Wednesday 6 November 2019

DIO BULDANA NEWS 6.11.2019

नोंदणी व मुद्रांक विभागाची कार्यशाळा उत्साहात
बुलडाणा, दि. 6 -  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नागरी सेवांमधील सुधारणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र येथे नुकतीच कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.  कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक अमरावतीचे मेहन जोशी होते, तर अकोल्याचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप भोसले, वाशिमचे किशोर मगर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
   यावेळी धनजंय देशपांडे यांनी नोंदणी व मुद्रांक विभागाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवांमधील ऑनलाईन सेवांची व सुधारणांची माहिती अतिशय साध्या, सोप्या पद्धतीने पॉवर पॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना दिली. सदर कार्यशाळेस सर्व मुद्रांक विक्रेते, विधीज्ज्ञ, बांधकाम व्यावसायिक, अधिकृत सेवा पुरवठादार, बँक प्रतिनिधी आदी उपस्थित होते. कार्यशाळा बुलडाणा सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी उमेश शिंदे यांचे नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडली, असे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
                                                                        *******
        तांदुळवाडी बंधारा मासेमारीसाठी पाच वर्षासाठी ठेका पद्धतीने देणार
बुलडाणा, दि. 6 -  खामगांव तालुक्यातील पाटबंधारे विभागाचा 10 हेक्टरचा तांदुळवाडी बंधारा  सन 2019-20 ते सन 2023-24 या पाच वर्षासाठी ठेका पद्धतीने देण्यासाठी लिलाव करण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसायाकरिता तलाव / जलाशय मासेमारी ठेक्याने देण्यासाठी शासनाने सुधारीत धोरण अटी – शर्तींचे अधिन राहून पाच वर्षांसाठी ठेक्याने देणेकरीता जिल्ह्यातील नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
   मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेने संस्थेच्या ठरावासोबत मागणी प्रस्ताव प्रसिद्धी झाल्याच्या सात दिवसाचे आत सहाय्यक आयुक्त  मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, पहिला माळा, बुलडाणा या कार्यालयास सादर करावा. सदर संस्था अवसायनात तथा संस्थेबाबत न्यायप्रविष्ठ प्रकरण सुरू नसल्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), बुलडाणा यांचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडावे. संस्थेचा सन 2018-19 या आर्थिक वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल प्रत, संस्थेची 97 वी घटना दुरूस्ती संपूर्ण प्रत, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणीसाठी देण्यात आलेले मत्स्यव्यवसाय विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अथवा संस्था नोंदणी प्रमाणपत्र तसेच उपविधी दुरूस्ती प्रत, संस्था ही शासन अथवा जिल्हा परिषद, सिंचन विभागाची थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र, सद्य: स्थितीत संस्थेकडे मासेमारी ठेक्याने असलेल्या पाटबंधारे विभागाचे अथवा जिल्हा परिषद  सिंचन विभागाचे असलेले तलाव / यादी सोबत सादर करावी.  तांदुळवाडी बंधारा कालावधी न्युनतम ठेका रक्कम 4500 रूपये राहणार आहे. जाहीर लिलाव बोली प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था न्यूनतम ठेका रक्कम 4500 रूपये रक्कमेपासून बोलीची सुरूवात करतील.
  मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी जाहीर लिलाव बोली प्रक्रियेत सहभागी होण्यास अथवा कार्यालयास प्रस्ताव दाखल करण्याचा कालावधी 14 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे. जाहीर बोली लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अटी – शर्ती आणि जाहीर बोली लिलावाची तारिख व वेळ 16 नोव्हेंबर 2019 नंतर पात्र मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना कळविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी पाटबंधारे विभागाच्या तांदुळवाडी बंधारा जाहीर लिलावा बोली प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन स.इ नायकवडी, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलडाणा यांनी प्रसिद्धिी पत्रकान्वये केले आहे.
********
   पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे पिक नुकसानीचे अर्ज ग्रामस्तरावर स्वीकारणार
बुलडाणा, दि. 6 -  प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत सन 2019-20 खरीप हंगामातील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे पिक नुकसान अर्ज ग्रामस्तरावरच स्वीकारण्यात येणार आहे. पिक नुकसान सुचना अर्ज व पंचनामा अर्ज, 7/12, नमुना 8 अ, पिक विमा भरल्याची पावती, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आदींसह संबंधीत गावातील कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, कृषि मित्र यांच्याकडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शेतकरी बांधवांनी जमा करावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

No comments:

Post a Comment