांच्या अनुसूचित जमाती दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक नमूद करण्यात यावा. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा कमाल 1 लाख रूपये आत असावी. त्यासाठी तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला असावा. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पूर्ण असावे. जन्मतारखेचा पुरवा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. पालकांनी प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र व दोन पासपोर्ट छायाचित्र जोडावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा / घटस्फोटीत/ निराधार/ परित्यक्त्या व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय अथवा निमशासकीय नोकरदार नसल्याचे पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. लाभ घेवू इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांकडून संमतीपत्र घेण्यात येईल.  इयत्ता दुसरीसाठी शिकत असलेल्या शाळेमधील मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                    ******

No comments:

Post a Comment